ब्रेकिंग
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात युवक काँग्रेसचा युवक संवाद; NEET घोटाळ्याविरोधात जोरदार आंदोलन  विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर येथे युवक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त युवकांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच NEET परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव शाम्भवी शुक्ला तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा व मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार होते.

कार्यक्रमाची सुरुवात NEET परीक्षा घोटाळ्यामुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

 युवकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांनी प्रास्ताविक करत युवक काँग्रेसच्या भूमिका आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशुतोष पवार, किरण पाटील आणि तुषार संदानशिव यांनी युवक काँग्रेसच्या भावी कार्यक्रमांचा आढावा घेतला.

तसेच जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मनोज पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते संदीप घोरपडे, ज्येष्ठ नेते देवेंद्र पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सचिव रज्जाक शेख, मौर्य क्रांती संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत गुरुजी, मगन भाऊसाहेब पाटील, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार तसेच युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सईद तेली यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

 नव्या पदाधिकाऱ्यांचा गौरव

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC) संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या विविध फ्रंटल आणि सेलच्या अध्यक्षांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत, सेवादल शहराध्यक्ष भिकाजी रामचंद्र पाटील, ओबीसी सेल शहराध्यक्ष राकेश पवार, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष भगवान संदानशिव, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष राजू भाट, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष जुबेर पठाण, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी आणि सोशल मीडिया शहराध्यक्ष संदीप बारी यांचा सन्मान करण्यात आला.

 NEET घोटाळ्याविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा

बैठकीनंतर युवक काँग्रेसच्या वतीने मराठा मंगल कार्यालय ते तहसील कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करून NEET परीक्षा घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच २१ तारखेला होणाऱ्या NEET परीक्षेसाठी बाहेरगावी परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या कार्यक्रमासाठी चाळीसगाव विधानसभा अध्यक्ष प्रज्वल राजपूत, पाचोरा विधानसभा अध्यक्ष मनोहर महाले, अमळनेर विधानसभा अध्यक्ष हर्षल जाधव, एरंडोल तालुकाध्यक्ष चेतन पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष विकास पाटील, जिल्हा सरचिटणीस गौरव देशमुख, जिल्हा सचिव शुभम शिंदे, चोपडा शहराध्यक्ष माजित तडवी, भडगाव शहराध्यक्ष गोविंद देशमुख, योगेश येवले, धरणगाव युवक काँग्रेस शहराध्यक्ष भूषण भागवत, माजी शहराध्यक्ष गौरवसिंह चव्हाण, काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वनाथ ठाकरे, ज्येष्ठ नेते तुकाराम चौधरी, शरद पाटील, गुलाब पाटील, रऊफ पठाण, जितेंद्र चौधरी, मयूर पाटील, प्रशांत पाटील, संदीप बोरसे, चेतन पाटील, वैभव पाटील, जनार्दन पाटील, कैलास पाटील, पंकज पाटील, सुनील पाटील, अर्जुन शिंदे, सूरज पवार, राकेश जाधव, पवन जाधव, मधुकर बडगुजर, मधुकर पाटील, जीवन पाटील, हिमांशू पाटील, अतुल धनगर, राहुल राजपूत, संकेत पाटील, अजय मालचे, सलमान शेख, तौसिफ बागवान, जयेश कोळी, कुणाल पाटील, कुणाल बडगुजर, तेजस ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर महाले यांनी केले तर गौरव देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रम  करण्यासाठी माजी शहराध्यक्ष व नगरसेवक मनोज पाटील, तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, शरद पाटील आणि राकेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील तर उपाध्यक्षपदी गणेश भामरे बिनविरोध आमदार अनिल पाटील यांचे शेतकी संघावर निर्विवाद वर्चस्व; राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलची सत्ता कायम

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुका शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर उपाध्यक्षपदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने शेतकी संघावरील आपले वर्चस्व कायम राखत या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर निर्विरोध निवड घडवून आणली.

अमळनेर तालुका शेतकी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचे तब्बल १० संचालक विजयी झाले होते. तर काँग्रेस प्रणित शेतकरी पॅनलचे ३ आणि भाजप प्रणित किसान विकास पॅनलचे २ संचालक निवडून आले होते. त्यामुळे शेतकी संघातील सत्तेची सर्व सूत्रे आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या हाती आली होती.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया १९ जून रोजी सकाळी ११ वाजता शेतकी संघाच्या कार्यालयात पार पडली. निर्धारित वेळेत अध्यक्षपदासाठी संभाजी पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी गणेश भामरे यांचेच अर्ज दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी संचालक संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, विक्रांत पाटील, नितीन पाटील, रणजीत पाटील, शंकर बैसाने, सुषमा देसले, मालुबाई पाटील, सुरेश पाटील, प्रा. शाम पवार, जितेंद्र पाटील आणि प्रफुल पवार उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून धर्मराज पाटील तर सहाय्यक अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी कामकाज पाहिले.

 शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या – आमदार अनिल पाटील

नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील व उपाध्यक्ष गणेश भामरे यांचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, “तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही संस्था जनतेने विश्वासाने आपल्या हाती दिली आहे. त्यामुळे आता जबाबदारी अधिक वाढली आहे. संघाची आर्थिक बळकटी, उत्पन्नवाढ आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हेच प्राधान्य असले पाहिजे.”

“संघाच्या उत्पन्नवाढीसाठी आवश्यक असेल तर कर्ज घ्यावे लागले तरी चालेल; मात्र नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून संस्था सक्षम करावी लागेल. विरोधकांनी कितीही टीका केली तरी शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे,” असेही त्यांनी सांगितले.

तसेच, पद न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाही भविष्यात संधी दिली जाईल, असे संकेत देत पक्षासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना तज्ज्ञ संचालक पदावर संधी देण्याबाबत संचालक मंडळाला त्यांनी सूचना केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश भामरे यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, तिलोत्तमा पाटील , शहराध्यक्ष चेतन राजपूत तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष संभाजी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

विशेष म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील हे यापूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे मानले जात असून, शेतकी संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अधिक भक्कम झाले आहे.

 

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या ‘जिओ स्मार्ट बाजार’वर गुन्हा दाखल करा! अमळनेरमध्ये राजमुद्रा फाउंडेशन आक्रमक; छत्रपती शाहू महाराजांच्या फलकावर जाहिरातबाजी केल्याचा आरोप

 

अमळनेर | १८ जून २०२६

अमळनेर शहरातील ढेकू परिसरातील inराजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्कल येथे महापुरुषांचा अवमान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या फलकावर रिलायन्स जिओ स्मार्ट बाजारने अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी राजमुद्रा फाउंडेशनने केली आहे.

 महापुरुषांच्या सन्मानाला धक्का

आरक्षणाचे जनक आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ ढेकू परिसरातील सर्कलवर राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून फलक उभारण्यात आला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार, अमळनेर यांनी या फलकावर स्वतःची व्यावसायिक जाहिरात लावल्याचे निदर्शनास आले. या कृत्यामुळे शाहू महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोप करत बहुजन समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 संतप्त भावना; कडक कारवाईची मागणी

या घटनेमुळे अमळनेरसह परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जयवंतराव पाटील यांनी प्रशासनाला निवेदन देत संबंधित कंपनीच्या स्थानिक शाखेवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

“महापुरुषांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. व्यावसायिक फायद्यासाठी शाहू महाराजांच्या फलकावर अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्या जिओ स्मार्ट बाजारवर तात्काळ गुन्हा दाखल होऊन न्याय मिळावा.”

शाम जयवंतराव पाटील अध्यक्ष, राजमुद्रा फाउंडेशन

विविध संघटनांचा एकमुखी पाठिंबा

या मागणीसाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अमळनेर तालुका मराठा समाजाचे संचालक संजय पाटील, भारतीय जनता पक्षाचे अमळनेर शहराध्यक्ष योगेश महाजन, शिवसेना कार्यकर्ते सुरज परदेशी, हर्षल महाजन, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

 प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

महापुरुषांच्या सन्मानाशी संबंधित हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानले जात असून, याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण अमळनेर शहरासह सामाजिक संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे. महापुरुषांचा सन्मान अबाधित राखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

अमळनेरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव आणि प्रेरणादायी व्याख्यानातून इतिहासाला उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी) : वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव अमळनेर येथे मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. राजपूत एकता मंच अमळनेर शहर व ग्रामीण यांच्या वतीने रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

दि. १७ जून रोजी सकाळी १० वाजता महाराणा चौकातील स्मारकस्थळी महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले. शिबिराला समाजबांधव व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमातून १०० पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

व्याख्यानातून इतिहासाचा गौरवशाली वारसा उलगडला

सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह, अमळनेर येथे व्याख्यान, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अनिल पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, प्रा. धर्मसिंह पाटील, माजी जि.प. सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, नगरसेवक महेश देशमुख, जितेंद्र ठाकुर, व्याख्याते प्राचार्य संजय गिरासे, राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील तसेच सूरज परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर व्याख्याते प्राचार्य संजय गिरासे यांनी “महाराणा प्रताप : हल्दीघाटी युद्धाची साडेचारशे वर्षे व भारत” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत उपस्थितांना इतिहासाच्या गौरवशाली पानांची सफर घडवली. महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि त्याग यांचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या व्याख्यानातून केला.

यावेळी शेतकी संघ तसेच नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

सामाजिक उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक

मिरवणूक आणि डीजे यांसारख्या पारंपरिक स्वरूपांना फाटा देत रक्तदान, विद्यार्थी गुणगौरव आणि व्याख्यान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी राजपूत एकता मंचाचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांनी उपस्थित समाजबांधवांना महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाजबांधव आणि राजपूत एकता मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

लिनेस क्लबचा प्रेरणादायी उपक्रम; प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

अमळनेर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने लिनेस क्लबतर्फे येथील प्रताप हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिनेस क्लबच्या अध्यक्षा कविता पारख होत्या. यावेळी जास्मिन भरूचा (इन्चार्ज ऑफिसर), जया जैन (कॅबिनेट ऑफिसर), डॉ. मंजुश्री जैन तसेच शारदा अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कविता पारखयांनी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हेच व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. तसेच शाळेला भविष्यात शैक्षणिक साहित्याची आवश्यकता भासल्यास लिनेस क्लबतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यानंतर विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, शैक्षणिक किट तसेच इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा व अभ्यासक्रमाशी संबंधित उपयुक्त पुस्तके वितरित करण्यात आली. आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव उमटले होते.

शिक्षणाबाबत सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मनापासून स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एन. पालवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. ए. खांजोडकर यांनी मानले.

“गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रताप हायस्कूलला मदतीचा हात द्यावा. विद्यार्थ्यांचे शिक्षण सशक्त झाले तरच समाजाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो.”

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती डॉ. डिगंबर महाले यांचीही गव्हर्निंग कौन्सील सदस्यपदी बिनविरोध निवड

 

अमळनेर : महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी व उद्योजक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शतकोत्तर परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (एमएसीसीआयए) च्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी उद्योजक वेदांशू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी आपल्या विशेष अधिकारातून ही नियुक्ती केली असून, चेंबरच्या शतक महोत्सवी वर्षात झालेल्या या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची देखील गव्हर्निंग कौन्सील सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे, हे विशेष! गेल्या वर्षी डॉ. महाले यांचे एकूण कार्य व दीर्घ अनुभव लक्षात घेऊन संस्थेने त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. सदर पदी नियुक्त होणारे ते तालुक्याच्या इतिहासातील पहिलेच सदस्य होते.  

महाराष्ट्र चेंबरची व्यवस्थापन समिती ही संस्थेतील सर्वोच्च धोरणात्मक निर्णय घेणारी समिती आहे. या समितीत अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, विविध विभागांचे उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष, ट्रस्ट बोर्ड चेअरमन, सेक्रेटरी जनरल यांचा समावेश असतो. महाराष्ट्र चेंबरच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे, संस्थेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेणे आणि भावी दिशा निश्चित करणे ही या समितीची प्रमुख जबाबदारी असते.

विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्षांच्या विशेष अधिकारातून केवळ एका सदस्याची या समितीवर नियुक्ती केली जाते. यंदा ही जबाबदारी वेदांशू पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वेदांशू पाटील हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, शिक्षण, मनोरंजन तसेच ई-कॉमर्स अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. विविध व्यवसाय क्षेत्रांतील त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे समजते.

महाराष्ट्र चेंबरच्या जवळपास शंभर वर्षांच्या इतिहासात व्यवस्थापन समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांपैकी सर्वांत तरुण सदस्य म्हणून वेदांशू पाटील यांची नोंद होणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या नियुक्तीकडे उद्योग व व्यापारी क्षेत्रात विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे. अलीकडेच पार पडलेल्या 2026-28 च्या निवडणुकीत अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाली असून, राज्यातील सर्व उपाध्यक्ष आणि सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांची बिनविरोध तर काहींची निवडणुकीद्वारे विजय प्राप्त करून एकहाती सत्ता प्रस्थापित झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या नेतृत्वासोबत युवा उद्योजकांना संधी देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना वेदांशू पाटील यांनी अध्यक्ष रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी तसेच महाराष्ट्र चेंबरच्या सर्व नेतृत्वाचे आभार मानले. महाराष्ट्र चेंबरच्या विकासासाठी, सभासदांच्या हितासाठी आणि संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षात नवे उपक्रम राबविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र चेंबरच्या शतक महोत्सवी वाटचालीत युवा नेतृत्वाचा सहभाग वाढविण्याच्या दिशेने ही नियुक्ती एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, उद्योग-व्यापार क्षेत्रात नव्या पिढीच्या प्रतिनिधित्वालाही यामुळे बळ मिळणार आहे.

अमळनेर : महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीवर वेदांशू पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करताना अध्यक्ष रवींद्र माणगावे. शेजारी ट्रस्ट बोर्ड चेअरमन पेडणेकर, माजी अध्यक्ष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष शेट्टी.

“सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलच्या इशिकाला नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड”

 

अमळनेर, दि. १६ जून : अमळनेर येथील सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मधील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी इशिका शरद खैरनार हिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड पटकावून शाळेचे व शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.

दिनांक १३ व १४ जून २०२६ रोजी विदर्भ केसरी खासदार रामदासजी तडस इंडोर स्टेडियम, देवळी (जि. वर्धा) येथे स्पोर्ट्स शोतो कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया संलग्नित स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, वर्धा यांच्या वतीने राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत इशिकाने काता व कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विशेष यश संपादन केले. तिच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिला “नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

इशिकाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन श्री. सुरेंद्रजी बोहरा, मुख्याध्यापक श्री. जितेंद्र सिंह, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी चेअरमन बोहरा सरांनी इशिकाच्या पुढील शैक्षणिक व क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला. व सर्वांनी तिचे कौतुक केले

इशिकाच्या या यशामागे मास्टर करंदीकर व सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल अमळनेर यांचे फार मोठे योगदान आहे

अमळनेरच्या पोदार लर्न स्कूलचा दणदणीत शुभारंभ!  ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; पहिल्याच दिवशी १५० हून अधिक प्रवेश

 

अमळनेर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अमळनेर येथील ‘पोदार लर्न स्कूल’मध्ये उत्साह, आनंद आणि जल्लोषाचे अनोखे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेने केलेल्या भव्य आयोजनामुळे पहिल्याच दिवशी परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले.

ढोल-ताशांच्या दणदणाटात आणि मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. शाळेच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण केले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. या आत्मीय स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, तर पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

अल्पावधीतच पालकांचा मोठा विश्वास

गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन यामुळे पोदार लर्न स्कूल ने अत्यंत कमी कालावधीत अमळनेर परिसरातील पालकांचा विश्वास संपादन केला आहे. याच विश्वासाचे प्रतीक म्हणून शाळेच्या पहिल्याच वर्षात तब्बल १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

याबाबत माहिती देताना संस्थेचे सचिव प्रशांत सूर्यवंशी म्हणाले, “पालकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”

 बौद्धिक खेळांतून शिक्षणाला नवी दिशा

केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, सर्जनशीलता आणि बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बौद्धिक खेळ, कृतीप्रधान शिक्षण आणि आधुनिक अध्यापन तंत्रांच्या माध्यमातून शिक्षण अधिक रंजक व प्रभावी बनविण्याचा शाळेचा मानस आहे.

यासाठी शाळेत उच्चशिक्षित, अनुभवी आणि विद्यार्थीहित जपणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

 अत्याधुनिक सुविधा आणि भव्य क्रीडांगण

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळेत प्रशस्त व सुसज्ज इमारत, आधुनिक वर्गखोल्या तसेच सुरक्षित आणि भव्य क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासावरही विशेष भर दिला जाणार आहे.

शहरभरातून कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत, आधुनिक शैक्षणिक दृष्टीकोन आणि सर्वांगीण विकासासाठी केलेली तयारी यामुळे ‘पोदार लर्न School’च्या या उपक्रमशील सुरुवातीचे अमळनेर शहरासह परिसरातील पालकांकडून भरभरून स्वागत आणि कौतुक होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची ही दमदार सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून शाळेच्या उज्ज्वल वाटचालीची नांदी मानली जात आहे.

खासदारांच्या गावालाच टँकरने पाणी; डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम

 

अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील डांगर उर्फ उदयनगर हे विद्यमान खासदार स्मिताताई उदय वाघ यांचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, गावाच्या विकासाचा आणि सत्तेच्या प्रभावाचा दावा केला जात असताना या गावातील नागरिकांना गेल्या सुमारे २५ ते ३० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.

               प्रा. पवार यांनी म्हटले आहे की, स्मिताताई वाघ यांनी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्षा, विधान परिषद आमदार आणि खासदार अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. त्या पक्षाच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय जबाबदाऱ्यांवर कार्यरत राहिल्या असून अनेक समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. एवढा मोठा राजकीय अनुभव, प्रशासकीय संपर्क आणि सत्तेची ताकद लाभूनही त्यांच्या स्वतःच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम राहिला, ही बाब जनतेच्या दृष्टीने गंभीर आहे.

                त्यांच्या मते, टँकरने पाणीपुरवठा करणे हा कायमस्वरूपी उपाय नसून तो शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा उपाय आहे. टँकरद्वारे होणारा पुरवठा अनेकदा अपुरा ठरतो. शिवाय पाण्याच्या गुणवत्तेची व शुद्धतेची खात्री देता येत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावरही त्याचे विपरीत परिणाम होतात. दूषित पाण्यामुळे होणारे आजार, उपचारासाठी करावा लागणारा खर्च आणि ग्रामीण भागातील अपुरी आरोग्य व्यवस्था यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अधिक कठीण बनते.

               प्रा. पवार यांनी पत्रकात प्रश्न उपस्थित केला आहे की, “जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीकडे सत्तेची विविध पदे, प्रशासकीय अनुभव आणि निर्णयक्षमतेची संधी असते, तेव्हा सर्वप्रथम आपल्या मतदारसंघातील आणि गावातील मूलभूत प्रश्न सुटणे अपेक्षित असते. मात्र डांगर उर्फ उदयनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम असल्याने सत्ता नेमकी कोणासाठी आणि कशासाठी वापरली जात आहे, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.”

               ते पुढे म्हणतात की, “स्मिताताई वाघ यांच्याबाबत कोणताही व्यक्तिगत आकस, द्वेष किंवा राजकीय वैरभाव नाही. त्या गंभीर आजाराशी झुंज देत असूनही सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत, याबद्दल आदर आहे. मात्र सार्वजनिक जीवनातील कार्याचे मूल्यमापन हे जनतेच्या प्रश्नांच्या निराकरणावरूनच होत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेली चार दशके सक्रिय राहून, विविध महत्त्वाची पदे भूषवून आणि केंद्र व राज्यात दीर्घकाळ सत्ता असतानाही गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.”

              प्रा. पवार यांनी असेही नमूद केले की, गेल्या बारा वर्षांपासून राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांवर भाजपची सत्ता विविध स्वरूपात राहिली आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या गावासाठी एखादी दीर्घकालीन पाणीपुरवठा योजना, जलस्रोत विकास, जलजीवन मिशन अथवा अन्य कोणत्याही योजनेचा प्रभावी वापर करून प्रश्न मार्गी लावता आला असता. मात्र तसे झालेले दिसत नाही.

              “डांगरचे नाव बदलून उदयनगर झाले, पण गावकऱ्यांच्या जीवनात पाण्याचा खरा उदय झाला नाही. आजही महिलांना, ज्येष्ठांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. पिण्याचे पाणी ही चैनीची नव्हे तर मूलभूत मानवी गरज आहे. ती पूर्ण करण्यात यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असतील तर त्याबाबत प्रश्न विचारलेच गेले पाहिजेत,” असेही त्यांनी म्हटले आहे.

             शेवटी प्रा. अशोक पवार यांनी सत्ता ही ग्रामीण, गरीब, वंचित, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनमान उन्नतीसाठी वापरली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

प्रा. अशोक पवारउपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), जळगाव जिल्हा.

डांगर उर्फ उदयनगरला टँकरने पाणी 

 

अमळनेर तालुक्यातील डांगर उर्फ उदयनगर हे विद्यमान खासदार सौ स्मिताताई उदय वाघ यांचे गाव. या गावाला सुमारे 25 वर्षापासून पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे लागत आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सौ स्मिताताई या जळगाव जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा राजकीय प्रवास, जळगाव जिल्हा परिषद सदस्य, जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष, विधान परिषद आमदार आणि आता खासदार पक्षाच्या जिल्हा व राज्य पातळीवर पदाधिकारी शिवाय अनेक समित्यांवर कार्यरत, उत्कृष्ट संसद पटू म्हणून पुरस्कार इत्यादी सौ स्मिता ताईंना अनेक सत्ते ची पदे मिळाली,मानसन्मान मिळाला परंतु डांगर उर्फ उदयनगरच्या ग्रामस्थांना कोणत्याही योजनेतून कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळाले नाही. आजही डांगर उर्फ उदयनगरला टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. ही बाब योग्य नाही.सामान्य माणसाला प्रश्न पडतो की सत्ता कोणासाठी वापरली जात आहे? व कोणते प्रश्न सुटत आहेत.?

. पाण्यासाठी टँकर सुरू केल्याने शासनाचा प्रचंड खर्च वाढतो. ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही.पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही गॅरंटी देता येत नाही ग्रामस्थांना दूषित पाण्यामुळे आजार होतात.सरकारी दवाखाने ही व्हेंटिलेटरवर असल्याने खाजगी डॉक्टरांचा खर्च ग्रामस्थांना परवडत नाही, परंतु खर्च करावाच लागतो,प्रसंगी काहींना दैनंदिन खर्चासाठी कर्जही काढावे लागते, याचा अर्थ टँकरचे पाणी एका अर्थाने विकतच मिळते. लोकप्रतिनिधींचे जनतेच्या वेदनाशी कोणते नाते आहे.?असे म्हणता येईल?

. सौ स्मिताताई बद्दल व्यक्तिगत आकस व द्वेष नाही. यात राजकारण नाही. त्या मोठ्या आजाराशी झुंज देत आहे. तरीही काम करीत आहे. परंतु काम कोणासाठी करीत आहेत? त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजप अशा संघटनांमध्ये गेल्या 40 वर्षापासून क्रियाशील असताना, प्रचंड अभ्यास, अनुभव आणि सत्तेची पदे असतानाही डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही? डांगरच उदयनगर झालं पण ग्रामस्थांना पाणी मिळालं नाही. 12 वर्षापासून राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना सौ स्मिता ताईंना!स्वतःच्या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडवता आला नाही? इथे स्वतःच्या गावाच्या ग्रामस्थांना पाणी देता येत नाही, तिथे शेतीला पा7णी, उद्योग,नोकरी या गोष्टी तर खूपच लांब राहिल्या. सत्ता ग्रामीण, गरीब, वंचित आणि शेतकऱ्यांसाठी वापरावी ही अपेक्षा. अशा आशयाचे पत्रक प्रा अशोक पवार, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट )जळगाव जिल्हा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.