अमळनेरात पुन्हा नाट्यसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न,,पण अमळनेरकरांचा प्रतिसाद आवश्यक अनेक वर्षांनंतर नाट्यगृहात ‘वेगळं असं काहीतरी’चे १ नोव्हेंबरला होणार सादरीकरण
अमळनेर :-एकेकाळी अमळनेर शहर म्हणजे नाट्य रसिकांची भूमी म्हणून ओळख असताना काळाच्या ओघात नियमित होणारी नाट्यश्रुखला खंडित झाल्याने शौकीन रसिकांना धुळे व जळगावची वाट धरावी लागत होती मात्र जळगावातील श्री एन्टरटेन्मेंट व धुळे येथील रंगदेवता थिएटर्स यांनी अमळनेरकर रसिकांची ही तहान भागविण्यासाठी मोठे धाडस दाखवीत एक दर्जेदार नाटक आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
यानिमित्ताने साहित्य, कला आणि नाट्यसंस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेल्या अमळनेर शहरात व्यावसायिक नाटकांची चळवळ पुन्हा बळकट होणार आहे.सदर नाट्य संस्थेकडून रविवार, १ नोव्हेंबर रोजी ‘वेगळं असं काहीतरी’ या दोन अंकी कौटुंबिक व मनोरंजक नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रात्री ८ वाजता या प्रयोगाच्या सादरीकरणाला सुरुवात होईल.
दरम्यान अमळनेर शहरात दिवंगत उद्योगपती स्वर्गीय आर के दादा पाटील यांनी त्याकाळी नवरात्र उत्सव तथा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक दर्जेदार नाटक अमळनेरात आणून मोठी मेजवानी अमळनेराना दिली.त्यानंतर माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील यांनी देखील नाटक तथा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून ही परंपरा टिकवून ठेवली मात्र दरम्यानच्या काळात नाटक येण्याची परंपरा खंडित झाली.काही महिन्यांपूर्वी जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व वरुण राजेश पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीला धर्मवीर छत्रपती संभाजी राजे हे महानाट्य अमळनेरात आणून रसिकांचे मन जिंकले.
नाटकांची ओढ वाढली असताना अमळनेरमधील नाट्यरसिकांना दर्जेदार मराठी नाटकाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, धुळे व जळगाव यासारख्या शहरात जावे लागते. मात्र, आता व्यावसायिक नाटके, फोक कार्यक्रम आणि नामवंत कलाकारांचे कार्यक्रम थेट अमळनेरमध्ये आणण्याचा प्रयत्न श्री एन्टरटेन्मेंट व रंगदेवता थिएटर्सकडून केला जात आहे. शहरातील समृद्ध नाट्यपरंपरेला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नाट्यसंस्कृती टिकविण्यासाठी केवळ प्रयोगांचे आयोजन पुरेसे नसून रसिक प्रेक्षकांची उपस्थिती आणि प्रतिसादही महत्त्वाचा आहे. त्यामुळे अमळनेरकरांनी सहकुटुंब नाट्यगृहात उपस्थित राहावे आणि या सांस्कृतिक चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाट्यप्रयोगासाठी भटू चौधरी (मो. : ७०२००५२३३८), विक्रम पाटील (मो. : ९८९२०३०१०४) व चंद्रशेखर पाटील (मो. : ९६६५३२५५५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

