मनोज पाटील यांची नाशिक पश्चिम विभागाच्या काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक मनोज भाऊराव पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रान्वये नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागाच्या काँग्रेस पक्षाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे अमळनेरच्या राजकीय वर्तुळात आनंद व्यक्त होत असून, तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मनोज पाटील यांनी अमळनेर नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून काम करताना बांधकाम समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. या कार्यकाळात त्यांनी शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध विकासकामांसाठी प्रयत्न केले. त्यांची काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याची हातोटी, कर्तव्यदक्षता आणि संघटनात्मक कामातील सातत्य यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि कार्यकर्त्यांशी असलेला समन्वय लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीमुळे पक्षसंघटनेला बळ मिळेल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मनोज पाटील हे अमळनेरचे माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय दाजीबा पर्वत पाटील यांचे सुपुत्र आहेत. राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या मनोज पाटील यांच्याकडे आता नाशिक जिल्ह्यातील पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आहे.
या नियुक्तीबद्दल अमळनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी भागवत सूर्यवंशी, गजेंद्र साळुंखे, सुलोचना वाघ, राजेंद्र चौधरी सर, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, शरद पाटील, कैलास पाटील, प्रवीण जैन, सईद तेली, डॉ. रवींद्र पाटील, सुधाकर भैसे, पी. वाय. पाटील, शिंदे, दिलीप पाटील, राकेश पवार, तौसीब तेली यांच्यासह काँग्रेसप्रेमींनी मनोज पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

