आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरपदी निवड; मोहित पाटील यांचा मराठा समाजातर्फे गुणगौरव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 24 hours ago
कृषी संस्कृतीच्या आदर्श मातांच्या कृतज्ञतेचा महोत्सव म्हणजे नवरात्री महोत्सव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई; १७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त दोन व्यावसायिकांना १० हजारांचा दंड; आरोग्य विभागाची विशेष तपासणी मोहीम
अमळनेर प्रतिनिधी : प्लास्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध अमळनेर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत तब्बल १७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन व्यावसायिकांना एकूण १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
नगर परिषदेच्या पथकाने शहरातील गुरुकृपा प्लास्टिक, कोमल हॉटेल, संजय प्लास्टिक, बाबा प्लास्टिक आणि अनिल एजन्सी या आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा आढळून आल्याने संबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. प्लास्टिक बंदीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही मोहीम मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. कारवाईत आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, योगेश पवार, वाहनचालक बालकृष्ण जाधव, जया सरदार, गणेश गडरी तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
दुष्काळाचे संकट गडद; अमळनेरच्या पाणीपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर नियोजन! सार्वजनिक विहिरी-बोअरवेल पुनर्जीवित करणार; २४ बाय ७ योजनेत ऑटो व्हॉल्व्हचा प्रस्ताव, नव्या जलकुंभांचीही तयारी
अमळनेर प्रतिनिधी : यंदा संभाव्य भीषण दुष्काळाचे संकट लक्षात घेता अमळनेर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच उपाययोजनांना गती देण्यात येत आहे. शहरातील सर्व सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेल पुनर्जीवित करून त्यांचा पाणीपुरवठ्यासाठी उपयोग करण्यात येणार असून, पाण्याची गळती रोखण्यासाठी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेत ऑटो व्हॉल्व्ह बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पाणीपुरवठा ठेकेदार आणि नगरसेवकांची आढावा बैठक घेऊन संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नियोजनाचा आढावा घेतला.
सध्या भूजल पातळी खालावत असून नदीपात्रातील उपलब्ध पाणीही पुढील दीड ते दोन महिनेच पुरेल की काय, अशी चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्याच्या संकटापासून दिलासा देण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. बैठकीत २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सद्यस्थिती, पाणीगळती, व्हॉल्व्हमधील बिघाड आणि पाणी वितरणातील असमानता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पाणीगळती रोखण्यासाठी ऑटो व्हॉल्व्हचा प्रस्ताव
२४ बाय ७ योजनेचे काम प्रगतिपथावर असून एप्रिलअखेरपर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे ठेकेदाराने बैठकीत सांगितले. मात्र, निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यास कामाला दीड महिन्यापर्यंत विलंब होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. सध्या व्हॉल्व्हमधील गळती आणि पाणी सोडण्याच्या वेळेतील तफावतीमुळे काही भागांत कमी, तर काही भागांत जास्त पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली.
ही समस्या दूर करण्यासाठी योजनेत ऑटो व्हॉल्व्हचा समावेश करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे आवश्यकतेनुसार दूरस्थ पद्धतीने व्हॉल्व्ह सुरू-बंद करता येतील. तसेच खराब व्हॉल्व्हची दुरुस्ती अथवा नवीन व्हॉल्व्ह बसवून पाण्याची गळती रोखण्यावर भर दिला जाणार आहे.
विहिरी-बोअरवेल पुनर्जीवित करून पर्यायी पाणीपुरवठा
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरातील सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेल पुनर्जीवित करून त्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पाणी पिण्यायोग्य असल्यास संबंधित ठिकाणी एक हजार लिटर क्षमतेच्या टाक्या बसवून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल. विहिरीतील पाणी वापरण्यायोग्य नसल्यास टँकरद्वारे पाणी आणून या टाक्या भरल्या जातील, अशी माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.
हतनूरचे आवर्तन राखणार; कलालीतूनही पाणीपुरवठ्याचे नियोजन
लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही संभाव्य पाणीटंचाईबाबत नगर परिषदेच्या नियोजनाची माहिती दिली. शासनाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले. हतनूर धरणातून दोन आवर्तने राखून ठेवण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कलाली डोहात सध्या बसविण्यात आलेल्या ६५ अश्वशक्तीच्या मोटारी काढून त्याऐवजी १०० अश्वशक्तीच्या मोटारी बसविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढण्यास मदत होईल आणि कलाली येथूनही पाणीपुरवठा सुरू करता येईल. याशिवाय धुळे रस्त्यावर २५ लाख लिटर क्षमतेचा, तर गांधलीपुरा परिसरात १० लाख लिटर क्षमतेचा नवीन जलकुंभ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. बाविस्कर यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन
संभाव्य पाणीटंचाईचे संकट गंभीर असले, तरी नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेकडून पूर्वनियोजन करण्यात येत आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही नागरिकांचीही जबाबदारी असून, प्रत्येकाने पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी केले.
बैठकीला लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित
या आढावा बैठकीला माजी आमदार शिरीष चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, गटनेते पंकज चौधरी, गटनेते महेश देशमुख, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, सभापती कैलास पाटील, सभापती साहेबराव पवार, सभापती नावेद शेख, दीपक चौगुले, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पाणीपुरवठा अभियंता सत्येम पाटील यांच्यासह नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शेतकरी मदत, SIR रद्द आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अमळनेरमध्ये १५ रोजी जनआंदोलन महाविकास आघाडीसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आंदोलनात सहभागी होणार; जिल्हा परिषद विश्रामगृहासमोर सकाळी १० वाजता आयोजन
अमळनेर | प्रतिनिधी
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, देशभरातील SIR प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी अमळनेर येथे गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद विश्रामगृहासमोर सकाळी १० वाजता हे आंदोलन होणार असून, यामध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न, तरुणांचे भविष्य, महिला सक्षमीकरण आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण या मुद्द्यांवर जनतेने एकत्र येऊन आवाज उठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर SIR प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी मान्य करावी, या मुद्द्यांवर आंदोलनात भर दिला जाणार आहे.
विविध संघटनांचा सहभाग
या जनआंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), अल्पसंख्याक युवा संघटना, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय विद्यार्थी सेना, पुरोगामी क्रांती सेना, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, संभाजी ब्रिगेड, महिला वकील संघटना, भारतीय मुक्ती मोर्चा आणि साने गुरुजी कर्मभूमी प्रतिष्ठान यांसह विविध संघटना सहभागी होणार असल्याचे आवाहनपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
शेतकरी, तरुण, महिला आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. विविध प्रश्नांवर लोकशाही मार्गाने एकजूट दाखवून जनतेचा आवाज संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविण्याचा या आंदोलनाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

