मांडळ येथे अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेर-वावडे मार्गावर रिक्षा पलटी; प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
शांतिनिकेतन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणे यांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ प्रदान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
विज्ञान प्रदर्शनात श्रीमती डी. आर. कन्या शाळेचे घवघवीत यश; तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक ‘ग्रामीण पर्यावरणासाठी विज्ञान’ प्रकल्पाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
अमळनेर प्रतिनिधी : पंचायत समिती शिक्षण विभाग आणि भिका यशोद चौधरी माध्यमिक विद्यालय, शिरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अमळनेर येथील श्रीमती डी. आर. कन्या शाळेने घवघवीत यश संपादन केले. उच्च प्राथमिक गटात शाळेने सादर केलेल्या ‘ग्रामीण पर्यावरणासाठी विज्ञान’ या विषयावरील प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला असून, या प्रकल्पाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या प्रदर्शनात शाळेच्या कु. दिव्या परमेश्वर पाटील आणि कु. निधी जगदीश पाटील या विद्यार्थिनींनी ‘ग्रामीण पर्यावरणासाठी विज्ञान’ या विषयावर आधारित प्रकल्प प्रभावीपणे सादर केला. प्रकल्पाची मांडणी, विषयाचे सुस्पष्ट स्पष्टीकरण आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यांमुळे त्यांनी निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांनी या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक प्रदान केला.
या यशस्वी विद्यार्थिनींचा उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम आणि गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने विद्यार्थिनींच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विद्यार्थिनींना शाळेच्या विज्ञान शिक्षिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, शिक्षकेतर प्रतिनिधी शामभाऊ पवार, एस. एस. माळी, सौ. आर. एस. सोनवणे, विज्ञान शिक्षिका सौ. एस. एस. कसबे, किरण सनेर, सौ. बी. एस. पाटील, टी. एम. शेख, सौ. जे. पी. टुले, सौ. एम. एस. पाटील, सौ. टी. जी. पाटील आणि सतीश लांडगे यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छा शाळेच्या वतीने देण्यात आल्या.

देशमुख नगरात रस्त्याची दुरवस्था, दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त! तक्रारी करूनही नगरपरिषदेचे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप; समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा…
प्रतिनिधी | अमळनेर : पिंपळे रोड आणि ढेकू रोडदरम्यान असलेल्या देशमुख नगर परिसरात रस्त्याची दुरवस्था, दूषित पाणीपुरवठा आणि अपुऱ्या नागरी सुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदलेला डांबरी रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नसून, नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण झाले नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास नगरपरिषदेवर येऊन आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
भुयारी गटार योजनेअंतर्गत पाइप टाकण्यासाठी परिसरातील डांबरी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, पाइप टाकण्याचे काम पूर्ण होऊन बराच कालावधी उलटला तरी रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.
रस्त्याच्या समस्येबरोबरच देशमुख नगरात पिण्यासाठी अस्वच्छ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नियमित कर, घरपट्टी आणि पाणीपट्टी भरूनही मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या परिसरात दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. खराब रस्ते, खड्डे आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नगरसेवकांकडे समस्या मांडून तसेच नगरपरिषदेत आणि ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीद्वारे तक्रारी नोंदवूनही अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
देशमुख नगरातील रस्त्याची दुरुस्ती करावी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करावा आणि परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नगरपरिषदेने या समस्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात; अन्यथा नगरपरिषदेवर येऊन आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी मांडली आहे.

मांडळ येथे अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे अनधिकृतपणे गौण खनिज रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली. संबंधित ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करून अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मांडळ परिसरात अनधिकृतपणे रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आल्यानंतर महसूल पथकाने तत्काळ कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेतली. त्यानंतर ते वाहन पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
या कारवाईत वावडे भागाचे मंडळ अधिकारी पी. एस. पाटील, मांडळचे ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी, जैतपीरचे ग्राम महसूल अधिकारी एम. आर. पाटील, जवखेडेचे ग्राम महसूल अधिकारी अमोल चक्रे आणि बाम्हणेचे ग्राम महसूल अधिकारी विकेश भोई यांचा समावेश असलेल्या महसूल पथकाने सहभाग घेतला.
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाकडून अशा प्रकारच्या कारवाया महत्त्वपूर्ण ठरत आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनाबाबत पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे.


