महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
मंगरूळच्या संदीप नेरकर यांची पीएच.डी. पदवीला गवसणी; खान्देश शिक्षण मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा! भौतिकशास्त्रातील संशोधनाला यश; स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचा गौरव
अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी संदीप काशीनाथ नेरकर यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त करून आपल्या शैक्षणिक यशाचा मान उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे मंगरूळ गावासह शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संदीप नेरकर यांनी भौतिकशास्त्र विषयात ‘स्टडी ऑफ आयोडाईड, आयोडेट, ऑक्झालेट अँड टार्टारेट क्रिस्टल्स ऑफ द लेड ग्रोन बाय जेल मेथड’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. या संशोधनासाठी त्यांना डॉ. अमित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या संशोधनाची दखल घेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी नुकतेच त्यांना पीएच.डी. पदवीचे अधिसूचनापत्र प्रदान केले. या वेळी डॉ. अमित पाटील, प्रा. आकाश चौधरी आणि प्रा. उन्मेष जाधव उपस्थित होते.
मंगरूळमध्ये विशेष सत्कार
संदीप नेरकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्या मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शालेय जीवनापासून सुरू झालेल्या शैक्षणिक प्रवासात संशोधनाच्या क्षेत्रात पीएच.डी. पदवीपर्यंत मजल मारल्याने त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, संचालक मंडळ, प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संदीप नेरकर यांच्या या यशामुळे मंगरूळच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाचे विद्यार्थी आणि नवोदित संशोधकांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून स्वागत होत आहे.
जय मातादी नगर, पारधी वाडा, ताडेपुरा येथील पाणीटंचाईने नागरिक त्रस्त; महिलांचा हंडा मोर्चाचा इशारा… परिसरात आठ-आठ दिवसांआड कमी दाबाने फक्त एक तास पाणीपुरवठा; दोन ते तीन दिवसांत प्रश्न न सुटल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करणार…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील जय मातादी नगर, पारधी वाडा आणि ताडेपुरा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची समस्या कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आठ-आठ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा, त्यातही केवळ एक तास पाणी सोडले जात असल्याने आणि पाण्याचा दाब कमी असल्याने रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे.
पाण्यासाठी नागरिकांना रात्रीच्या वेळी इतर ठिकाणांहून पाणी भरावे लागत असून, काहींना टँकरद्वारे पाणी मागवावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्येचे निराकरण होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी नगरपरिषद प्रशासनाला दोन ते तीन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.
परिसरातील पाणीटंचाईबाबत नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाकडे तसेच संबंधित व्हॉल्वमनकडे तक्रारी केल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पाणीपुरवठा अनियमित असल्याने घरगुती कामांसाठी आवश्यक पाणी साठवून ठेवताना नागरिकांची दमछाक होत आहे. नियमित पाणी मिळत नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी लागत असून, त्याचा आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.
पाणी मिळत नसल्याची तक्रार व्हॉल्वमन विकी महाजन यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी अरेरावीची भाषा वापरून ‘तुम्हाला जे करायचे ते करा’ असे उत्तर दिल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. तसेच, या समस्येकडे स्थानिक नगरसेवकही लक्ष देत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
पाणीटंचाईच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या परिसरातील महिलांनी नगरपरिषद प्रशासनाला दोन ते तीन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत पाणीपुरवठा नियमित करून पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध करून न दिल्यास सर्व महिला मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हंडा मोर्चा घेऊन येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने संबंधित पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून कमी दाबाची कारणे शोधावीत आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महिलांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन या समस्येची कशी दखल घेते, याकडे परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
डॉ. विवेक बोरसे यांचा स्टॅनफोर्डच्या ‘जगातील टॉप २% शास्त्रज्ञ’ यादीत सलग दुसऱ्या वर्षी समावेश विश्लेषणात्मक रसायनशास्त्र आणि वैद्यकीय तंत्रज्ञानातील संशोधनाचा जागतिक गौरव; IIT मुंबईचे माजी विद्यार्थी
प्रतिनिधी / विशेष वृत्त
वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रख्यात संशोधक डॉ. विवेक बोरसे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा अमळनेरसह भारताचा गौरव वाढवला आहे. जगातील नामांकित स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर (Stanford University–Elsevier) यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर करण्यात आलेल्या ‘जगातील अव्वल २% वैज्ञानिकांच्या’ (Top 2% Scientists) प्रतिष्ठित यादीत डॉ. बोरसे यांनी २०२५ आणि २०२६ या सलग दोन वर्षांसाठी आपले स्थान पटकावले आहे.
विश्लेषणात्मक रसायनशास्त्र (Analytical Chemistry) या विषयातील त्यांच्या बहुमूल्य संशोधन कार्याची दखल घेत ही आंतरराष्ट्रीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या जागतिक यादीत त्यांची संस्थात्मक संलग्नता ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ (NIPER), हैदराबाद अशी नोंदवण्यात आली आहे.
IIT मुंबई ते वैद्यकीय उपकरण उद्योग असा व्यापक प्रवास
डॉ. विवेक बोरसे यांनी देशातील सर्वोच्च तंत्रशिक्षण संस्था असलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT Bombay) येथून पीएच.डी. (Ph.D.) पदवी पूर्ण केली आहे. त्यांनी वैद्यकीय तंत्रज्ञान (Medical Technology) या विषयात विशेष प्रावीण्य संपादन केले असून, शैक्षणिक संशोधन आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती उद्योग (MedTech Industry) या दोन्ही क्षेत्रांत त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची रचना आणि प्रयोगशाळेतील संशोधनाची औद्योगिक पातळीवर प्रत्यक्ष अंमलबजावणी या क्षेत्रांत त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
संशोधनाचा आंतरराष्ट्रीय प्रभाव अधोरेखित
स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर यांच्या वतीने दरवर्षी जगभरातील शास्त्रज्ञांच्या संशोधन कार्याचा, शोधनिबंधांचा आणि त्यांच्या जागतिक प्रभावाचा कठोर वैज्ञानिक निकषांवर सखोल अभ्यास करून ही यादी तयार केली जाते. जगभरातील लाखो शास्त्रज्ञांमधून सलग दोन वर्षे अव्वल २ टक्क्यांमध्ये स्थान मिळवणे ही डॉ. बोरसे यांच्या संशोधन प्रवासातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद उपलब्धी मानली जात आहे.
”संशोधनातील प्रगती ही केवळ एका व्यक्तीची नसून सामूहिक प्रयत्न, सहकार्य आणि विचारांची देवाणघेवाण यांतून घडत असते. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यात मार्गदर्शन करणारे माझे सर्व गुरुजन, सहकारी संशोधक आणि सहकाऱ्यांचा वाटा मोलाचा आहे.”
— डॉ. विवेक बोरसे
समाजोपयोगी संशोधनाचा मानस
आपल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना डॉ. बोरसे यांनी आगामी काळातही वैज्ञानिक संशोधनाला अधिक गती देणे, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ सामान्य समाजाला होईल अशा आरोग्यविषयक तंत्रज्ञानावर भर देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
डॉ. बोरसे यांच्या या जागतिक यशामुळे देशातील शैक्षणिक आणि वैज्ञानिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत असून, हे यश संशोधन क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. डॉ.विवेक बोरसे हे अमळनेर येथील बीएसएनएलचे निवृत्त अधिक्षक श्री. भास्कर बोरसे यांचे सुपुत्र आहेत.

