ब्रेकिंग
शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील तर उपाध्यक्षपदी गणेश भामरे बिनविरोध आमदार अनिल पाटील यांचे शेतकी संघावर निर्विवाद वर्चस्व; राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलची सत्ता कायम

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुका शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर उपाध्यक्षपदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने शेतकी संघावरील आपले वर्चस्व कायम राखत या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर निर्विरोध निवड घडवून आणली.

अमळनेर तालुका शेतकी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचे तब्बल १० संचालक विजयी झाले होते. तर काँग्रेस प्रणित शेतकरी पॅनलचे ३ आणि भाजप प्रणित किसान विकास पॅनलचे २ संचालक निवडून आले होते. त्यामुळे शेतकी संघातील सत्तेची सर्व सूत्रे आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या हाती आली होती.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया १९ जून रोजी सकाळी ११ वाजता शेतकी संघाच्या कार्यालयात पार पडली. निर्धारित वेळेत अध्यक्षपदासाठी संभाजी पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी गणेश भामरे यांचेच अर्ज दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी संचालक संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, विक्रांत पाटील, नितीन पाटील, रणजीत पाटील, शंकर बैसाने, सुषमा देसले, मालुबाई पाटील, सुरेश पाटील, प्रा. शाम पवार, जितेंद्र पाटील आणि प्रफुल पवार उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून धर्मराज पाटील तर सहाय्यक अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी कामकाज पाहिले.

 शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या – आमदार अनिल पाटील

नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील व उपाध्यक्ष गणेश भामरे यांचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, “तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही संस्था जनतेने विश्वासाने आपल्या हाती दिली आहे. त्यामुळे आता जबाबदारी अधिक वाढली आहे. संघाची आर्थिक बळकटी, उत्पन्नवाढ आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हेच प्राधान्य असले पाहिजे.”

“संघाच्या उत्पन्नवाढीसाठी आवश्यक असेल तर कर्ज घ्यावे लागले तरी चालेल; मात्र नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून संस्था सक्षम करावी लागेल. विरोधकांनी कितीही टीका केली तरी शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे,” असेही त्यांनी सांगितले.

तसेच, पद न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाही भविष्यात संधी दिली जाईल, असे संकेत देत पक्षासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना तज्ज्ञ संचालक पदावर संधी देण्याबाबत संचालक मंडळाला त्यांनी सूचना केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश भामरे यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, तिलोत्तमा पाटील , शहराध्यक्ष चेतन राजपूत तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष संभाजी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

विशेष म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील हे यापूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे मानले जात असून, शेतकी संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अधिक भक्कम झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *