अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
अमळनेर:-शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन तसेच संचालक योगेश मुंदडे व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि क्रीडा सुविधांच्या विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच आजपर्यंत राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेत, उपलब्ध क्रीडा साहित्य, सुविधांची सद्यस्थिती आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी यांवरही सखोल विचारविनिमय करण्यात आला.
ध्येय एकच – अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला नवी उंची
अमळनेर तालुका क्रीडा संकुल हे केवळ क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणारे केंद्र न राहता, उद्याच्या सक्षम खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देणारे, त्यांच्या गुणवत्तेला वाव देणारे आणि जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवणारे केंद्र बनावे, हीच या प्रयत्नांमागील खरी भावना आहे.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका क्रीडा संकुल हे दर्जेदार, आधुनिक, अभिनव आणि जिल्ह्यातील एक आदर्श क्रीडा संकुल म्हणून नावारूपास यावे, यासाठी सर्व संबंधितांनी एकजुटीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
या अनुषंगाने आमदारांनी उपस्थित अधिकारीवर्गासोबत विविध विषयांवर चर्चा करून क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करून भविष्यातील गरजांनुसार अधिक सक्षम व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी क्रीडा क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी सारे कटिबद्ध
सक्षम क्रीडा सुविधा म्हणजे सक्षम खेळाडू आणि सक्षम खेळाडू म्हणजे उज्ज्वल भविष्य या ध्येयाने अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.

