डि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी संघाची दुहेरी विजेतेपदाला गवसणी; खेळाडूंचा पी.आय. दत्तात्रय निकम यांच्या हस्ते सन्मान जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र; २९ व ३० ऑक्टोबरला रंगणार पुढील सामने
अमळनेर प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत अमळनेर येथील नामवंत खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या कबड्डी संघाने घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक मुलींच्या संघाने दोन्ही गटांत विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
या यशाबद्दल संघातील खेळाडूंचा अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचषक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी खेळाडूंचे कौतुक करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विजयी संघात कर्णधार अश्मिरा शाकिर शेख, उपकर्णधार पुनवी निकुंबे, कावेरी पाटील, कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, इशा पाटील, मयुरी पवार, लीना गुरव, कामिनी सोनवणे, वैष्णवी पाटील, समीक्षा जाधव, रिशिका गोयल, स्नेहल पाटील आणि मोनिका भोई या खेळाडूंचा समावेश आहे.
या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे २९ व ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मॅटवर होणार आहे. या स्पर्धेतही संघाने उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, कार्यालय प्रमुख श्री. शाम पवार, श्री. एस. एस. माळी, श्रीमती आर. एस. सोनवणे आणि श्री. किरण सनेर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संघाला क्रीडा विभागप्रमुख श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीचे हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

