ब्रेकिंग
श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून रंगणार अमळनेरच्या लेकींचा कौतुक सोहळा माहेरच्या अंगणात मिळणार बालपणीच्या आठवणींची अनुभूती

 

अमळनेर : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा कौतुक सोहळा ‌‘माहेरचा पारिजात‌’ या उपक्रमातून आयोजित करण्यात आला आहे. अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या वतीने हा विशेष स्नेहमेळा शनिवार, दि. 29 ऑगस्ट ते सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 दरम्यान येथील श्री मंगळग्रह मंदिरात रंगणार आहे. त्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकारी लाभले आहे.

पारिजातकाच्या फुलांचा सडा जसा अवघे अंगण सुगंधित करतो त्याचप्रमाणे माहेरची लेकी आपल्या अस्तित्वातून, कर्तृत्वातून आणि मायेतून सासर-माहेर दोन्ही घरे उजळून टाकतात. याच भावनेतून ‌‘माहेरचा पारिजात‌’ या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली आहे. माहेरच्या अंगणात पुनश्च बालपण अनुभवता यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने गप्पांची मैफल रंगावी, हा या स्नेहमेळ्यामागील प्रमुख उद्देश आहे. 

या स्नेहमेळ्यात भाषण, कविता, गाणी, नृत्य, विनोद, पारंपरिक खेळ, उखाणे, मंगळागौरीचे खेळ यांसह विविध मनोरंजक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील हिरवाईने नटलेल्या प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा आनंद, उत्साह आणि भावनिक आठवणींनी रंगणार आहे. 

या उपक्रमासाठीची नोफ्लदणी आता पूर्णत्वास आली आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील व सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे, खजिनदार प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह महिला मंचच्या कार्यकारी मंडळातील सदस्या आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त व सेवेकरी परिश्रम घेत आहेत. ‌‘माहेरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि माहेरच्या लेकींंचा सन्मान अनुभवण्यासाठी सर्व माहेरवाशिणींनी आवर्जून वेळेत उपस्थिती द्यावी, असे आवाहन अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

स्नेहमेळ्यात आज (शनिवार, दि. 29 ऑगस्ट) होणारे कार्यक्रम

सकाळी 9.00 वाजता माहेरवाशिणींचे स्वागत, हळद-कुंकू लावून औक्षण, गजरे वाटप, ढोल-ताशांच्या गजरात श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती. 9.30 वाजता अल्पोपहार, सर्व माहेरवाशिणींनी हाता-पायाला मेंदी लावणे तसेच हातात बांगड्या भरणे. याचवेळी प्रत्येकीनेे स्वयंपरिचय देणे. दुपारी 12.15 वाजता सामूहिक अभिषेक. 1.10 वाजता सामूहिक भोजन. 2.00 ते 3.00 या वेळेत विविध बैठे खेळ. सायंकाळी 5.30 वाजता सामूहिक चहापान. 5.55 वाजता श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती. 7.30 वाजता दीपप्रज्वलन, माहेरवाशिणींचा सन्मान, मंगळागौर आदी. रात्री 9.30 वाजता रात्रीचे भोजन तसेच विविध खेळ खेळणे.

गांधली या गावात बाल वाङ्मय विभागाचा शुभारंभ; रोटरीतर्फे विद्यार्थ्यांना वाचनाचे आवाहन

 

अमळनेर- दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी गांधली पिळोदा ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मोबाईल मुक्त संध्याकाळ’ या संकल्पनेअंतर्गत एक नाविन्यपूर्ण पाऊल टाकत जिल्हा परिषद शाळा गांधली-पिळोदा येथे बाल वाङ्मय विभाग सुरू करण्यात आला.

रोटे विवेक देशमुख यांनी *त्यांचे वडील स्व. शिवाजीराव गुलाबराव देशमुख यांच्या स्मरणार्थ* या ग्रंथालयासाठी ५,००० रुपयांची पुस्तके भेट दिली. मुलांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचन कमी होत असल्याने, त्याला पर्याय म्हणून वाचनाची आवड बालपणापासूनच व्हावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे. हा प्रकल्प रोटरी क्लब अमळनेर द्वारा राबविण्यात आला होता.

या प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांना दर आठवड्याला एक पुस्तक नियमितपणे वाचनासाठी देण्यात येणार असून, वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा सत्र व नोंदवही ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पुस्तकांमध्ये महापुरुषांचे पराक्रम त्यांनी केलेले थोर कार्य व त्यांच्या इतिहास देण्यात आलेला आहे .ह्या उपक्रमा मुळे विद्यार्थ्यांना वाचनासोबतच त्यांचे ज्ञानात निश्चितच भर पडेल अशी अपेक्षा आहे तरी विद्यार्थ्यांनी याच्या जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी *रोटरी अध्यक्ष महेश पाटील, रोटे. विवेक देशमुख, सरपंच नरेंद्र पाटील, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील, अंगणवाडी सेविका, आशाताई, महिला बचत गटाच्या सदस्या* तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशी बातमी मकसूद बोहरी यांनी दिली आहे

 

ईद मिलादुन्नबी निमित्त मानवतेचा संदेश; अमळनेरमध्ये रुग्ण व गरजूंना फळवाटप

 

अमळनेर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अमळनेर येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.व.) यांनी दिलेल्या प्रेम, करुणा आणि मानवसेवेच्या संदेशातून प्रेरणा घेत ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण तसेच रेल्वे स्टेशनवरील गरजू व प्रवाशांना फळांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमातून सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि माणुसकी हाच ईद मिलादुन्नबीचा खरा संदेश असल्याचे आयोजकांनी सांगितले. सणाच्या आनंदासोबत समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सैय्यद अजहर अली, सरचिटणीस जुनेद शेख आणि कार्याध्यक्ष बबलू शेख यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, माजी शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष आरिफ भाया, वसीम पठाण, भूषण भदाणे, सैय्यद नबी, दर्शन पाटील, रिजवान मणियार, आसिफ सैय्यद, सलमान बागवान, जावेद शेख, शरूख खान, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘आरोग्य रत्न २०२६’ पुरस्कार

 

अमळनेर : आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय, सेवाभावी आणि समाजहिताचे कार्य केल्याबद्दल अमळनेर येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘पुढारी आरोग्य रत्न २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या विशेष समारंभात डॉ. शिंदे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

डॉ. शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर परिसरातील तसेच विविध भागांतील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देत अनेक गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. विशेषतः अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्रिटिकल स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना नवजीवन देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि रुग्णांप्रती असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे अनेक रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ते ‘देवदूत’ ठरले आहेत.

आरोग्यसेवा ही केवळ व्यवसाय न मानता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या कार्याची दखल ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाने घेतली. त्यातूनच त्यांची ‘आरोग्य रत्न २०२६’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

नाशिक येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, संपादक राहुल रनाळकर यांच्यासह आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्रातील ३६ डॉक्टरांचा गौरव

उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३६ डॉक्टरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अमळनेर तालुक्यातून सन्मान मिळविणारे डॉ. अनिल शिंदे हे एकमेव डॉक्टर ठरले. त्यामुळे अमळनेरसह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हजारो रुग्णांवर उपचार करताना अनेक गंभीर रुग्णांच्या जीवनासाठी निर्णायक भूमिका बजावणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान त्यांच्या वैद्यकीय सेवेची आणि सामाजिक बांधिलकीची पावती मानली जात आहे. या पुरस्कारामुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सामाजिक कार्यकर्ते राजू बापू चौधरी यांचे परखड मत लालपरीचे विद्रुपीकरण थांबवा; सार्वजनिक मालमत्तेचा सन्मान करायला शिका!

 

अमळनेर : सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देते; मात्र काही विद्यार्थ्यांकडून याच सुविधेचा गैरफायदा घेत एसटी बसच्या आसनांची तोडफोड, काचांवर व सीटच्या मागील बाजूस अश्लील मजकूर व चित्रे काढणे, तसेच बसचे विद्रुपीकरण करण्याचे प्रकार सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते राजू बापू चौधरी यांनी परखड मत व्यक्त करत प्रशासन, शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना जागे होण्याचे आवाहन केले आहे.

“सरकारने शिक्षणासाठी मोफत पास दिला, पण काही विद्यार्थ्यांनी त्याचा अर्थच बदलून टाकला. काय चाललंय आमच्या लालपरीत?” असा थेट सवाल राजू बापू चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

एसटी बसमधील सीटचे कव्हर ब्लेडने फाडून त्यातील कुशन (स्पॉन्ज) बाहेर काढून रस्त्यावर फेकणे, मार्कर पेन व करकटकने सीटच्या मागील बाजूस तसेच काचेवर स्वतःची नावे, घाणेरडे शब्द आणि अश्लील चित्रे लिहिणे, असे प्रकार काही बसमध्ये सर्रास होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोट्यवधी रुपये खर्च करून नव्या कोऱ्या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जातात; मात्र काही महिन्यांतच त्यांची अवस्था अत्यंत विद्रुप होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मूक प्रेक्षकही जबाबदार!

या प्रकारातील सर्वात गंभीर बाब म्हणजे काही विद्यार्थी आपल्या डोळ्यादेखत बसची तोडफोड होताना पाहतात; मात्र चुकीचे कृत्य करणाऱ्या मित्राला थांबविण्याचे किंवा वाहकाला माहिती देण्याचे धाडस करत नाहीत. या मूक संमतीमुळेच सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीला प्रोत्साहन मिळत आहे, असे राजू बापू चौधरी यांनी म्हटले आहे.

“आज मागच्या सीटचे एकही कुशन शाबूत राहत नाही. एसटीचे विद्रुपीकरण सुरू आहे. हा केवळ बसच्या नुकसानीचा विषय नाही, तर विद्यार्थ्यांच्या संस्कारांचा आणि सामाजिक जबाबदारीचा प्रश्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“खरंच मुलांना योग्य शिक्षण मिळतंय का?”

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सार्वजनिक मालमत्तेचा सन्मान, सामाजिक जबाबदारी आणि शिस्त यांचे संस्कार देणे गरजेचे आहे. एसटी ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नसून सर्वसामान्यांच्या पैशातून उभी राहिलेली सार्वजनिक सेवा आहे. तिचे नुकसान करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांचेच नुकसान करणे होय.

“ज्यांना सार्वजनिक मालमत्ता जपायची असते, तिचा सन्मान करायचा असतो, हेच शिकवले जात नसेल तर भविष्यात देशाप्रती निष्ठा आणि जबाबदारीची भावना कशी निर्माण होणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“जो आज एसटीची सीट फाडतोय, तो उद्या त्याच एसटीवर दगड फेकणार नाही, याची मला १ टक्काही खात्री वाटत नाही.”

आजच्या पिढीने सार्वजनिक सुविधा सहज उपलब्ध होतात म्हणून त्यांची किंमत कमी समजू नये. एका बसची निर्मिती, देखभाल आणि दुरुस्ती यामागे शासनाचा मोठा खर्च तसेच अनेक कर्मचाऱ्यांचे श्रम असतात. त्यामुळे एसटीचे नुकसान करणे म्हणजे समाजाच्या पैशांचा अपव्यय करण्यास हातभार लावणे आहे.

🔴 आता बस्स झालं! प्रशासनाने जागे व्हा! 🔴

एसटी प्रशासनाला विनंती : प्रत्येक बसमध्ये “बस फाडताना कोणी दिसल्यास वाहकाला कळवा, तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल” अशा आशयाचे स्टिकर लावण्यात यावेत. तसेच उपलब्ध असल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासून तोडफोड करणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

शाळा प्रशासनानेही पुढाकार घ्यावा : महिन्यातून किमान एकदा एसटी कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावून “एसटी ही आपलीच आहे” या विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात यावे. सार्वजनिक मालमत्तेचे महत्त्व, शिस्त आणि जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.

पालक आणि सुजाण विद्यार्थ्यांनीही जबाबदारी स्वीकारावी : आपल्या मित्राकडून बसची तोडफोड होत असल्याचे दिसल्यास त्याला थांबवावे आणि संबंधित प्रकाराची माहिती वाहक किंवा एसटी प्रशासनाला द्यावी. चुकीच्या कृत्याकडे दुर्लक्ष न करता त्याला वेळीच आळा घालणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.

लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी!

“एसटी ही फक्त बस नाही, ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. तिची तोडफोड करून तुम्ही दुसऱ्याचे नव्हे, तर तुमच्या स्वतःच्या सार्वजनिक सुविधांचे नुकसान करत आहात. लालपरीचे संरक्षण करणे ही प्रशासनाइतकीच समाजाची आणि विद्यार्थ्यांचीही जबाबदारी आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते राजू बापू चौधरी यांनी स्पष्ट केले.

एसटीच्या बसचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक मालमत्तेबद्दल जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे.

पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड

 

अमळनेर (जि. जळगाव) : कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक, क्रीडा तसेच संघटनात्मक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीमुळे अमळनेर तालुक्यातील कुस्तीप्रेमी, मल्ल, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पै. प्रताप आबा हे अमळनेर शहरातील सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील सक्रिय आणि परिचित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. तसेच जय हिंद व्यायाम शाळा, अमळनेरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी व्यायाम, क्रीडा आणि मल्लविद्येला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राजे शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेतला आहे.

कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक आणि गौरवशाली क्रीडा प्रकार आहे. ग्रामीण भागातील अनेक होतकरू मल्लांमध्ये गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शन, सरावाची सुविधा आणि स्पर्धेचे व्यासपीठ मिळत नसते. अशा नवोदित मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी आखाडे, व्यायामशाळा, कुस्ती स्पर्धा आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची मोठी जबाबदारी आता पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांच्यावर असणार आहे.

अमळनेर तालुक्यातील कुस्ती क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी मल्लांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक पातळीवर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे तसेच पारंपरिक मल्लविद्येची परंपरा जपण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

त्यांच्या निवडीबद्दल अमळनेर तालुक्यातील कुस्तीप्रेमी, मल्ल, क्रीडाप्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसाला पोलिस प्रशासनाचे उत्तम सहकार्य अमळनेरमध्ये शांतता, सुव्यवस्था व बंधुभावाचे दर्शन; डीवायएसपी विनायक कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा सत्कार

 

अमळनेर : मुस्लिम बांधवांच्या पवित्र ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त अमळनेर शहरात मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात आला. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाचे विशेष कौतुक करण्यात आले.

ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने जुलूस काढला. यावेळी शहरात सर्वधर्मीयांमध्ये बंधुभाव, एकोपा आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळाले. जुलूसादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन व सहकार्य केले.

याबद्दल डीवायएसपी विनायक कोते तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या सहकार्यामुळे सण उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जनाब नासिर हाजी साहेब, माजी नगरसेवक मुक्तार खाटीक, फिरोज मिस्तरी, नगरसेवक नावेद शेख, शकील काजी, वरुण पाटील, जितू ठाकूर, सय्यद अजहर, जुनेद शेख, मुव्हीज सय्यद, जाकीर शेख, बागवान अयाज, इमरान शेख आरिफ, भाया इमरान खाटीक, वसीम पठाण आदी उपस्थित होते.

अमळनेर शहरातील विविध सण-उत्सव शांतता, सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभावाच्या वातावरणात साजरे करण्याची परंपरा असून, ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्तानेही त्याचे दर्शन घडले. ‘शांतता, सुव्यवस्था आणि भाईचारा हीच अमळनेरची ओळख’ असा संदेश या उत्सवातून देण्यात आला.नासिर हाजी साहेब, माजी नगरसेवक मुक्तार खाटीक, फिरोज मिस्तरी, नगरसेवक नावेद शेख, शकील काजी, वरुण पाटील, जितू ठाकूर, सय्यद अजहर, जुनेद शेख, मुव्हीज सय्यद, जाकीर शेख, बागवान अयाज, इमरान शेख आरिफ, भाया इमरान खाटीक, वसीम पठाण आदी उपस्थित होते.

अमळनेर शहरातील विविध सण-उत्सव शांतता, सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभावाच्या वातावरणात साजरे करण्याची परंपरा असून, ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्तानेही त्याचे दर्शन घडले. ‘शांतता, सुव्यवस्था आणि भाईचारा हीच अमळनेरची ओळख’ असा संदेश या उत्सवातून देण्यात आला.

‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेचे रविवारी आयोजन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे शाडू मातीपासून मूर्ती साकारण्याची संधी

अमळनेर : विद्यार्थ्यांसह कला व संस्कृतीची आवड असलेल्या नागरिकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी ‘मूर्तिकार व्हा’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. ही कार्यशाळा साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रोड, अमळनेर येथे होणार आहे.

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना शाडू मातीपासून मूर्ती साकारण्याचे प्राथमिक तंत्र, आकारनिर्मिती आणि कलाकुसरीची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तीकलेची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमामुळे सहभागींच्या कलागुणांना वाव मिळणार असून, पारंपरिक मूर्तीकलेविषयी आकर्षण निर्माण होण्यासही मदत होणार आहे.

सहभागींसाठी आवश्यक साहित्य

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांनी सोबत एक किलो शाडू माती, लाकडी फळी, वाटी, प्लास्टिकचा डबा, रिकामी रिफिल, रद्दी वर्तमानपत्र, पेन्सिल, पाण्याची बाटली आदी साहित्य आणावे.

कला, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरक विचार यांचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन ‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात सामाजिक व राजकीय पुरस्कारांचे थाटात वितरण

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहा’त राज्यस्तरीय सामाजिक व राजकीय पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ व २२ ऑगस्ट रोजी आयोजित या समारोहाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

यंदाचा ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती राजकीय पुरस्कार’ जनता दलाचे नेते तथा मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना, तर ‘सामाजिक (पुरोगामी) पुरस्कार’ माजी आयआरएस अधिकारी व जलसंवर्धन तज्ज्ञ उज्वलकुमार चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप लाल टोपी, बागायतदार रुमाल, २१ हजार रुपये रोख रक्कम आणि ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे होते.

अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना वैचारिक दिशा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारलिंगी समाजाच्या अभ्यासक शमिभा पाटील होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सोशल मीडियावरून येणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले.

“सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणारे सर्वच मेसेज खरे नसतात. मेसेजची खात्री करावी. प्रसंगी लायब्ररीत जाऊन संदर्भ शोधावा. त्यातून आपली वैचारिक बैठक तयार होईल. देशातील लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी ‘जेन-झी’वर (Gen Z) आहे. विद्यार्थ्यांनी विवेकातून परिवर्तन घडवावे,” असे शमिभा पाटील यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, “द्वेषापेक्षा संवादाला महत्त्व द्या. अफवांपेक्षा सत्याची पडताळणी करा. व्यक्तीपूजेपेक्षा विचारांना आणि विभाजनापेक्षा बंधुत्वाला महत्त्व द्या. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्ये आपल्या आचरणात रुजल्यास संविधानाला अभिप्रेत असा समाज निर्माण होईल.”

‘पाण्याच्या प्रश्नावर माणसे तयार करणे हेच योगदान’ — उज्वलकुमार चव्हाण

सत्कारमूर्ती उज्वलकुमार चव्हाण यांनी आपल्या मनोगतात जलसंवर्धनाच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान देणारी माणसे तयार केली, हे त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. आम्ही देखील महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २३८ गावांमध्ये जलक्रांती घडवून आणली आहे. गावात पाण्यासाठी झटणारी माणसे तयार करणे ही आमची प्रेरणा आहे.”

विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाची सवय लावून घ्यावी, जीवनमूल्यांच्या जडणघडणीसाठी वारकरी संप्रदायातील हरिपाठ ऐकावा, तसेच शाळांनी विपश्यना केंद्र सुरू करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मिलन म्हात्रे यांनी जागविल्या साथी गुलाबराव पाटील यांच्या आठवणी

दुसरे सत्कारमूर्ती मिलन म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या कार्याच्या व आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचे स्मरण करत त्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, किरण पाटील, डॉ. शकील जलालोद्दीन शेख, भास्कर बोरसे, किरण पाटील, मगन पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, अनिता पाटील, सुनील पाटील, शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘साथी संदेश’ वक्तृत्व स्पर्धेत प्रशांत बेले प्रथम

स्मृती समारोहाच्या निमित्ताने आयोजित ‘साथी संदेश वक्तृत्व स्पर्धेत’ राज्यभरातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रशांत चिंतामण बेले (संभाजीनगर) याने प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी संजय मोरणकार (मालेगाव) हिने द्वितीय, तर रुपेश जयंत पाटील (जळगाव) याने तृतीय क्रमांक मिळविला. कल्याणी संदीप पाटील (अमळनेर) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. राज्यस्तरीय ‘साथी संदेश वक्तृत्व करंडक’ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली.

साहित्य व नाट्य क्षेत्रातील दिग्गज प्राध्यापक राजेंद्र देशमुख, कविवर्य बी. एन. चौधरी व संजय नेरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर, जे. एस. पाटील, मोनिका पाटील आणि श्रीमती शारदा उंबरकर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी मानले.

सामाजिक बांधिलकी, पुरोगामी विचार, जलसंवर्धन, विद्यार्थी प्रबोधन आणि प्रभावी वक्तृत्वाला व्यासपीठ देणारा हा स्मृती समारोह अमळनेरच्या सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरला.

जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी जगदीश गाढे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नियुक्ती; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

 

अमळनेर/जळगाव : काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जगदीश गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

जगदीश गाढे यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवत सातत्याने पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गाढे यांच्या नियुक्तीचे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या माध्यमातून जळगाव शहरात पक्ष संघटनेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या निवडीबद्दल महानगराध्यक्ष जमील शेख, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सरचिटणीस मुक्ती हरून नकवी, डॉ. ऐश्वर्या राठोड, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, धनंजय चौधरी, जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोनवणे यांच्यासह काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू, असा निर्धार नवनियुक्त उपाध्यक्ष जगदीश गाढे यांनी व्यक्त केला.