धुळे रस्त्यावरील प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव देण्याची शिवप्रेमींची मागणी २९ ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत अधिकृत नामकरणाचा विषय घेण्याची मागणी; नगरपालिकेत ठिय्या आंदोलनासह जोरदार घोषणाबाजी
अमळनेर प्रतिनिधी :अमळनेर शहरातील धुळे रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वाराला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन त्याचे अधिकृत नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबर रोजी शहरातील शिवप्रेमींनी अमळनेर नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच, येत्या २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेसाठी घेऊन प्रवेशद्वाराच्या अधिकृत नामकरणाची घोषणा करावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
धुळे रस्त्यावरील शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी शिवप्रेमींकडून सातत्याने मांडली जात आहे. यापूर्वीही २६ मे २०२६ आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात नगरपालिकेला निवेदने देण्यात आली होती. मात्र, मागणीवर अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसल्याने शिवप्रेमींनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वराज्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देणे ही शिवप्रेमींची भावना असून, या मागणीची दखल घेऊन नगरपरिषदेने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
**२९ ऑक्टोबरच्या सभेकडे लक्ष**
नगरपरिषदेच्या २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रवेशद्वाराच्या नामकरणाचा विषय अधिकृतपणे समाविष्ट करून त्यावर निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबित असल्याने आता सर्वसाधारण सभेत याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर होणार का, याकडे शहरातील शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.
शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीला आता आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले असून, नगरपरिषद प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते आणि सर्वसाधारण सभेत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

