अमळनेरची स्वच्छता विनामूल्य करण्यास ‘आप’ची तयारी; नगरपरिषदेला दोन महिन्यांचे आव्हान कचरा संकलनाचा अतिरिक्त खर्च वाचवून निधी शहर विकासासाठी वापरण्याची मागणी; महेंद्र साळुंके व रामकृष्ण पाटील यांचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी : संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता आणि समाजसेवेच्या विचारांचा वारसा पुढे नेत अमळनेर शहर कचरामुक्त व स्वच्छ करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील कचरा संकलन व स्वच्छतेचे काम विनामूल्य किंवा केवळ प्रत्यक्ष खर्चात करण्याची तयारी ‘आप’चे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंके आणि तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील यांनी दर्शविली आहे.
शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेसाठी नगरपरिषदेकडून लाखो रुपयांची कंत्राटे काढली जातात. मात्र, या कामांसाठी होणारा अतिरिक्त खर्च टाळून उपलब्ध निधी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी वापरता येऊ शकतो, अशी भूमिका ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
टेंडरऐवजी प्रत्यक्ष खर्चात स्वच्छतेची तयारी
कचरा संकलन व स्वच्छतेसाठी कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्याऐवजी हे काम सामाजिक बांधिलकीतून करण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी आवश्यक असणारा प्रत्यक्ष खर्च उपलब्ध करून दिल्यास कोणताही नफा किंवा अतिरिक्त मोबदला न घेता शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाचलेला निधी शहराच्या विकासासाठी वापरा
सत्ता किंवा पद नसले तरी शहराच्या स्वच्छतेची आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी प्रत्येक सामाजिक संघटनेने स्वीकारली पाहिजे. कंत्राट प्रक्रियेतील अनावश्यक खर्च कमी करून तो निधी शहराच्या इतर विकासकामांसाठी वापरावा, अशी मागणीही त्यांनी केली.
नगरपरिषदेला दोन महिन्यांचे प्रायोगिक आव्हान
आपली भूमिका प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्यासाठी नगरपरिषदेने कचरा संकलन व स्वच्छतेची जबाबदारी दोन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर ‘आप’च्या पथकाकडे सोपवावी, असे आवाहन महेंद्र साळुंके व रामकृष्ण चिंतामण पाटील यांनी केले आहे. या कालावधीत स्वच्छतेच्या कामाचा दर्जा आणि परिणाम प्रत्यक्ष पाहता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संत गाडगे महाराज यांच्या विचारांनुसार स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. या भूमिकेतून ‘आप’ने मांडलेल्या प्रस्तावावर नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

