खासदारांच्या गावालाच टँकरने पाणी; डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम
अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील डांगर उर्फ उदयनगर हे विद्यमान खासदार स्मिताताई उदय वाघ यांचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, गावाच्या विकासाचा आणि सत्तेच्या प्रभावाचा दावा केला जात असताना या गावातील नागरिकांना गेल्या सुमारे २५ ते ३० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रा. पवार यांनी म्हटले आहे की, स्मिताताई वाघ यांनी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्षा, विधान परिषद आमदार आणि खासदार अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. त्या पक्षाच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय जबाबदाऱ्यांवर कार्यरत राहिल्या असून अनेक समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. एवढा मोठा राजकीय अनुभव, प्रशासकीय संपर्क आणि सत्तेची ताकद लाभूनही त्यांच्या स्वतःच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम राहिला, ही बाब जनतेच्या दृष्टीने गंभीर आहे.
त्यांच्या मते, टँकरने पाणीपुरवठा करणे हा कायमस्वरूपी उपाय नसून तो शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा उपाय आहे. टँकरद्वारे होणारा पुरवठा अनेकदा अपुरा ठरतो. शिवाय पाण्याच्या गुणवत्तेची व शुद्धतेची खात्री देता येत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावरही त्याचे विपरीत परिणाम होतात. दूषित पाण्यामुळे होणारे आजार, उपचारासाठी करावा लागणारा खर्च आणि ग्रामीण भागातील अपुरी आरोग्य व्यवस्था यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अधिक कठीण बनते.
प्रा. पवार यांनी पत्रकात प्रश्न उपस्थित केला आहे की, “जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीकडे सत्तेची विविध पदे, प्रशासकीय अनुभव आणि निर्णयक्षमतेची संधी असते, तेव्हा सर्वप्रथम आपल्या मतदारसंघातील आणि गावातील मूलभूत प्रश्न सुटणे अपेक्षित असते. मात्र डांगर उर्फ उदयनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम असल्याने सत्ता नेमकी कोणासाठी आणि कशासाठी वापरली जात आहे, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.”
ते पुढे म्हणतात की, “स्मिताताई वाघ यांच्याबाबत कोणताही व्यक्तिगत आकस, द्वेष किंवा राजकीय वैरभाव नाही. त्या गंभीर आजाराशी झुंज देत असूनही सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत, याबद्दल आदर आहे. मात्र सार्वजनिक जीवनातील कार्याचे मूल्यमापन हे जनतेच्या प्रश्नांच्या निराकरणावरूनच होत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेली चार दशके सक्रिय राहून, विविध महत्त्वाची पदे भूषवून आणि केंद्र व राज्यात दीर्घकाळ सत्ता असतानाही गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.”
प्रा. पवार यांनी असेही नमूद केले की, गेल्या बारा वर्षांपासून राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांवर भाजपची सत्ता विविध स्वरूपात राहिली आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या गावासाठी एखादी दीर्घकालीन पाणीपुरवठा योजना, जलस्रोत विकास, जलजीवन मिशन अथवा अन्य कोणत्याही योजनेचा प्रभावी वापर करून प्रश्न मार्गी लावता आला असता. मात्र तसे झालेले दिसत नाही.
“डांगरचे नाव बदलून उदयनगर झाले, पण गावकऱ्यांच्या जीवनात पाण्याचा खरा उदय झाला नाही. आजही महिलांना, ज्येष्ठांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. पिण्याचे पाणी ही चैनीची नव्हे तर मूलभूत मानवी गरज आहे. ती पूर्ण करण्यात यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असतील तर त्याबाबत प्रश्न विचारलेच गेले पाहिजेत,” असेही त्यांनी म्हटले आहे.
शेवटी प्रा. अशोक पवार यांनी सत्ता ही ग्रामीण, गरीब, वंचित, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनमान उन्नतीसाठी वापरली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
प्रा. अशोक पवारउपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), जळगाव जिल्हा.


