ब्रेकिंग
सरकारी नोकरांच्या पतसंस्थेत लेखापरीक्षण शुल्काचा कोट्यवधींचा घोटाळा? १५ लाखांच्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क अदा केल्याचा आरोप; ७ ते ८ कोटींच्या संभाव्य आर्थिक नुकसानीची चौकशी व वसुलीची मागणी

 

अमळनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी पतसंस्थेने सन २००९-१० ते २०२५-२६ या कालावधीत नियमित व विशेष लेखापरीक्षणापोटी अदा केलेल्या शुल्काची शासन निर्णयानुसार सखोल चौकशी करावी, अशी मागणी संस्थेचे सभासद व संचालकांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या २९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार लेखापरीक्षण शुल्काच्या निर्धारित मर्यादेचे पालन झाले आहे किंवा नाही, याची वर्षनिहाय तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संस्थेच्या वार्षिक अहवालांतील नोंदीनुसार संबंधित कालावधीत लेखापरीक्षण शुल्कापोटी मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. विशेषतः २०२५-२६ या आर्थिक वर्षात १ कोटी ६ लाख ७९ हजार २०५ रुपये शुल्क अदा केल्याची नोंद असल्याचे निवेदनात नमूद आहे.

 

लेखापरीक्षण शुल्काची बिले, व्हाउचर, बँक व्यवहार, नियुक्ती आदेश, संचालक मंडळाचे ठराव तसेच नियमित व विशेष लेखापरीक्षणाचे स्वतंत्र शुल्क यांची तपासणी करावी. शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जादा रक्कम अदा झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित तत्कालीन अध्यक्ष, व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तींकडून सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८३ व ८८ अन्वये कायदेशीर कार्यवाही करून रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

या प्रकरणात संस्थेचे जवळपास ७ ते ८ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, संबंधित आर्थिक व्यवहारांची व बँक खात्यांतील पैशांच्या व्यवहारांचीही तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच १३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत लेखापरीक्षण अहवाल व नियुक्तीबाबत नोंदविलेल्या हरकतींची चौकशी होईपर्यंत संबंधित विषयांना स्थगिती द्यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

 

या तक्रारीवर १५ दिवसांच्या आत दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी; अन्यथा सहकार आयुक्त तथा निबंधक, पुणे आणि उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा रावसाहेब मांगो पाटील तक्रारदारांनी दिला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर; शहरातील १८ प्रभागांत विशेष स्वच्छता मोहीम सुरू! नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेसाठी यंत्रणा मैदानात

 

अमळनेर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावे, यासाठी नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १८ मध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरपालिकेच्या दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात शहरातील बाजारपेठा, प्रमुख रस्ते, अंतर्गत मार्ग तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढते. या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत नगरपालिका प्रशासनाने सर्व १८ प्रभागांमध्ये स्वच्छता यंत्रणा कार्यान्वित केली आहे. परिसरातील स्वच्छता, कचरा संकलन आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

ही मोहीम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे व संतोष जाधव हे मोहिमेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत.

सणासुदीच्या काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून नागरिकांनाही आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील स्वच्छतेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आधार संस्थेच्या ‘स्वामिनी’ प्रकल्पातून महिलांना स्वयंरोजगाराची नवी दिशा! १२ दिवसीय आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण पूर्ण; १० गावांतील २५ महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण

 

अमळनेर (प्रतिनिधी) : महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आधार बहुउद्देशीय संस्थेच्या ‘स्वामिनी’ प्रकल्पांतर्गत आयोजित १२ दिवसीय आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षणात १० गावांतील २५ महिलांनी सहभाग घेतला.

 

प्रशिक्षणादरम्यान महिलांना बेसिकपासून अॅडव्हान्स स्तरापर्यंत आकर्षक कृत्रिम दागिने तयार करण्याचे तसेच व्यावसायिक पद्धतीने व्यवसाय उभारण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालिका लीना प्रवीण पाटील होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून उमेद अभियानाच्या सीमा पाटील व ज्योती भावसार उपस्थित होत्या. महिलांनी तयार केलेल्या दागिन्यांच्या विक्रीसाठी विविध प्रदर्शने, कार्यक्रम आणि मंगलग्रह मंदिरातील उपक्रमांमध्ये स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबत लीना पाटील यांनी सहकार्याची तयारी दर्शविली.

 

उमेद अभियानाच्या सीमा पाटील यांनी ज्वेलरी व्यवसायातील बाजारपेठेच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. ज्योती भावसार यांनी महिलांनी तयार केलेल्या दागिन्यांचे कौतुक केले. आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी महिलांनी कौशल्याच्या बळावर उद्योजकतेकडे वाटचाल करून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन केले. कार्यकारी संचालिका रेणू प्रसाद यांनीही महिलांच्या कलाकुसरीचे कौतुक केले.

 

प्रशिक्षिका नयना राजपूत यांनी व्यवसाय नियोजन, ग्राहकांच्या गरजा आणि व्यवसाय विस्ताराबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे प्रशिक्षण सुरू असतानाच काही महिलांना दागिन्यांच्या ऑर्डर्स मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

यावेळी आधार संस्थेचे दीपक संदांशिव, भावना सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामिनी प्रकल्प समन्वयक मुरलीधर बिरारी यांनी केले. उर्जिता शिसोदे, अमित देशमुख व ओम संदांशिव यांनी विशेष सहकार्य केले.

‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया’ उपक्रमाला प्रतिसाद धुळे जिल्ह्यातील लोटन पाटील व त्यांच्या मातोश्रींकडून दिवाळी फराळ सुपूर्द

 

अमळनेर (प्रतिनिधी) : गरजवंतांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने सुरू केलेल्या ‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…’ या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

धुळे जिल्ह्यातील काळखेडे येथील मूळ रहिवासी व सध्या धुळे येथे डिजिटल मार्केटिंग आणि डिझायनिंग व्यवसाय करणारे लोटन शरद पाटील (कचवे) यांनी आपल्या मातोश्री मथुराबाई पाटील यांच्यासह स्वखर्चाने दिवाळी फराळ आणून मंगळग्रह सेवा संस्थेकडे सुपूर्द केला.

संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व डी. ए. सोनवणे यांनी फराळ स्वीकारून पाटील माता-पुत्रांचा सेवाभावाबद्दल सन्मान केला.

संस्थेने दिवाळी फराळासह नवीन किंवा सुस्थितीतील कपडे, अन्नधान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तू गरजूंना देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाचे जळगाव व धुळे जिल्ह्यांतून कौतुक होत असून अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे.

अमळनेरात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन! मैदानी व लेखी परीक्षेसह आवश्यक कागदपत्रांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन; ५ नोव्हेंबरला प्रताप महाविद्यालयात शिबिर

 

अमळनेर (प्रतिनिधी) : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अमळनेर शहर व तालुक्यातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या शिबिरात पोलीस भरती क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून उमेदवारांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव) यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा तसेच भरतीसाठी लागणारी विविध कागदपत्रे याबाबत उमेदवारांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. मैदानी परीक्षेची तयारी कशी करावी, लेखी परीक्षेचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन कसे असावे, तसेच अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

हे प्रशिक्षण शिबिर गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता कै. काकासाहेब शंकरराव राणे सभागृह, प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे होणार आहे.

अमळनेर शहर व तालुक्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. समाधान मैराळे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’

 

अमळनेर : पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अमळनेर येथील युवा पत्रकार डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

 

नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘कोण होणार करोडपती’ फेम शरद राजपूत आणि अभिनेत्री रिया चित्ते यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि समाजहिताच्या उपक्रमांमधील योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या सन्मानाबद्दल डॉ. मैराळे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

डॉ. ईश्वर पाटील यांची राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड

 

पारोळा : सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ (टेहू), पारोळा संचलित राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त डॉ. ईश्वर एस. पाटील यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झाली आहे.

डॉ. पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, विद्यार्थी विकास, अध्यापन कौशल्य, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, शिक्षक प्रशिक्षण तसेच विविध शासकीय शैक्षणिक योजनांच्या जनजागृतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची या निवडीद्वारे दखल घेण्यात आली आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. वंदना एस. पाटील, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव मोरे, संचालक ॲड. रोहन मोरे, पराग मोरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीमुळे संस्थेसह महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग; अनिल पाटील यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची चर्चा! भुजबळांच्या निवासस्थानी दिग्गज नेत्यांची खलबते; माजी मंत्री अनिल पाटील यांना तातडीने मुंबईत पाचारण

 

 

अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील घडामोडींनी वेग घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली वाढल्या असून, मुंबईत राजकीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू असतानाच अमळनेरचे आमदार तथा माजी मंत्री अनिल पाटील यांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय रणनीतीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक होत असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकांमधून पक्षाची पुढील दिशा, मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल आणि संघटनात्मक निर्णयांबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, माजी मंत्री अनिल पाटील यांना अचानक मुंबईत येण्याचा निरोप मिळाल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. निरोप मिळताच ते मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात किंवा फेरबदलात अनिल पाटील यांना पुन्हा संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

विशेष म्हणजे, अनिल पाटील यांनी मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत थेट भाष्य करणे टाळले असून, जिल्हा बँकेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबई दौऱ्याचा नेमका राजकीय संदर्भ काय, याबाबत उत्सुकता कायम आहे.

 

अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या संभाव्य मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चेमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

 

अमित शहांची भेट, राष्ट्रवादीच्या दिग्गजांची बैठक आणि अनिल पाटील यांना आलेले तातडीचे निमंत्रण… या राजकीय घडामोडींमुळे अनिल पाटील यांचे मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक होणार का, याकडे आता अमळनेरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ विविध मागण्यांचे निवेदन; तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्यामार्फत सादर

 

अमळनेर (प्रतिनिधी) : दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी तसेच वंचित घटकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि मागण्यांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून २२ विषयांचे निवेदन तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्यामार्फत सादर करण्यात आले.

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांच्या अडचणी, आदिवासी बांधवांचे हक्क आणि वंचित घटकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे, हा या निवेदनामागील प्रमुख उद्देश आहे. संबंधित मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या वेळी लोकसंघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे, निलाबाई भिल, आनंद पवार, शरद पाटील, शंकर भिल, गणेश माळी, राजेंद्र पारधी, मधुकर चव्हाण, गणेश पारधी, संजय बारेला, जयदेव पारधी, शांताराम पारधी, हेमंत दाभाडे, भुरा पारधी, धनराज पारधी आदी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांच्या न्याय्य हक्कांची पूर्तता करावी, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

बांधिलकी प्रतिष्ठानच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी बापूराव पाटील (ठाकरे) यांची नियुक्ती सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल; अमळनेरच्या शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमरावती येथील साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या बांधिलकी प्रतिष्ठानच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अमळनेर येथील शिक्षक व पत्रकार बापूराव पाटील (ठाकरे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत प्रतिष्ठानच्या निवड समितीने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. १ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांना संस्थेच्या वतीने अधिकृत नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. नीता प्रभाकर कचवे यांनी नियुक्तिपत्राद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मराठी भाषेची अस्मिता जपणे, भाषेचा प्रचार व प्रसार करणे, तसेच साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, या प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

बापूराव पाटील (ठाकरे) हे अमळनेर येथील साने गुरुजी विद्यामंदिरात शिक्षक म्हणून कार्यरत असून, दैनिक बातमीदार न्यूजचे ब्युरो चीफ आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असून विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांतही ते योगदान देत असतात.

या नवनियुक्त पदाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या या नियुक्तीमुळे अमळनेरच्या शैक्षणिक, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.