शिरूड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डिजिटल फ्लेक्सचे अनावरण महापुरुषांचे विचारच देशात क्रांती घडवू शकतात : गौतम अनिल पाटील
अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथे बौद्ध वस्तीजवळ उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिजिटल फ्लेक्सचे अनावरण जयनील फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील यांच्या हस्ते रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

गौतम पाटील यांचे शिरूड येथे आगमन होताच वाजतगाजत स्वागत करण्यात आले. गावाच्या प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर पायी रॅली काढत गौतम पाटील कार्यक्रमस्थळी दाखल झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर होते.
व्यासपीठावर माजी सरपंच बापूराव महाजन, माजी पोलीस पाटील विश्वास महाजन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. चंद्रकांत नेतकर, तालुकाध्यक्ष यशवंत बैसाणे, संघटक प्रमुख अरुण घोलप, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख जुबेर मेवाती, संघटक साबीरभाई मेवाती, दिव्यांग आघाडी प्रमुख भटू बिहऱ्हाडे, माजी उपसरपंच भगवान सोनवणे, अतुल सोनवणे, सुनील पाटील, नंदू पाटील, संदीप भिला पाटील, विनोद सोनवणे व अंकित सोनवणे उपस्थित होते.
यावेळी गौतम पाटील म्हणाले की, शिरूड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या नामकरण सोहळ्यासाठी निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशात क्रांती घडवू शकतात.
जयनील फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्ताची मदत, रुग्णालयीन उपचारांसाठी सहकार्य तसेच आरोग्यविषयक अडचणी सोडविण्यासाठी संस्था सदैव तत्पर राहील. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठीही फाउंडेशन कटिबद्ध आहे. अधिकाधिक तरुणांनी फाउंडेशनशी जोडावे. त्यांच्या सामाजिक कार्यामागे संस्था खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात डी. ए. धनगर यांनी महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत या उपक्रमाचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनीही मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक आरपीआयचे तालुकाध्यक्ष यशवंत बैसाणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सन २०२७ च्या भीम जयंतीचे अध्यक्ष रोशन बैसाणे, उपाध्यक्ष साहिल बैसाणे, उमेश बैसाणे, बाळासाहेब बैसाणे, बुद्धभूषण बैसाणे, रत्नदीप बैसाणे, नितीन बैसाणे, सिद्धार्थ बैसाणे, राहुल बैसाणे, आदित्य बैसाणे, अभिषेक वानखेडे, प्रशिककुमार बैसाणे, लोकेश मोरे, कृष्णा मोरे, निलेश बैसाणे, तुषार वाघ, दीपक सोनवणे, निखिल बाविस्कर, भाऊसाहेब बैसाणे, किरण बैसाणे, नंदलाल बैसाणे, रवींद्र बैसाणे, रतन बैसाणे व प्रवीण बैसाणे यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन अरुण घोलप व प्रा. चंद्रकांत नेतकर यांनी केले, तर आभार अतुल सोनवणे यांनी मानले.
