आधार संस्थेच्या ‘स्वामिनी’ प्रकल्पातून महिलांना स्वयंरोजगाराची नवी दिशा! १२ दिवसीय आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण पूर्ण; १० गावांतील २५ महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण
अमळनेर (प्रतिनिधी) : महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आधार बहुउद्देशीय संस्थेच्या ‘स्वामिनी’ प्रकल्पांतर्गत आयोजित १२ दिवसीय आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षणात १० गावांतील २५ महिलांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणादरम्यान महिलांना बेसिकपासून अॅडव्हान्स स्तरापर्यंत आकर्षक कृत्रिम दागिने तयार करण्याचे तसेच व्यावसायिक पद्धतीने व्यवसाय उभारण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालिका लीना प्रवीण पाटील होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून उमेद अभियानाच्या सीमा पाटील व ज्योती भावसार उपस्थित होत्या. महिलांनी तयार केलेल्या दागिन्यांच्या विक्रीसाठी विविध प्रदर्शने, कार्यक्रम आणि मंगलग्रह मंदिरातील उपक्रमांमध्ये स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबत लीना पाटील यांनी सहकार्याची तयारी दर्शविली.
उमेद अभियानाच्या सीमा पाटील यांनी ज्वेलरी व्यवसायातील बाजारपेठेच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. ज्योती भावसार यांनी महिलांनी तयार केलेल्या दागिन्यांचे कौतुक केले. आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी महिलांनी कौशल्याच्या बळावर उद्योजकतेकडे वाटचाल करून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन केले. कार्यकारी संचालिका रेणू प्रसाद यांनीही महिलांच्या कलाकुसरीचे कौतुक केले.
प्रशिक्षिका नयना राजपूत यांनी व्यवसाय नियोजन, ग्राहकांच्या गरजा आणि व्यवसाय विस्ताराबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे प्रशिक्षण सुरू असतानाच काही महिलांना दागिन्यांच्या ऑर्डर्स मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आधार संस्थेचे दीपक संदांशिव, भावना सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामिनी प्रकल्प समन्वयक मुरलीधर बिरारी यांनी केले. उर्जिता शिसोदे, अमित देशमुख व ओम संदांशिव यांनी विशेष सहकार्य केले.

