अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग; अनिल पाटील यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची चर्चा! भुजबळांच्या निवासस्थानी दिग्गज नेत्यांची खलबते; माजी मंत्री अनिल पाटील यांना तातडीने मुंबईत पाचारण
अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील घडामोडींनी वेग घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली वाढल्या असून, मुंबईत राजकीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू असतानाच अमळनेरचे आमदार तथा माजी मंत्री अनिल पाटील यांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय रणनीतीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक होत असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकांमधून पक्षाची पुढील दिशा, मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल आणि संघटनात्मक निर्णयांबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, माजी मंत्री अनिल पाटील यांना अचानक मुंबईत येण्याचा निरोप मिळाल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. निरोप मिळताच ते मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात किंवा फेरबदलात अनिल पाटील यांना पुन्हा संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, अनिल पाटील यांनी मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत थेट भाष्य करणे टाळले असून, जिल्हा बँकेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबई दौऱ्याचा नेमका राजकीय संदर्भ काय, याबाबत उत्सुकता कायम आहे.
अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या संभाव्य मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चेमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
अमित शहांची भेट, राष्ट्रवादीच्या दिग्गजांची बैठक आणि अनिल पाटील यांना आलेले तातडीचे निमंत्रण… या राजकीय घडामोडींमुळे अनिल पाटील यांचे मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक होणार का, याकडे आता अमळनेरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

