ब्रेकिंग
श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा २७ विद्यार्थिनींची संविधान दिनानिमित्त भाषणे; उत्कृष्ट वक्त्यांचा गौरव

 

अमळनेर प्रतिनिधी : खा.शि.मं. संचलित श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन सकाळ व दुपार अशा दोन्ही विभागांत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाचे वाचन करण्यात आले व संविधान दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी होत्या. यावेळी उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आर. एस. सोनवणे तसेच शिक्षकेतर प्रतिनिधी श्री. शामभाऊ पवार उपस्थित होते.

 

प्रमुख वक्त्या श्रीमती वाय. एम. पाटील व श्रीमती मीनाक्षी पाटील यांनी भारतीय संविधानाविषयी सखोल माहिती देत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. संविधानाची निर्मिती, त्यातील मूलभूत तत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींची मने जिंकली.

 

या कार्यक्रमात एकूण २७ विद्यार्थिनींनी संविधान दिनानिमित्त भाषणे करून आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार प्राप्त झाले असून विद्यार्थिनींनी या अधिकारांचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन केले. संविधानाने दिलेली समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जीवनात अंगीकारण्याचे महत्त्वही त्यांनी सांगितले.

 

भारतीय संविधान हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा असून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा जागर करणारा महान ग्रंथ आहे. संविधानाच्या प्रेरणेने प्रत्येकाने आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे विचार त्यांनी व्यक्त केले. तसेच संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

उत्कृष्ट भाषण करणाऱ्या कु. मयुरी महाजन, वैष्णवी पाटील, रुश्वी साळुंखे, नव्या पाटील आणि तनिष्का पाटील यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी संघप्रमुख श्रीमती पी. व्ही. साबे व सौ. पी. एस. सराफ यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती टी. आर. चव्हाण व श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी केले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *