महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
वसुबारसनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात गोमाता व गोवत्साचे विधिवत पूजन
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी वसुबारस (गोवत्स द्वादशी) हा सण भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले यांच्या शुभहस्ते गोमाता आणि गोवत्साचे (वासराचे) पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांच्यासह मंदिराचे पुरोहित व सेवेकरी उपस्थित होते. धार्मिक वातावरणात हा पूजन सोहळा पार पडला.

माणुसकीच्या दिवाळी उपक्रमानिमित्त घरोघरी गोडवा वाटपास प्रारंभ मंगळग्रह सेवा संस्थेने केला अनोरे गावापासून शुभारंभ
अमळनेर : यावर्षी दुष्काळाचे मोठे सावट आहे. या पार्श्वभूमीवर गरजवंत शेतकरी, शेतमजूर व अन्य घटकांच्या घरात दिवाळीच्या फराळाच्या निमित्ताने गोडवा यावा व घर आनंदाने प्रकाशमान व्हावे, यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेने ठिकठिकाणी जाऊन फराळाचे वाटप सुरू केले आहे. त्याचा शुभारंभ गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील अनोरे या गावापासून समारंभपूर्वक करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ. परीक्षेत बाविस्कर, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, सेक्रेटरी प्रा. जयेश गुजराती, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, रवींद्रसिंगजी कालरा, डॉ. रवींद्र जैन उपस्थित होते.
प्रारंभी श्री मंगळग्रह देवतेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीपासून आपण सारे सुरक्षित राहोत. गाव सुखी, समृद्ध व निरोगी राहो यासाठी श्री मंगळग्रह मंदिराचे मुख्य पुरोहित शुभम वैष्णव गुरुजी व वैभव लोकाक्षी यांनी मंत्रोच्चार आणि प्रार्थना केली.
यावेळी प्रास्ताविकात मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी सदर उपक्रमाचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्या सर्वांनी गरजवंतांना फराळ, कपडे, अन्नधान्याच्या रूपात मदत करण्याचे आवाहन केले. मंगळग्रह सेवा संस्था करीत असलेल्या सर्व प्रयत्नांची आणि उपक्रमांची माहिती दिली.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे म्हणाले, की दुष्काळ असला तरीही आपण सर्वांनी लढवय्या वृत्तीने संकटाशी सामना करू. शासन आपल्या पाठीशी आहे. शासनाने देऊ केलेली मदत जर कोणाला प्राप्त झाली नसेल तर त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा. शासनाच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते सर्वतोपरी आम्ही सहकार्य करू. खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या, की ‘जेथे कमी तेथे आम्ही’ हे मंगळग्रह सेवा संस्थेचे जणू ब्रीद झाले आहे. त्यांच्यासोबतच रोटरी क्लब, लायन्स क्लब व आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे ठामपणे उभे राहू. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना मिळून काम करणे गरजेचे आहे. मंगळग्रह सेवा संस्थेने घेतलेला पुढाकार आणि उचललेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. सर्वांनी त्यांना समर्थन द्यावे व सक्रिय सहकार्य करावे.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी व मंदिराच्या सेवेकऱ्यांनी तसेच आर्डी-अनोरे येथील विविध संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. आर्डी-अनोरे परिसरातील शेकडो गरजवंतांना फराळाची पाकिटे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. याप्रसंगी दुष्काळजन्य परिस्थितीचे उचित भान राखून सामाजिक बांधिलकीतून जोपासलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे अनोरेतील ग्रामस्थांनी तोफ्लडभरून कौतूक केले आणि पुढील वाटचालीसाठी ‘मंगलमय’ शुभेच्छाही दिल्या. संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम व मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
चौकट…)
‘अनोरे’ अनेक बाबतींत आदर्श!
अनोरे हे गाव तसे छोटे आहे. मात्र, अनेक बाबतींत आदर्श आहे. तेथे कोणत्याही प्रकारचे शह-काटशहाचे राजकारण नाही. सर्व जाती-धर्मांमध्ये एकोपा आहे. कोणतेही भांडण किंवा वादविवाद नाहीत. तिथे एक गाव-एक गणपती साजरा केला जातो. मात्र, गावाला पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य होते. शेती व्यवसाय पार कोलमडला होता. या पार्श्वभूमीवर मंगळग्रह सेवा संस्थेने हे गाव दत्तक घेतले. या गावाला पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत उतरवले. संस्थेने तालुक्यातील सर्व समाजसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक संस्था, शासन यांच्या सहकार्याने प्रचंड मेहनत घेऊन आणि ग्रामस्थांचे मजबूत समर्थन मिळून गावाला २५ लाख रुपयांचे राज्यस्तरीय तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले. अनोरे गाव मंगळग्रह सेवा संस्थेने दत्तक घेतल्यानेच फराळवाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ याच गावापासून करण्यात आला.

अमळनेर शहरात ४०० ते ५०० अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट! सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे बॅनर हटवा; संबंधितांवर गुन्हे दाखल करा – जितेंद्र संदानशिव यांची पोलीस निरीक्षकांकडे तक्रार
अमळनेर : शहरातील मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विद्युत व पथदिव्यांच्या खांबांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले अंदाजे ४०० ते ५०० बॅनर, जाहिरात फलक व होर्डिंग्ज तातडीने हटविण्यात यावेत. तसेच विनापरवानगी बॅनर लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणारे आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जितेंद्र अनिल संदानशिव यांनी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
सदानशिव यांनी ५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमळनेर शहरातील विविध मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले आहेत. विशेषतः विद्युत खांब व पथदिव्यांच्या खांबांवर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे बॅनर किंवा त्यांचे लोखंडी सांगाडे खाली कोसळल्यास वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ शहराच्या विद्रुपीकरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या तक्रारीत महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम, १९९५ मधील कलम ३ व ४, तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८५ व १२५ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी नसताना सार्वजनिक मालमत्तेवर जाहिरात फलक लावून विद्रुपीकरण केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी. सार्वजनिक मार्गावर अडथळा किंवा धोका निर्माण करणे तसेच निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणे याबाबतही कायद्यानुसार तपास करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शहरातील सर्व बॅनरची तातडीने पाहणी करून त्यांची अधिकृत परवानगी तपासावी, बॅनर लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे व जाहिरातदारांची ओळख पटवावी आणि बॅनर लावण्याचे आदेश देणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका पोहोचवणारे बॅनर हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दखलपात्र गुन्हा निष्पन्न झाल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १७३ अन्वये प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी अंतिम मागणी संदानशिव यांनी केली आहे.
या तक्रारीसोबत विद्युत खांबांवरील व मुख्य रस्त्यांवरील बॅनरची छायाचित्रे जोडण्यात आली असून, आवश्यकतेनुसार बॅनर लावलेल्या ठिकाणांची यादीही उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.


