ब्रेकिंग
संविधान चौकात उद्देशिका वाचनातून संविधान मूल्यांचा जागर राष्ट्रभक्तीपर गीतांनी परिसर भारावला; संविधान चौकाच्या सुशोभीकरणासाठी नगराध्यक्षांचा सकारात्मक प्रतिसाद

 

अमळनेर : ७७ व्या संविधान दिनानिमित्त पिंपरी रोड येथील संविधान चौकात राष्ट्रभक्तीपर गीतांचे सादरीकरण आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. युवा कल्याण प्रतिष्ठान व संविधान जागर अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमातून संविधान मूल्यांचा जागर करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रा. डॉ. राहुल निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक पवार होते.

यावेळी संविधान चौकाच्या सुशोभीकरणासंदर्भातील निवेदन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना देण्यात आले. नगराध्यक्षांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. आगामी २६ जानेवारी २०२७ रोजी संविधान चौकात भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच दरवर्षी संविधान चौकात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

 

कार्यक्रमात दिशा संदनशिव, सुनीता मोरे, भारती कोळी, निवेदिता कापडणेकर यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

 

याप्रसंगी बापूराव ठाकरे, भारती गाला, गौतम मोरे, गौतम सपकाळे, नरसिंह वाघ, देवदत्त संदनशिव, अरुण सोनटक्के, अशोक बिराडे, हृदयनाथ मोरे, अजय भामरे, किशोर गव्हाणे, चिंधु वानखेडे तसेच धम्मदीप फाउंडेशनचे सर्व संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संविधान चौकाच्या सुशोभीकरणाच्या मागणीला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि आगामी प्रजासत्ताक दिनी भव्य कार्यक्रमाचे नियोजन यामुळे संविधान चौकाच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *