महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त अमळनेरात तीन दिवसीय प्रबोधन व्याख्यानमाला पत्रकार अशोक वानखेडे, डॉ. दीपक पवार आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांची व्याख्याने; संत परंपरा, सत्यशोधक विचार आणि सामाजिक न्यायावर होणार मंथन
अमळनेर प्रतिनिधी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त (१८२७–२०२७) अमळनेर येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर आणि पुरोगामी संघटनांच्या वतीने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून, यात संविधान, लोकशाही, सामाजिक विद्रोह, सत्यशोधक स्त्रीवाद आणि सामाजिक न्याय या विषयांवर विचारमंथन होणार आहे.
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘२०० वे विचारांचा वारसा, समतेच्या भविष्यसाठी’ हा संदेश घेऊन आयोजित या व्याख्यानमालेत नामवंत पत्रकार, लेखक, विचारवंत आणि सामाजिक अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.

व्याख्यानमालेची सुरुवात सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ‘संविधान, लोकशाही आणि जनतेचा आवाज’ या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. रणजित शिंदे, मुख्याध्यापक तथा अर्बन बँक, अमळनेरचे माजी व्हाईस चेअरमन व संचालक, तसेच श्री. किरण माळी सर, संचालक, IKD मॅथ्स अकॅडमी, अमळनेर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार, १ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठातील सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांचे व्याख्यान होणार आहे. ‘समकालीन महाराष्ट्रातला विद्रोह’ या विषयातून ते महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणार आहेत. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा आणि प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर हे प्रमुख उपस्थित राहतील.
बुधवार, २ डिसेंबर रोजी प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांचे व्याख्यान होणार असून, ‘सत्यशोधक स्त्रीवाद, जातवास्तव आणि सामाजिक न्याय’ या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी श्रीमती निवेदिता कापडणेकर, मुख्याध्यापिका, शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, अमळनेर आणि प्रा. योगिता पाटील, नगरसेविका, अमळनेर नगरपरिषद या प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या ‘बुडता हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणोनिया ॥’ या अभंगातील लोककल्याणाची भावना केंद्रस्थानी ठेवून संत परंपरा, सत्यशोधक विचार, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्याय यांचा जागर या व्याख्यानमालेतून करण्यात येणार आहे.
सर्व व्याख्याने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत. विचारप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रबोधन व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर व पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
