ब्रेकिंग
राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत मोक्षदा प्रदीप पाटीलची कांस्यपदकावर मोहोर! राणाईचेच्या कन्येने क्रीडा क्षेत्रात उंचावला गावाचा मान; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

 

अमळनेर प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रात जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या राणाईचे येथील मोक्षदा प्रदीप पाटील हिने राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत कांस्यपदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे राणाईचे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

स्क्वॉश फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत मोक्षदाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. खेळातील कौशल्य, आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने कांस्यपदकाला गवसणी घातली. तिच्या या यशाने गावाचा, कुटुंबाचा आणि परिसराचा मान उंचावला आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही मुलींनी आपले कर्तृत्व सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. मोक्षदाने मिळवलेले कांस्यपदक हे नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. सातत्यपूर्ण सराव, योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर यश संपादन करता येते, हे तिने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.

 

मोक्षदाच्या या यशाबद्दल तिचे पालक, प्रशिक्षक, मार्गदर्शक, शिक्षक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले आहे. विशेषतः स्वप्नील पाटील सर यांनी मोक्षदाचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

भविष्यात मोक्षदाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा सदिच्छा व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *