ब्रेकिंग
अखेर अमळनेरचा वादग्रस्त कत्तलखाना जमीनदोस्त! तीन उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे; हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला यश विशेष सभेत ठराव क्रमांक २०२ मंजूर; खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा, ६५ पोलिसांच्या बंदोबस्तात पाडकाम

 

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील बोरी नदीकाठावरील नगरपरिषदेचा वादग्रस्त कत्तलखाना अखेर शनिवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी जमीनदोस्त करण्यात आला. कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून त्याची इमारत पाडण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षक हिंदू संघटनांनी सुरू केलेल्या जनआक्रोश आंदोलनाला अखेर यश आले. नगरपरिषदेच्या विशेष सभेत ठराव क्रमांक २०२ मंजूर झाल्यानंतर प्रशासनाने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पाडकामाची कारवाई केली. या कारवाईनंतर विजय धनराज पाटील, विश्वनाथ मिस्त्री आणि गोपाल वाघ या तीन उपोषणकर्त्यांनी आपले बेमुदत आमरण उपोषण मागे घेतले.

 

विशेष सभेत ठराव; प्रशासनाकडून तातडीने कारवाई

 

कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून जमीनदोस्त करण्याच्या मागणीने आंदोलन तीव्र झाले होते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने कत्तलखान्याच्या जागेची कायदेशीर व तांत्रिक पडताळणी केली. उपलब्ध अभिलेखांनुसार २५ एप्रिल २०२५ रोजी मंजूर विकास आराखड्यात संबंधित जागेवर कत्तलखान्याचे आरक्षण अथवा अस्तित्वातील वापर दर्शविण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झाले. सद्य विकास योजनेत या परिसरात दफनभूमीचा वापर तसेच आरक्षण क्रमांक ६२ अंतर्गत उद्यान दर्शविण्यात आले आहे.

कत्तलखान्याच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नगरपरिषदेने बांभोरी येथील एन.एम.के.सी. अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. महाविद्यालयाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या अहवालात इमारत निष्कासित करण्याची शिफारस केली. नगरपरिषदेचे कायदेशीर सल्लागार ॲड. किरण पाटील यांनीही इमारत निष्कासित करण्याबाबत अभिप्राय दिला.

 

या सर्व बाबींच्या आधारे शनिवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेत तातडीची विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेत ठराव क्रमांक २०२ मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम २६६ (२) अन्वये कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून इमारत निष्कासित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा

 

कत्तलखान्याच्या प्रश्नावर खासदार स्मिता वाघ यांनी अमळनेर येथे उपस्थित राहून नगरपरिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत पाठपुरावा केला. नगरपरिषद उपायुक्त जनार्दन पवार यांनीही अमळनेर येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. विशेष सभेतील ठरावानंतर मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

६५ पोलिसांच्या बंदोबस्तात पाडकाम

 

सायंकाळी पाचच्या सुमारास नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने कत्तलखान्याची इमारत पाडण्याची कारवाई सुरू केली. यावेळी सात पोलीस अधिकारी आणि ६५ पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय गणेश अहिरे, एपीआय साजिद मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड आणि नामदेव बोरकर यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. नगरपरिषदेच्या पथकाने कत्तलखान्याचे पाडकाम पूर्ण केले.

 

तीन उपोषणकर्त्यांचे उपोषण सुटले

 

कत्तलखाना जमीनदोस्त करण्याच्या मागणीसाठी विजय धनराज पाटील, विश्वनाथ मिस्त्री आणि गोपाल वाघ यांनी नगरपरिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. विशेष सभेत ठराव मंजूर होऊन प्रत्यक्ष पाडकाम झाल्यानंतर खासदार स्मिता वाघ, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, नगरसेवक साहेबराव पवार, महेश देशमुख आणि भैरवी पलांडे यांच्या उपस्थितीत तिन्ही उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

 

नगरसेवकांची उपस्थिती

 

विशेष सभेला उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, गटनेते पंकज चौधरी, अपक्ष गटनेते महेश देशमुख, साहेबराव पवार, अनिल महाजन, दीपक चौगुले, सविता संदानशिव, अपूर्वा चौधरी, कैलास पाटील, सुवर्णा हटकर, श्रीराम चौधरी, सुयोग धनगर, रामकृष्ण पाटील, छाया बाळू पाटील, नीलिमा पाटील, कल्पना परदेशी, स्वाती परदेशी, सचिन कासार, प्रवीण पाटील, सचिन पाटील, स्वप्ना पाटील, भरत ललवाणी, विजय पाटील आदी नगरसेवक उपस्थित होते.

 

कत्तलखान्याच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा अखेर इमारतीच्या पाडकामाने शेवट झाला. आता संबंधित जागेचा विकास आराखड्यानुसार पुढील वापर काय असणार, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *