अमळनेरात कत्तलखाने बंद करण्यासाठी विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा नगरपालिकेवर भव्य मोर्चा! कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची ठाम मागणी; तृतीयपंथीयांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील कत्तलखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करून ते जमीनदोस्त करण्यात यावेत, या ठाम मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तृतीयपंथीयांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कत्तलखान्यांच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये असलेली नाराजी या आंदोलनातून प्रकर्षाने समोर आली.
शहरातील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात सहभागी आंदोलकांनी नगरपालिका प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. कत्तलखाने केवळ बंद न करता त्यांचे अस्तित्व कायमस्वरूपी संपवून संबंधित जागा जमीनदोस्त करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नगरपालिकेत नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि प्रभारी मुख्याधिकारी राजपूत यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. कत्तलखान्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.
दरम्यान, खासदार स्मिता वाघ यांनी मोबाईलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत कत्तलखाने तात्काळ बंद करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यामुळे या प्रश्नावर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कत्तलखाने आणि मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
अमळनेर शहरातील कत्तलखान्यांचा प्रश्न आणि मोकाट जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावरून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून ठोस व कायमस्वरूपी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मोर्चानंतर आता कत्तलखाने बंद करण्याबाबत नगरपालिका प्रशासन काय निर्णय घेते, तसेच शहरातील कत्तलखाने आणि मोकाट जनावरांच्या समस्येवर कोणती उपाययोजना केली जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
