संत श्री खुशालदास महाराजांचा पालखी सोहळा अमळनेरात उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी : भावसार क्षत्रिय समाजाचे श्रद्धास्थान असलेले संत श्री खुशालदास महाराज (फैजपूर निवासी) यांचा पालखी सोहळा मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी अमळनेर येथे भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी समाजबांधवांनी जयघोष करत पालखी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात भावसार मढी येथे हिंगलाज माता व इतर देवतांना माल्यार्पण करून आरतीने करण्यात आली. भंडारा उत्सव व अन्नदानासाठी देणगी देणारे समाजबांधव श्री. नारायण रघुनाथ शेठ भावसार यांच्या मातोश्री, अॅड. श्री. सी. जी. भारोटे तसेच पुणे येथील श्री. राजेंद्र लिलाचंदशेठ सारजे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखीचे पूजन करून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.

पालखी मिरवणूक सराफ बाजार, दगडी दरवाजा व शिवाजी मार्केट मार्गे वाजतगाजत काढण्यात आली. शिवाजी मार्केट येथील संत श्री खुशालदास महाराज यांच्या स्मारकावरील प्रतिमेस समाजाध्यक्ष व उत्सव समितीच्या चेअरमन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. भावसार चौकात आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर कारंजा चौक मार्गे भक्त निवास, वाडी संस्थान व वाडी चौक येथे पालखी मिरवणुकीचा समारोप झाला.
समारोपस्थळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील बंधू-भगिनींसह बालगोपालांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यास जळगाव जिल्ह्याच्या खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांनी तसेच इतर मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थिती दर्शविली.
पालखी सोहळ्यात भावसार क्षत्रिय समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, तरुण वर्ग व बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, महिला मंडळ आणि समाजबांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.
