बांधिलकी प्रतिष्ठानच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी बापूराव पाटील (ठाकरे) यांची नियुक्ती सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल; अमळनेरच्या शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन

अमळनेर (प्रतिनिधी) : अमरावती येथील साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या बांधिलकी प्रतिष्ठानच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अमळनेर येथील शिक्षक व पत्रकार बापूराव पाटील (ठाकरे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत प्रतिष्ठानच्या निवड समितीने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. १ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांना संस्थेच्या वतीने अधिकृत नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. नीता प्रभाकर कचवे यांनी नियुक्तिपत्राद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मराठी भाषेची अस्मिता जपणे, भाषेचा प्रचार व प्रसार करणे, तसेच साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, या प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बापूराव पाटील (ठाकरे) हे अमळनेर येथील साने गुरुजी विद्यामंदिरात शिक्षक म्हणून कार्यरत असून, दैनिक बातमीदार न्यूजचे ब्युरो चीफ आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असून विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांतही ते योगदान देत असतात.
या नवनियुक्त पदाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे अमळनेरच्या शैक्षणिक, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

