ब्रेकिंग
विद्यापीठात राज्य स्तरीय विशेष कार्यशाळेत अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग

 

 

जळगाव ( प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र आणि आजीवन अध्ययन विस्तार शिक्षण विभाग आयोजित *चार भिंतीच्या पलीकडचे शिक्षण : दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे करियर आणि उच्च शिक्षणाची वाटचाल*

‘Beyond Four Walls: Navigating Career and Higher Education Through Distance Mode’

 यावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा सोमवार 28 सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभाग्रहात ही विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.

कुलगुरू प्रा डॉ व्ही. एल माहेश्वरी , प्रकूलगुरु एस टी इंगळे, यू जी सी सहसचिव डॉ एम एम वावरे , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, संचालक प्रा मनीष जोशी, प्रा समीर नारखेडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

उद्बोधन सत्र पहिल्या सत्रात डॉ विलास जैन, दुसऱ्या सत्रात कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्राचार्य डॉ अनिल राव यांनी मार्गदर्शन केले.

समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्रा डॉ विजयकुमार वाघमारे, प्रा डॉ भरत खंडागळे यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठे यांनी प्रदर्शन भरविले होते.

माहिती अधिकार दिनी विद्यार्थ्यांना कायद्याची ओळख; विविध स्पर्धांतून जनजागृती सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात उपक्रम

 

भडगाव प्रतिनिधी :

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय येथे २८ सप्टेंबर रोजी ‘माहिती अधिकार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय तसेच सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार नागरिकांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. ए. बी. अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४(१), कलम २(ब), कलम ६, कलम ७, कलम ८(१), कलम ८(२) व कलम २३ याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सी. व्ही. बिऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री. ए. बी. तायडे, ज्येष्ठ शिक्षक श्री. एन. के. सोनजे तसेच इतिहासाचे अभ्यासक श्री. बी. ए. पाटील यांनी मार्गदर्शन केले. माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी मिळालेला महत्त्वपूर्ण अधिकार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्र विषयातील संकल्पनांची उजळणी होऊन लोकशाही, संविधान आणि नागरिकांचे अधिकार याबाबत अधिक सखोल माहिती मिळाली.

माहिती अधिकार दिनानिमित्त विद्यालयात प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला आदी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत माहिती अधिकाराबाबत जनजागृतीचा संदेश दिला.

सौ.  रना देशमुख महाविद्यालयात अग्निवीर भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेला उत्साहात सुरवात

भडगाव ( प्रतिनिधी) : येथील सौ र ना देशमुख महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकार पुरस्कृत सहा दिवसाच्या अग्निवीर भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री महेशजी टाक यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी प्रत्येक मुलाने अग्निवीर सैनिक बनावे म्हणजे शिस्त बद्ध समाज तयार होईल असे विचार मांडले. आजच्या पहिल्या दिवशी प्रशिक्षक म्हणून जळगाव येथील पोलिस कॉन्स्टेबल व खेळाडू मा. स्वप्नील परदेशी यांनी अग्निवीर, पोलिस, व सैन्यदलात भरती होण्यासाठी काय तयारी करावी व शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे नीट ठेवावे म्हणजे यश नक्की मिळते या विषयी माहिती दिली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे स्थानिक व्यवस्थापन परिषद सदस्य मा अमोलदादा पाटील यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची अतिशय सखोल माहिती दिली. पी टी सी संस्थेचे संचालक मा बाबासाहेब विनय जकातदार यांनी विविध खेळ व खेळाडू यांचा संबंध विषद केला त्यासोबतच त्यांनी अग्निवीर सैनिक हे कशी राष्ट्र सेवा करू शकतात यावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड यांनी कार्यशाळेच्या महत्व बद्दल आपले विचार मांडले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ दिनेश तांदळे यांनी केले. सुरेख असे सूत्र संचालन डॉ देवेंद्र मस्की यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने आजच्या दिवसाच्या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. या कार्यशाळेचे सुरेख असे नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रोफेसर डॉ संजय भैसे व सहा महिला अधिकारी प्रा श्रीमती अर्चना टेमकर यांनी केले.

SIRच्या मुद्द्यावर अमळनेर काँग्रेस आक्रमक; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

अमळनेर प्रतिनिधी : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या (S.I.R.) मुद्द्यावरून अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक झाली असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अमळनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या कार्यालयात घोषणाबाजी करत निवेदन सादर केले.

निवेदनाचे स्पष्टीकरण तालुका काँग्रेस अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, संदीप घोरपडे, सुलोचना वाघ आणि गजेंद्र साळुंखे यांनी केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत पक्षपाती व मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

निवडणूक आयोगातील आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा निवेदनात करण्यात आला. या संदर्भातील वृत्तांतही दोन्ही आयुक्तांनी मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, फॉर्म-६ आणि मतदार यादीच्या डेटाबेसशी संबंधित निर्णयांवर आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे.

गोव्यातील ९७ पात्र मतदारांच्या नावांबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आला. संबंधित मतदारांच्या नावांचा समावेश करण्यासाठी गोवा प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने ९७ मतदारांपैकी ८१ जणांनी फॉर्म-६ सादर केल्याची माहिती दिली आहे.

देशभरातील SIR प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर नावे मसुदा मतदार याद्यांमधून वगळण्यात आल्याचा मुद्दाही काँग्रेसने उपस्थित केला. या प्रक्रियेत सुमारे १३ कोटी नावे मसुदा मतदार याद्यांमधून वगळल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आधार असून, पात्र मतदारांचे मतदानाचे अधिकार कोणत्याही परिस्थितीत बाधित होऊ नयेत, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. SIR प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत चिंता निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन सरकारदरबारी पाठवावे, अशी विनंती यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

निवेदन देताना शरद पाटील, बन्सीलाल भागवत, कन्हैयालाल कापडे, हर्षल जाधव, रामकृष्ण पाटील, डॉ. रवींद्र पाटील, लोटन चौधरी, पार्थराज पाटील, पी. वाय. पाटील, सुधाकर भैसे, डॉ. प्रकाश सोनवणे, पितांबर पाटील, ताराचंद सूर्यवंशी, भास्कर बोरसे, राकेश पवार, राजेंद्र भिकन पाटील, शालिग्राम पाटील, भिकाजी पाटील, सुभाष शिंदे, दिलीप पाटील, प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज दीदींच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न वाटप

 

अमळनेर प्रतिनिधी : पिंपळे येथील आश्रमशाळेत नारायण रेकी सत्संग परिवार, अमळनेर यांच्यातर्फे वर्ल्ड रिनाऊंड ट्रान्सफॉर्मेशनल स्पीकर, नारीरत्न श्रीमती राजेश्वरीजी मोदी (राज दीदी) यांच्या जन्मदिवसानिमित्त आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर सामूहिक रामनाम जप करण्यात आला. जपानंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने मिष्टान्न व भोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उदय पाटील यांनी उपस्थित अतिथींचे स्वागत करून शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीचा आलेख थोडक्यात मांडला. शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती ऐकून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्या पाटील व सचिव युवराज पाटील यांनी नारायण रेकी सत्संग परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आश्रमशाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

२८ सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिन 

 

प्राचीन काळापासून जगामध्ये सर्वत्र राजेशाही दिसून येते. बऱ्याच राजांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला दिसून येतो. यामध्ये काही राजे मानवतावादी होते. त्या राजांनी आपल्या कारभाराची माहिती सार्वजनिक करण्याचे ठरविले होते. स्वातंत्र्याची अप्रतिम कल्पना ज्यांच्या विचारांमध्ये निर्माण झाली अशा राजांनी आपला कारभार पारदर्शक ठेवला.. मौर्य काल , गुप्तकाल, मध्ययुगातील छत्रपती शिवाजींचा राज्यकाळ मानवतावादी राजांनी आपल्या कारभाराची सखोल माहिती देण्याची पद्धत सुरू केलेली होती. सम्राट अशोक यांनी विविध लेण्या उभारून तसेच ग्रंथरचनेला प्राधान्य देऊन माहिती सार्वजनिक केली. विदेशातून आलेल्या ब्रिटिशांनी आपली माहिती गुप्तपणे ठेवली होती त्यासाठी त्यांनी कायदा १९२९ ला केला होता. जागतिक माहिती अधिकाराची सुरुवात २८ सप्टेंबर २००२ ला बल्गेरियाची राजधानी सोफिया या ठिकाणी सर्वप्रथम जागतिक माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे संमत करण्यात आले. “फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन एडवोकेट नेटवर्क “या जागतिक माहिती अधिकार संस्थेने जगभरातील एकत्र आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा केला. या अगोदर स्वीडन या देशाने माहिती अधिकाराचा कायदा १७६६ मध्ये लागू केलेला होता.२०१९ संयुक्त राष्ट्राने या दिवसाला जागतिक माहिती उपलब्धता दिवस म्हणून मान्यता दिली. थॉमस पेनच्या पुस्तकामध्ये सार्वत्रिक माहिती देण्याचा उल्लेख आहे. ॲरिस्टॉटलने गुप्तहेर माहिती सोडून इतर माहिती जनतेला असावी असे म्हटलेले आहे. 

         आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाची ही इथंभूत माहिती प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे. स्वीडनच्या अँडर्स चिडेनियस या उदारमतवादी विचारवंताने व एका राजकीय खासदाराच्या पुढाकाराने झाली. फ्रीडम ऑफ द प्रेस ऍक्ट नावाने स्वीडनच्या संसदेमध्ये हा कायदा जगात सर्वप्रथम मंजूर झाला. भारतामध्येही माहिती अधिकाराबाबत जनआंदोलन राजस्थान मधून सुरू झाले. अरुणा रॉय यांच्या मजदूर किसान शक्ती संघटन या संघटनेच्या मजुरी आणि दुष्काळ निवारण यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत जन आंदोलन सुरू केल्याने माहिती अधिकार याची सुरुवात झाली.१९७५ मध्ये न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध राज नारायण खटल्याचा निकाल देताना नागरिक कर भरीत असतो त्यामुळे त्याला माहिती सार्वजनिक केली पाहिजे असा निकाल देण्यात आला. भारतामध्ये सर्वप्रथम हा कायदा तामिळनाडू ने ४ मे१९९७ ला लागू केला.यानंतर हा कायदा गोवा राज्याने जुलै १९९७ ला लागू केला. राजस्थान, दिल्ली, कर्नाटक , महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला. केंद्र सरकारने हा कायदा राष्ट्रीय स्तरावर १२ ऑक्टोबर २००५ ला संमत करून राज्याचे कायदे नष्ट केले व सर्वत्र आर टी आय २००५ कायदा पास केला. महाराष्ट्राने २००२ ला हा कायदा लागू केलेला होता. पुढे सर्वत्र भारतभर केंद्राचा कायदा लागू झाला. महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्यामागे थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या जन आंदोलनामुळे २०००ला मंजूर झाला. परंतु २३ सप्टेंबर २००२ ला लागू केला होता. हा कायदा लागू झाल्यामुळे भारतामधील अनेक प्रकारचा भ्रष्टाचार बाहेर आला. त्यामध्ये आदर्श सोसायटी घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, कर्नाटकातील बोगस वेतन घेतलेल्या शिक्षकांचा घोटाळा असे अनेक घोटाळे माहिती अधिकार कायद्यामुळे बाहेर आले. सामान्य माणसाला सरकारी, निम सरकारी ठिकाणी आढळून येणारा कोणताही घोटाळा माहिती अधिकार कायद्याखाली शोधून त्यावर प्रतिबंध लावता येतो. १५ जून २००५ ला राष्ट्रपतींनी हा कायदा मंजूर करून १२ ऑक्टोबर पासून सर्वत्र लागू झाला. या कायद्याचा दुरुपयोग घेण्याचा काही लोक प्रयत्न करीत असतात. परंतु ते शेवटपर्यंत टिकू शकत नाही. जागतिक माहिती अधिकार कायद्यामुळे भारतामध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. दरवर्षी ६० लाख अर्ज दाखल होतात. इतर देशांमध्ये ही या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाते. इलेक्ट्रोल ब्रॉंड यासारखा मोठा घोटाळा माहिती अधिकार कायद्यामुळे बाहेर आला. कायदा उत्तम आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. 

पत्रकार 

एस.एच.भवरे

९०७५४१७०३२

शिक्षक फ्रेंडली’ झाल्याने विद्यार्थ्यांमधील शिस्त व आदर कमी झाला : कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्काराने १८ ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान

 

जळगाव प्रतिनिधी : “कायद्यामुळे शिक्षक ‘फ्रेंडली’ झाल्याने विद्यार्थ्यांमधील शिस्त, शिक्षकांविषयीचा आदर आणि शिक्षकांची सामाजिक प्रतिष्ठा कमी झाली आहे. मात्र, अभ्यासक्रमाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी झाले आहे,” असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी केले.

संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळ, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सूर्यजीवनी अभ्यासिकेच्या सभागृहात २४ सप्टेंबर २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी विचारपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष सुनील जाधव, सचिव प्रकाश बारी, सहखजिनदार उल्हास चौधरी आणि जनसंपर्क अधिकारी कैलास सोनार उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मानपत्र देऊन मंडळातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन स्वाती अहिरराव यांनी केले.

१८ निवृत्त शिक्षकांचा सन्मान

‘संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे सन्मानार्थी म्हणून अलका पितृभक्त, हरिश्चंद्र सोनवणे, आधार बाजीराव सपकाळे, बाळू पाटील, शिरीष सोनार, बापू साळुंखे, विजय सुपडू लुल्हे, भास्कर पाटील, अविनाश कुमावत, शालीग्राम नामदेव भिरुड, सुहासिनी सखाराम खाडीलकर, पंडित तायडे, प्रा. धनंजय गुजराथी, आशा कांडेलकर, जानकीराम सपकाळे, आशा ठाकूर, शरयू बोंडे व मंजुषा सोनार यांचा सन्मान करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच मंडळाच्या बोधचिन्हासह उद्दिष्टे असलेले किचेन असे होते. पुरस्कारार्थी मंजुषा सोनार, हरिश्चंद्र सोनवणे व आशा ठाकूर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.

यावेळी उल्हास चौधरी यांनी मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे विद्यार्थ्यांना रेडिमेड ज्ञान सहज उपलब्ध होत असल्याने त्यांच्या ज्ञानलालसेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात सुनील जाधव यांनी निवृत्त शिक्षकांनी निवृत्तीनंतरही समाजोपयोगी व विधायक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. सुशिक्षित समाजातही वाईट चालीरीती व अंधश्रद्धा वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

संस्थेचे सचिव प्रकाश बारी यांनी आभार प्रदर्शन केले, तर जनसंपर्क अधिकारी कैलास सोनार यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदकुमार अहिरराव व स्वाती अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्था संचालक उल्हास चौधरी, सहसचिव दीपक तांबोळी, सुनील नेमाडे, विवेक अमृतकर, इंदिरा जाधव, यशवंत चिरमाडे यांच्यासह समस्त संचालक मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमास पुरस्कारार्थी, त्यांचे कुटुंबीय व आप्तेष्ट तसेच शिक्षणप्रेमी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्मकांडाला फाटा; सत्यशोधक विचारांचा जागर! अनोरेत दशपिंड व गंधमुक्ती विधी

धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील अनोरे येथे ज्ञानेश्वर दत्तू महाजन यांचे वडील दिवंगत दत्तू हरी महाजन यांच्या दशपिंड, गंधमुक्ती व उत्तरकार्याचा विधी सत्यशोधक पद्धतीने पार पडला. पारंपरिक कर्मकांडांना फाटा देत महापुरुषांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून हा विधी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत, महापुरुष व महामाता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करताना सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले.
यावेळी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील म्हणाले, “अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त होऊन सत्यशोधक विचारांनी मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. शिक्षण हे मानवमुक्तीचे प्रभावी साधन आहे. ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे. समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त होण्यासाठी सत्यशोधक पद्धतीने विवाह, दशक्रिया विधी, गृहप्रवेश आदी विधी करावेत.”
तसेच मराठी वारसा या यूट्यूब चॅनेलवरील ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिका सहकुटुंब पाहावी, त्यातून महापुरुषांचा खरा इतिहास समजून घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
माळी समाजाध्यक्ष हरी महाजन व सरपंच स्वप्निल महाजन यांनी मनोगत व्यक्त करून दिवंगत दत्तू हरी महाजन यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सत्यशोधक विधीची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार व सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांच्याकडून मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले. तसेच रोकडे परिवाराच्या वतीने वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेत परिसरात लिंब, पिंपळ व वड या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. रोकडे परिवाराच्या वतीने सत्यशोधक समाज संघाला ११०० रुपयांचा निधीही सुपूर्त करण्यात आला.
लवकरच अनोरे गावात मोठ्या स्क्रीनवर मराठी वारसा यूट्यूब चॅनेलवरील ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिका दाखविण्यात येणार असल्याचे माळी समाजाध्यक्ष हरी महाजन यांनी सांगितले. तसेच अनोरे ग्रामस्थांनी यापुढे सत्यशोधक पद्धतीनेच विधी करावेत, असे आवाहन सरपंच स्वप्निल महाजन यांनी केले.
याप्रसंगी मधुकर नामदेव देशमुख (उपाध्यक्ष, बी. जे. विद्यालय), हरी तुकाराम महाजन (माळी समाजाध्यक्ष), स्वप्निल लक्ष्मण महाजन (सरपंच), भाऊसाहेब संभाजी पाटील (पोलीस पाटील), ज्ञानदेव राजाराम पाटील (विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन), रवींद्र लोटन चव्हाण, त्र्यंबक रोकडे, रघुनाथ रोकडे, नामदेव रोकडे, सुरेश रोकडे, संतोष रोकडे, राजेंद्र रोकडे यांच्यासह गावातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूडच्या तरुणाची भौतिक संशोधन प्रयोगशाळेत निवड साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी अंतराळ संशोधनात देणार योगदान

 

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील शिरूड गावातील सामान्य कुटुंबातील अमित वसंत अहिरे या तरुणाची भारतीय अंतराळ विभागातील भौतिक संशोधन प्रयोगशाळा (Physical Research Laboratory – PRL) या नामांकित संस्थेत टेक्निकल असिस्टंट पदावर अभिमानास्पद निवड झाली आहे. संपूर्ण भारतातून केवळ दोन जागांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत परीक्षा व कौशल्य चाचणी पार करून अमित यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे शिरूड गावासह अमळनेर तालुका आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही त्यांची वाटचाल प्रेरणादायी ठरली आहे.

अमित वसंत अहिरे हे शिरूड येथील बांधकाम कामगार तथा सायकलपटू वसंत बळीराम अहिरे यांचे चिरंजीव आहेत. सामान्य कुटुंबातून आलेल्या अमित यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण आणि करिअरमध्ये सातत्याने प्रगती केली. शालेय जीवनात अंगीकारलेली शिस्त, संयम, सचोटी, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास त्यांना मदत झाली.

अनेकदा कमी गुण किंवा मर्यादित शैक्षणिक संधी असल्यास विद्यार्थ्यांना करिअरविषयी चिंता वाटते. मात्र, अमित यांनी केवळ डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही देशातील नामांकित अंतराळ संशोधन संस्थेत प्रवेश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची इच्छा यामुळे त्यांनी हे यश संपादन केले.

अमित यांनी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात शालेय शिक्षण घेतले. शालेय जीवनात त्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला आणि या परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली. दहावीच्या परीक्षेत त्यांना ६५ टक्के गुण मिळाले. मात्र, या गुणांमुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नाही. स्वतःमधील प्रज्ञा आणि जिज्ञासा जिवंत ठेवत नवीन काहीतरी शिकण्याची आणि करण्याची प्रेरणा त्यांनी कायम ठेवली.

अमित यांच्या या वाटचालीत साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक डी. ए. धनगर यांचे मार्गदर्शन तसेच आई-वडील आणि मित्रपरिवाराची मोलाची साथ लाभली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अमित यांनी शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात सातत्य ठेवले. त्याच जोरावर २०२५ साली त्यांची जलसंपदा विभागात निवड झाली.

मात्र, शालेय जीवनात मिळालेली प्रेरणा आणि अंतराळ क्षेत्रात काहीतरी करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दरम्यानच्या काळात भारतीय अंतराळ विभागातील भौतिक संशोधन प्रयोगशाळेत (PRL) टेक्निकल असिस्टंट पदाच्या संपूर्ण भारतातून केवळ दोन जागा उपलब्ध झाल्या. या पदासाठी त्यांनी परीक्षा दिली. त्यानंतर झालेल्या कौशल्य चाचणीतही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले. देशभरातून मोठी स्पर्धा असतानाही अमित यांची या दोन जागांपैकी एका जागेवर निवड झाली.

या निवड प्रक्रियेत संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी झाले होते. मात्र, स्वतः आत्मसात केलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा योग्य वापर करण्याचा निर्णय अमित यांनी घेतला. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ही संधी मिळवली. त्यांच्या या निवडीमुळे कुटुंब, गाव, तालुका आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब निर्माण झाली आहे.

अमित यांच्या या यशाचा शिरूड ग्रामस्थांनाही आनंद झाला असून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम गावातील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. सामान्य कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर देशातील नामांकित अंतराळ संशोधन संस्थेत स्थान मिळवल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले.

विपरीत परिस्थिती असली तरी योग्य संधी मिळवता येते, हे अमित यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे. अपयशाने खचून न जाता जिद्द आणि सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास ठरवलेले ध्येय साध्य करता येते, हा संदेश त्यांच्या प्रवासातून मिळतो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीला मर्यादा न मानता आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा योग्य वापर केल्यास विविध क्षेत्रांत पुढे जाता येते, हे अमित यांच्या यशाने दाखवून दिले आहे.

अमित यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल साने गुरुजी विद्यालयाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, तत्कालीन मुख्याध्यापक एस. डी. देशमुख तसेच शिक्षक डी. ए. धनगर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

भौतिक संशोधन प्रयोगशाळेत टेक्निकल असिस्टंट म्हणून कार्यरत झाल्यानंतर अमित यांना अंतराळ संशोधनाशी संबंधित विविध तांत्रिक कामांमध्ये योगदान देण्याची संधी मिळणार आहे. अंतराळात घडणाऱ्या विविध घडामोडींचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आणि त्यांना तांत्रिक सहकार्य करणारे कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून अवकाशाशी संबंधित अनेक प्रश्नांचा अभ्यास केला जातो. या संशोधन कार्यात अमित यांचे तांत्रिक योगदानही महत्त्वाचे ठरणार आहे.

सामान्य कुटुंबातून आलेल्या अमित यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या शिक्षणानंतर मिळवलेले हे यश ग्रामीण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे आहे. परिस्थितीपेक्षा जिद्द, सातत्य आणि ज्ञानावर विश्वास ठेवून प्रयत्न केल्यास मोठ्या संधी मिळवता येतात, हे त्यांच्या यशातून स्पष्ट झाले आहे.

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे पितरांचे स्मरण आणि देवदर्शन हे परस्परविरोधी नाही; गैरसमज टाळण्याचे आवाहन

 

अमळनेर : यंदा २९ ऑक्टोबर रोजी अंगारकी चतुर्थी असून, ही तिथी पितृपक्षाच्या कालावधीत येत असल्याने काही भाविकांमध्ये मंदिरात जावे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पितृपक्ष सुरू असल्यामुळे देवदर्शन करू नये, असा सार्वत्रिक धार्मिक नियम नाही. त्यामुळे कोणत्याही गैरसमजामुळे भाविकांनी श्री मंगळ ग्रह मंदिरातील दर्शन टाळू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता आणि त्यांच्या आत्मकल्याणासाठी श्रद्धेने विधी करण्याचा काळ मानला जातो. त्याचवेळी अंगारकी चतुर्थी ही श्री गणेशभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेची तिथी आहे. पितरांचे स्मरण करणे आणि देवदर्शन घेणे या दोन स्वतंत्र धार्मिक श्रद्धा असून, त्यांच्यात विरोधाभास मानण्याचे कारण नाही.

अमळनेरचे श्री मंगळ ग्रह मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून प्रत्येक अंगारकी चतुर्थीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा अंगारकी चतुर्थी पितृपक्षात येत असल्याने काही भाविकांनी पितृपक्षातील रूढ समजुतींमुळे मंदिरात जाणे टाळू नये. श्रद्धा ही भीतीवर नव्हे, तर सद्भावना, कृतज्ञता आणि सकारात्मक विचारांवर आधारित असावी, असा संदेश यानिमित्ताने देण्यात येत आहे.

पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने दान, अन्नदान अथवा धार्मिक विधी करणे आणि त्यानंतर अथवा त्याच काळात मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे—यामध्ये धार्मिकदृष्ट्या परस्परविरोध असणे आवश्यक नाही. प्रत्येक कुटुंबाच्या परंपरा आणि श्रद्धांचा आदर राखून भाविकांनी आपापल्या श्रद्धेनुसार धार्मिक आचरण करावे.

“पितरांचे स्मरण करूया, देवाचे दर्शन घेऊया आणि अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धेला विवेकाची जोड देऊया,” असा संदेश यंदाच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त देण्यात येत आहे.

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री मंगळ ग्रह मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था, शिस्त आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांनी शांतता, संयम आणि शिस्त पाळत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.