माणुसकीच्या दिवाळी उपक्रमानिमित्त घरोघरी गोडवा वाटपास प्रारंभ मंगळग्रह सेवा संस्थेने केला अनोरे गावापासून शुभारंभ
अमळनेर : यावर्षी दुष्काळाचे मोठे सावट आहे. या पार्श्वभूमीवर गरजवंत शेतकरी, शेतमजूर व अन्य घटकांच्या घरात दिवाळीच्या फराळाच्या निमित्ताने गोडवा यावा व घर आनंदाने प्रकाशमान व्हावे, यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेने ठिकठिकाणी जाऊन फराळाचे वाटप सुरू केले आहे. त्याचा शुभारंभ गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील अनोरे या गावापासून समारंभपूर्वक करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ. परीक्षेत बाविस्कर, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, सेक्रेटरी प्रा. जयेश गुजराती, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, रवींद्रसिंगजी कालरा, डॉ. रवींद्र जैन उपस्थित होते.
प्रारंभी श्री मंगळग्रह देवतेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीपासून आपण सारे सुरक्षित राहोत. गाव सुखी, समृद्ध व निरोगी राहो यासाठी श्री मंगळग्रह मंदिराचे मुख्य पुरोहित शुभम वैष्णव गुरुजी व वैभव लोकाक्षी यांनी मंत्रोच्चार आणि प्रार्थना केली.
यावेळी प्रास्ताविकात मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी सदर उपक्रमाचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्या सर्वांनी गरजवंतांना फराळ, कपडे, अन्नधान्याच्या रूपात मदत करण्याचे आवाहन केले. मंगळग्रह सेवा संस्था करीत असलेल्या सर्व प्रयत्नांची आणि उपक्रमांची माहिती दिली.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे म्हणाले, की दुष्काळ असला तरीही आपण सर्वांनी लढवय्या वृत्तीने संकटाशी सामना करू. शासन आपल्या पाठीशी आहे. शासनाने देऊ केलेली मदत जर कोणाला प्राप्त झाली नसेल तर त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा. शासनाच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते सर्वतोपरी आम्ही सहकार्य करू. खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या, की ‘जेथे कमी तेथे आम्ही’ हे मंगळग्रह सेवा संस्थेचे जणू ब्रीद झाले आहे. त्यांच्यासोबतच रोटरी क्लब, लायन्स क्लब व आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे ठामपणे उभे राहू. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना मिळून काम करणे गरजेचे आहे. मंगळग्रह सेवा संस्थेने घेतलेला पुढाकार आणि उचललेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. सर्वांनी त्यांना समर्थन द्यावे व सक्रिय सहकार्य करावे.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी व मंदिराच्या सेवेकऱ्यांनी तसेच आर्डी-अनोरे येथील विविध संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. आर्डी-अनोरे परिसरातील शेकडो गरजवंतांना फराळाची पाकिटे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. याप्रसंगी दुष्काळजन्य परिस्थितीचे उचित भान राखून सामाजिक बांधिलकीतून जोपासलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे अनोरेतील ग्रामस्थांनी तोफ्लडभरून कौतूक केले आणि पुढील वाटचालीसाठी ‘मंगलमय’ शुभेच्छाही दिल्या. संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम व मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
चौकट…)
‘अनोरे’ अनेक बाबतींत आदर्श!
अनोरे हे गाव तसे छोटे आहे. मात्र, अनेक बाबतींत आदर्श आहे. तेथे कोणत्याही प्रकारचे शह-काटशहाचे राजकारण नाही. सर्व जाती-धर्मांमध्ये एकोपा आहे. कोणतेही भांडण किंवा वादविवाद नाहीत. तिथे एक गाव-एक गणपती साजरा केला जातो. मात्र, गावाला पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य होते. शेती व्यवसाय पार कोलमडला होता. या पार्श्वभूमीवर मंगळग्रह सेवा संस्थेने हे गाव दत्तक घेतले. या गावाला पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत उतरवले. संस्थेने तालुक्यातील सर्व समाजसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक संस्था, शासन यांच्या सहकार्याने प्रचंड मेहनत घेऊन आणि ग्रामस्थांचे मजबूत समर्थन मिळून गावाला २५ लाख रुपयांचे राज्यस्तरीय तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले. अनोरे गाव मंगळग्रह सेवा संस्थेने दत्तक घेतल्यानेच फराळवाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ याच गावापासून करण्यात आला.

