ब्रेकिंग
अमळनेर शहरात ४०० ते ५०० अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट! सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे बॅनर हटवा; संबंधितांवर गुन्हे दाखल करा – जितेंद्र संदानशिव यांची पोलीस निरीक्षकांकडे तक्रार

 

अमळनेर : शहरातील मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विद्युत व पथदिव्यांच्या खांबांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले अंदाजे ४०० ते ५०० बॅनर, जाहिरात फलक व होर्डिंग्ज तातडीने हटविण्यात यावेत. तसेच विनापरवानगी बॅनर लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणारे आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जितेंद्र अनिल संदानशिव यांनी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

 

सदानशिव यांनी ५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमळनेर शहरातील विविध मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले आहेत. विशेषतः विद्युत खांब व पथदिव्यांच्या खांबांवर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे बॅनर किंवा त्यांचे लोखंडी सांगाडे खाली कोसळल्यास वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ शहराच्या विद्रुपीकरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

 

या तक्रारीत महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम, १९९५ मधील कलम ३ व ४, तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८५ व १२५ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी नसताना सार्वजनिक मालमत्तेवर जाहिरात फलक लावून विद्रुपीकरण केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी. सार्वजनिक मार्गावर अडथळा किंवा धोका निर्माण करणे तसेच निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणे याबाबतही कायद्यानुसार तपास करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

तसेच शहरातील सर्व बॅनरची तातडीने पाहणी करून त्यांची अधिकृत परवानगी तपासावी, बॅनर लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे व जाहिरातदारांची ओळख पटवावी आणि बॅनर लावण्याचे आदेश देणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका पोहोचवणारे बॅनर हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचेही तक्रारीत नमूद आहे.

 

दखलपात्र गुन्हा निष्पन्न झाल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १७३ अन्वये प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी अंतिम मागणी संदानशिव यांनी केली आहे.

 

या तक्रारीसोबत विद्युत खांबांवरील व मुख्य रस्त्यांवरील बॅनरची छायाचित्रे जोडण्यात आली असून, आवश्यकतेनुसार बॅनर लावलेल्या ठिकाणांची यादीही उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *