ब्रेकिंग
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ८५ कुटुंबांच्या दिवाळीत मंगळग्रह सेवा संस्थेने भरला गोडवा! तासखेड्यात गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप; सामाजिक बांधिलकीतून माणुसकीचा उपक्रम

 

अमळनेर प्रतिनिधी : एका बाजूला दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे दिवाळीचा आनंद… अशा परिस्थितीत आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गरजू कुटुंबांच्याही घरात दिवाळीचा आनंद फुलावा, त्यांच्या सणात गोडवा निर्माण व्हावा, या सामाजिक जाणिवेतून मंगळग्रह सेवा संस्थेने माणुसकीचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत असून, शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) तासखेडे येथे सुमारे ८५ गरजू कुटुंबांना फराळाची पाकिटे वितरित करण्यात आली.

या उपक्रमाप्रसंगी तासखेडे गावाचे सरपंच सुनील पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, मंगल सेवेकरी प्रकाश मेघा, बाळा पवार मंदिराचे सेवेकरी तसेच गावातील दगा भील, बापू बिऱ्हाडे, सांडू बिऱ्हाडे, संतोष पाटील, मच्छिंद्र पाटील यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरजू शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांना फराळ, कपडे व अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

सणाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजूंच्या आयुष्यातही आनंदाची फुले फुलविण्याचा संदेश मंगळग्रह सेवा संस्थेच्या या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *