दूषित पाण्याच्या प्रश्नावर जाब विचारणे भोवले? ‘अमळनेर सर्वोपरी’च्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल! राजाराम नगरच्या पाणीप्रश्नावरून नगरपालिकेत गदारोळ; गौरव पाटील व हर्ष पाटील यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळ्याचा आरोप
अमळनेर : शहरातील राजाराम नगर परिसरातील दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या मूलभूत समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपालिकेत जाब विचारणाऱ्या ‘अमळनेर सर्वोपरी’च्या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने शहरात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. गौरव पाटील आणि हर्ष पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने या कारवाईची शहरात चर्चा सुरू झाली आहे.
राजाराम नगर परिसरात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर ‘अमळनेर सर्वोपरी’च्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे धाव घेतली होती. पाणीपुरवठा विभागात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना या समस्येबाबत जाब विचारण्यात आला. दूषित पाण्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात नगरपालिकेला निवेदनही देण्यात आले होते.
दरम्यान, राजाराम नगर येथील दाऊत पिंजारी व भानुदास त्र्यंबक पाटील यांच्या घराशेजारील मोठ्या जलवाहिनीवर अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचा मुद्दा या प्रकरणात पुढे आला आहे. या नळजोडणीमुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच विषयावरून नगरपालिका कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे समजते.
नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कार्यकर्त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला, कर्मचाऱ्यांना धमकावले तसेच कामकाजात हस्तक्षेप केला, असे आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीच्या आधारे गौरव पाटील आणि हर्ष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव पाटील यांचा प्रशासनावर आरोप
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना गौरव पाटील यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमच्यावर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजाराम नगरमधील नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याने त्यांच्या प्रश्नासाठी आम्ही नगरपालिकेत गेलो होतो. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे, हीच आमची भूमिका होती. मात्र, जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठविल्यामुळे तो दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गुन्ह्याच्या वादात मूळ पाणीप्रश्न दुर्लक्षित राहणार का?
या संपूर्ण प्रकरणात कार्यकर्त्यांवरील गुन्हा आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तक्रारी यांची चर्चा सुरू असली, तरी राजाराम नगरमधील दूषित पाणीपुरवठ्याचा मूळ प्रश्न अद्याप कायम आहे. संबंधित जलवाहिनीची प्रत्यक्ष तपासणी होणार का? कथित अनधिकृत नळजोडणीवर कारवाई केली जाणार का? दूषित पाण्याच्या कारणांचा शोध घेऊन नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठा कधी सुरू होणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांवरील कारवाईबरोबरच दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि राजाराम नगरच्या नागरिकांना स्वच्छ पाणी कधी मिळते, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

