वाढदिवसाचा खर्च टाळून सभापती अशोक पाटील यांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श! मुख्यमंत्री सहायता निधीसाठी बाजार समितीतर्फे ५१ हजारांचा धनादेश; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याऐवजी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श घालून दिला. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्यामार्फत सुपूर्द करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट लक्षात घेता सभापती अशोक पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ आणू नयेत, तसेच कार्यकर्त्यांनी लावलेले वाढदिवसाचे बॅनर काढून टाकावेत, अशा सूचना दिल्या होत्या. बाजार समितीतील शेतकरी, कर्मचारीवृंद, हमाल-मापाडी आणि व्यापारी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्सवापेक्षा गरजूंच्या मदतीला प्राधान्य देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या कार्यालयात जाऊन सभापती अशोक पाटील, संचालक समाधान धनगर, सचिव डॉ. उन्मेष राठोड, सहसचिव सुनील पाटील, योगेश महाजन, अशोक वाघ तसेच अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश मयूर भंगाळे यांच्याकडे सुपूर्द केला.
यासोबतच लोणसह ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दुष्काळाचे शैक्षणिक परिणाम भोगावे लागू नयेत, या उद्देशाने सभापती अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
वाढदिवसाचा झगमगाट टाळून मदतीचा हात पुढे करणाऱ्या अशोक पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, वाढदिवसही समाजोपयोगी कार्यातून साजरा करता येतो, असा सकारात्मक संदेश त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.
