ब्रेकिंग
गुवाहाटीतील १४ व्या भारतीय समाजकार्य परिषदेत उत्तर महाराष्ट्रातील प्राध्यापकांचा ठसा! संशोधनपर शोधनिबंधांचे सादरीकरण; विविध शैक्षणिक व संशोधनात्मक सत्रांचे अध्यक्षपद भूषविले

 

गुवाहाटी (आसाम) : नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स इन इंडिया (NAPSWI) यांच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आसाममधील गुवाहाटी येथील आसाम डॉन बॉस्को विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात १४ व्या भारतीय समाजकार्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत उत्तर महाराष्ट्रातील समाजकार्य क्षेत्रातील प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून आपल्या संशोधनात्मक व शैक्षणिक कार्याचा ठसा उमटविला.

आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, विद्यापीठाचे कुलगुरू फादर डॉ. जोस पालेली, NAPSWI चे डॉ. संजय भट, डॉ. सुरेश पठारे, डॉ. केशव वाळके आणि डॉ. अनुपकुमार भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले.

या परिषदेची मुख्य संकल्पना “From Welfare to Wellbeing: Reimagining Social Work Practice for Viksit Bharat 2047” अर्थात ‘कल्याणकारी दृष्टिकोनाकडून सर्वांगीण स्वास्थ्याकडे : विकसित भारत २०४७ साठी समाजकार्याच्या कार्यपद्धतीची पुनर्कल्पना’ अशी आहे.

या परिषदेत श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर (जि. जळगाव) येथील प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, डॉ. सागरराज चव्हाण व डॉ. जगदीश सोनवणे, तसेच तळोदा येथील डॉ. नितीन तायडे आणि धुळे येथील डॉ. सुदाम राठोड यांनी सहभाग घेतला.

यावेळी सहभागी प्राध्यापकांनी आपले संशोधनपर शोधनिबंध सादर केले. तसेच विविध शैक्षणिक व संशोधनात्मक सत्रांचे अध्यक्षपद भूषवून चर्चासत्रांचे कामकाज यशस्वीरीत्या पार पाडले. त्यांच्या या सहभागामुळे उत्तर महाराष्ट्रातील समाजकार्य क्षेत्रातील संशोधन आणि शैक्षणिक कार्याला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळाले.

या परिषदेत देशभरातील समाजकार्य क्षेत्रातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, व्यावसायिक समाजकार्यकर्ते आणि विविध विषयांतील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. विकसित भारत २०४७ या संकल्पनेच्या अनुषंगाने सामाजिक न्याय, मानवी हक्क, सामाजिक समता, शाश्वत विकास, सामाजिक कल्याण तसेच समाजकार्याच्या बदलत्या भूमिका या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात येत आहे.

या परिषदेमुळे देशभरातील संशोधकांमध्ये संशोधनाची देवाणघेवाण, शैक्षणिक संवाद आणि समाजकार्य क्षेत्रातील नवनवीन संकल्पना व कार्यपद्धती जाणून घेण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद आणि सहकाऱ्यांनी सर्व सहभागी प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *