रोटरी क्लबचा माणुसकीचा दीपोत्सव; एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांना दिवाळी फराळासह पोषण किटचे वाटप! मुलींसाठी ६० फ्रॉकचे वितरण; आधार संस्था आणि अंकुर फाउंडेशनच्या सहकार्याने उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी : दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांना व रुग्णांना दिवाळी फराळ, प्रोटीन किट तसेच सकस आहाराचे पाकीट वितरित करण्यात आले. हा उपक्रम ३ नोव्हेंबर रोजी रोटरी हॉल, अमळनेर येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रोटे. मकसूद बोहरी यांनी सांगितले की, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या प्रमुख सौ. भारतीताई पाटील यांच्या प्रेरणेने तसेच आधार बहुउद्देशीय संस्था आणि अंकुर फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने रोटरी क्लब अमळनेर गेल्या चार वर्षांपासून दर महिन्याला नियमितपणे प्रोटीन किटचे वाटप करीत आहे. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांचे व रुग्णांचे आरोग्य आणि शारीरिक सुदृढता टिकून राहावी, यासाठी रोटरी क्लब सातत्याने प्रयत्नशील आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घालण्याचा उपक्रमही राबविला जातो.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सौ. मेहराज हुसेन बोहरी यांनी स्वतः शिवलेल्या ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ उपक्रमांतर्गत मुलींसाठी ६० फ्रॉकचे वितरण करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमातून मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी स्वादिष्ट नमकीनचे प्रमुख रोटे. विजय भाऊ पाटील यांच्यातर्फे दिवाळी फराळाची पाकिटे, तर रोटे. प्रतीक खंडेरिया यांच्यातर्फे प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील, रोटे. चेलाराम सैनानी, रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक खंडेरिया, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या सौ. डॉ. भारतीताई पाटील, सौ. रेणुका प्रसादताई तसेच आधार बहुउद्देशीय संस्था व अंकुर फाउंडेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
दिवाळीच्या सणात समाजातील गरजू घटकांच्या जीवनात आनंदाचे रंग भरत रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीचा सुंदर परिचय करून दिला.

