ब्रेकिंग
अमळनेरात २५० तरुणांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे धडे! जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम कौतुकास्पद; भरती प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत होणार – खा. स्मिता वाघ आमदार अनिल पाटील यांच्याकडून क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

 

अमळनेर : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ग्रामीण भागातील गोरगरीब व सामान्य कुटुंबातील तरुणांसाठी राबविण्यात येत असलेला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या प्रशिक्षणामुळे उमेदवारांना भरती प्रक्रियेतील नियम, अटी आणि विविध टप्प्यांची योग्य माहिती मिळणार असून, त्यांच्या मेहनत व परिश्रमाला निश्चितच यश मिळेल. अशा उपक्रमाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा आणि पोलीस दलातर्फेच भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित केले जावे, असे प्रतिपादन खासदार स्मिता वाघ यांनी केले.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या राणे सभागृहात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

 

कार्यक्रमाला आमदार अनिल पाटील, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, हरी भिका वाणी तसेच डीवायएसपी विनायक कोते आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, पोलीस भरती प्रक्रिया राबविणारे अधिकारी व कर्मचारीच उमेदवारांना प्रशिक्षण देत असल्याने भरती प्रक्रियेतील बारकावे समजण्यास मदत होईल आणि उमेदवारांकडून होणाऱ्या चुका टाळता येतील. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे आपल्याच भूमीतील असल्याने त्यांनी अमळनेरच्या तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करणे ही अभिमानाची बाब आहे. उमेदवारांच्या सरावासाठी खान्देश शिक्षण मंडळाच्या माध्यमातून तसेच स्वतःच्या प्रयत्नांतून क्रीडा संकुलात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, अनेक उमेदवार भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच तयारीला सुरुवात करतात. त्यामुळे ऐनवेळी त्यांची धावपळ होते आणि भरतीचे नियम, आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण होतो. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, शारीरिक पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता याबाबत आधीच योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. यामुळे सामान्य कुटुंबातील तरुणांनाही पोलीस दलात भरती होण्याची संधी अधिक प्रभावीपणे साधता येईल.

 

जिल्हा पोलीस दलातील सुनील निकम, विजय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर सैय्यद, मेघना जोशी, प्रियांका टिकारे, रज्जाक सैय्यद, संदीप पाटील, किरण सपकाळे, विजय कोळी आणि दिग्विजय दाभाडे यांनी उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता, शारीरिक पात्रता, लेखी परीक्षा, मैदानी चाचणी तसेच भरती प्रक्रियेतील विविध निकषांबाबत व्याख्यानातून आणि प्रत्यक्ष मैदानावर मार्गदर्शन केले.

 

शिबिरात विविध अकादमींच्या सुमारे २५० उमेदवारांनी सहभाग नोंदविला. भरती प्रक्रियेतील अडचणी, महत्त्वाचे बारकावे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत थेट पोलीस अधिकाऱ्यांकडून अचूक मार्गदर्शन मिळाल्याने सहभागी तरुणांनी समाधान व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डीवायएसपी विनायक कोते यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय गणेश अहिरे, साजिद मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज, धनराज कोळी, नामदेव बोरकर, कविता ठाणगे, हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाटील, नितीन कापडणे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, नाना धनगर तसेच खान्देश शिक्षण मंडळाने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *