ब्रेकिंग
प्रताप महाविद्यालयात राजभाषा हिंदी दिन उत्साहात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांना पारितोषिकांचे वितरण

 

अमळनेर प्रतिनिधी : प्रताप महाविद्यालयातील हिंदी विभाग व बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने राजभाषा हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

हिंदी दिनानिमित्त सामान्यज्ञान व वक्तृत्व (आशुभाषण) स्पर्धा घेण्यात आल्या. कनिष्ठ, पदवी व पदव्युत्तर अशा तीन स्तरांवर झालेल्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेत मिताली मनोहर पाटील, सायली योगराज पाटील व अश्विनी आधार महाजन, तर सामान्यज्ञान स्पर्धेत वंशिका भिका स्वामी, स्वप्निल रविंद्र मोरे व ज्ञानेश्वर हिरामण पाटील यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला.

बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक अनामलामूरी सैंदूलू यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, अशोक पाटील, व्ही.बी. मांटे, हिंदी विभागाध्यक्ष डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’ यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ. भगवान भालेराव व डॉ. रवि बालसकर यांनी काम पाहिले.

यावेळी हिंदी विषयातील पीएच.डी. संशोधक बापू पाटील, मुरलीधर वसावे व सौ. सारिका पाटील यांनी हिंदी विभागाला इन्व्हर्टर व बॅटरी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शशिकांत सोनवणे यांनी, सूत्रसंचालन के.पी. बागुल यांनी तर आभार कुबेर कुमावत यांनी मानले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतापच्या मुलींच्या खो-खो संघाची सुवर्ण भरारी! आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत इंजिनिअरिंग कॉलेज, बांभोरी संघावर मात

 

अमळनेर प्रतिनिधी : प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघाने आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात संघाने इंजिनिअरिंग कॉलेज, बांभोरी (जळगाव) संघाचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

प्रताप महाविद्यालयाच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळ, आक्रमकता आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यातही खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघावर मात केली.

या उल्लेखनीय यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, कार्याध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, सचिव प्रा. पराग पाटील, सहसचिव डॉ. व्ही.बी. मांटे, प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, सर्व उपप्राचार्य, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे, जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य डॉ. एस.बी. नेरकर, निवड समिती प्रमुख व एरंडोल विभाग सचिव डॉ. देवदत्त पाटील, डॉ. शैलेश पाटील, कुलसचिव राकेश निळे तसेच सर्व जिमखाना समिती सदस्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

संघ व्यवस्थापक डॉ. सचिन पाटील, खो-खो संघ प्रशिक्षक प्रा. अर्चना सचिन पाटील, प्रा. ए.के. अग्रवाल, प्रशांत देवकते तसेच प्रताप महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व खेळाडूंनीही सुवर्णपदक विजेत्या संघाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सेवा संकल्प अभियान व स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षा साहित्याचे वाटप

 

अमळनेर, दि. ३० सप्टेंबर २०२६ :

अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने “सेवा संकल्प अभियान” व “स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६” अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात सफाई कर्मचारी मित्रांसाठी आरोग्य सुरक्षा व कल्याणपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत “ सफाई मित्र सुरक्षा अभियान” अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना नमस्ते कार्ड, आयुष्मान भारत कार्ड तसेच पीपीई किटचे वाटप करण्यात आले. सफाई कर्मचारी हे शहराच्या स्वच्छतेसाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेणे ही नगरपरिषदेची महत्त्वाची जबाबदारी आहे. या उद्देशाने कर्मचाऱ्यांना आवश्यक आरोग्यविषयक सुविधा, सुरक्षा साहित्य व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सफाई कर्मचारी मित्र यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सदर प्रसंग वेळी उपस्थित सर्वांना स्वच्छता शपथ तसेच नशा मुक्त भारत करणे बाबत शपथ देण्यात आली. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

“स्वच्छ शहर, निरोगी कर्मचारी आणि सुरक्षित स्वच्छता व्यवस्था” या उद्देशाने अमळनेर नगरपरिषदेकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षा व सामाजिक कल्याणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव, श्री. संतोष माणिक, श्री. किरण कंडारे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी व शिपाई मित्र उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच त्यांना आरोग्य व सुरक्षिततेबाबत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला

सती माता मंदिर परिसरात माय भारत स्वयंसेवकांकडून प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान

 

अमळनेर ( प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियान व सेवा पंधरवाडा निमित्ताने सती माता मंदिर परिसरात प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान माय भारत अमळनेर तालुका स्वयंसेवक सागर कोळी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एस.पाटील रासेयो कार्यक्रमाधिकारी विजयकुमार वाघमारे , प्रा.अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनाने या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सती माता मंदिर परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून परिसराची स्वच्छता केली. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून स्वच्छ परिसर, सुंदर परिसर आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरण असा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या स्वच्छता अभियानात तेजस्विनी, अनुजा, जान्हवी, रत्ना, कीर्ती, मयुरी, जान्हवी माळी, सुमित, क्रिश, धम्मदीप, कल्पेश, दीपक, सुशील आणि राजेंद्र या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

अमळनेरमध्ये शालेय फुटबॉल स्पर्धांचा थरार; पेनल्टी शूटआऊटमुळे रंगत!

 

अमळनेर (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुलात शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. तालुक्यातील १७ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अटीतटीचे सामने रंगले. अनेक सामने अतिरिक्त वेळेनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाली निघाले.

स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर अर्बन बँकेच्या उपाध्यक्षा व खा.शि.मं.च्या विश्वस्त वसुंधराताई लाडगे, पोलीस अधिकारी समाधान गायकवाड, अर्बन बँकेचे अध्यक्ष अभिषेक पाटील, प्रा. ए. के. अग्रवाल आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचांचा व गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंनी मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवून देशसेवा करावी, असे आवाहन समाधान गायकवाड यांनी केले.

स्पर्धेतील विजेते व उपविजेते :

* १४ वर्षे मुले: विजेता – स्वामी विवेकानंद स्कूल; उपविजेता – सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, मंगरूळ.

* १४ वर्षे मुली: विजेता – ॲड. ललिता पाटील इंग्लिश नॅशनल स्कूल; उपविजेता – स्वामी विवेकानंद स्कूल.

* १७ वर्षे मुले: विजेता – सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, मंगरूळ; उपविजेता – स्वामी विवेकानंद स्कूल.

* १७ वर्षे मुली: विजेता – स्वामी विवेकानंद स्कूल; उपविजेता – ॲड. ललिता पाटील इंग्लिश नॅशनल स्कूल.

* १९ वर्षे मुले: विजेता – रॉयल उर्दू स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी गोकुळ बोरसे, सुनील करंदीकर, विनायक सूर्यवंशी, विनोद पाटील, योगेश पाटील, जय जाधव, सागर चावरिया, अर्शद शेख व दर्शन पाटील यांनी सहकार्य केले. विजयी संघांची १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान भुसावळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

अमळनेरच्या नगाव बुद्रुकमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराचा काळाबाजार? लाभार्थ्यांचे अंगठे घेऊन धान्यच गायब, सरपंचांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

 

अमळनेर (जळगाव) – तालुक्यातील नगाव बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. गावातील रेशन दुकान क्रमांक *FPS क्र. 149911400312* चे दुकानदार शासनाचे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतच नसल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थानी केला आहे. याबाबत ग्रामस्थ नगाव बु। च्या वतीने उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

*काय आहे तक्रारीत?*

सरपंच सौ. सरिताबाई पद्माकर गोसावी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

> मौजे नगाव बु।। येथील रेशन दुकान क्र. FPS 149911400312 यांचे बाबतीत गावात मोठ्या प्रमाणात तक्रारी असून त्यांनी अनेक लाभार्थ्यांकडून अंगठे घेऊन कोणालाही रेशन वितरीत केलेले नाही. सदर बाब अत्यंत गंभीर असून याबाबत तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, सोबत लाभार्थ्यांच्या तक्रारींचे अर्ज जोडले आहेत.

गावातील अनेक कुटुंबांनी सरपंचांकडे तक्रार केली होती की, दुकानात गेल्यावर मशीनवर अंगठा घेतला जातो, पण धान्य दिले जात नाही. “सिस्टममध्ये नंतर दाखवतो” असे सांगून लाभार्थ्यांना परत पाठवले जाते. कित्येक महिन्यांपासून अनेकांचे रेशन कार्ड देखील बंद असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

*ग्रामपंचायतीची मागणी*

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित स्वस्त धान्य दुकानदारावर कडक कारवाई करावी आणि गोरगरीब लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य त्वरित मिळवून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती पुरवठा अधिकारी, अमळनेर आणि तहसीलदार, अमळनेर यांना देखील देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या तक्रारीमुळे अमळनेर तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण नगाव बुद्रुक गावाचे लक्ष लागले आहे.

नगरपरिषदेची लिफ्ट बंद; कर्मचारी अडकला नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नादुरुस्त लिफ्टच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

 

अमळनेर | प्रतिनिधी 

              येथील अमळनेर नगरपरिषद कार्यालयातील लिफ्ट आज, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान अचानक बंद पडल्याने एक कर्मचारी लिफ्टमध्ये अडकला. अचानक लिफ्ट बंद पडल्याने काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रयत्नांनंतर लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला आणि कर्मचाऱ्याची सुटका झाली.

                    नगरपरिषद कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा असते. त्यातच लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा अन्य नागरिक लिफ्टमध्ये अडकले असते आणि त्यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.

                       नगरपरिषद कार्यालयातील ही लिफ्ट यापूर्वीही अनेकदा बंद पडल्याच्या तक्रारी असून, ती नादुरुस्त अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. वारंवार लिफ्ट बंद पडत असतानाही संबंधित प्रशासनाकडून तिच्या दुरुस्तीबाबत गांभीर्याने कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.लिफ्टची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लिफ्ट सुरक्षित असल्याची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चित्रकला परीक्षांच्या काळात क्रीडा स्पर्धा नको जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाची जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे मागणी

 

अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा २०२६ मधील एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करू नये, अशी मागणी जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाने जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असतात. त्याच कालावधीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांना चित्रकला परीक्षा किंवा क्रीडा स्पर्धा यापैकी कोणत्यातरी एका उपक्रमाची निवड करावी लागू शकते. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे संघाने पत्रात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत सहभागी होण्याची समान संधी मिळावी तसेच कोणत्याही विद्यार्थ्यावर एका उपक्रमापासून दूर राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत क्रीडा स्पर्धा घेणे टाळावे, अशी विनंती संघाने केली आहे.

शासकीय चित्रकला परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक एकमेकांशी संघर्ष होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षांनी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन दिले आहे.

विज्ञान नाट्याच्या रंगमंचावर पी.बी.ए. स्कूलची दमदार बाजी! राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

अमळनेर : जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती अमळनेर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे पी.बी.ए. स्कूलच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथील रोटरी क्लब हॉलमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अमळनेर सौ. कविता सुर्वे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, मुख्याध्यापक, पालक तसेच विज्ञान क्षेत्रातील शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. गणित-विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. निरंजन पेंढारे यांनीही आवर्जून उपस्थिती लावली.

अमळनेर तालुक्यातील विविध शाळांच्या आठ संघांनी या विज्ञान नाट्योत्सवात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संकल्पना मनोरंजक व अभिनव पद्धतीने मांडत प्रेक्षकांमध्ये विज्ञानाविषयी आवड, जिज्ञासा, आकर्षण आणि संशोधनवृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

अंतिम फेरीत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय, प्रभावी संवादफेक आणि विज्ञानविषयक आशयाची प्रभावी मांडणी करत परीक्षकांची दाद मिळवली. त्यांच्या सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाल्याने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

या यशामागे विज्ञान शिक्षिका स्वाती माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची तंत्रशुद्ध माहिती देण्याबरोबरच अभिनयातील बारकावे आणि नाट्य सादरीकरणाचे सखोल प्रशिक्षण दिले.

विजयी संघातील विद्यार्थी :

दिक्षिता भामरे, स्वरा कासार, विधी पाटील, परिणीती शिंदे, कुणाल बोरसे, प्रणाली सैंदाणे, पुष्करा राजपूत, मयंक राजपूत आणि आरुषी महाजन यांनी आपल्या अभिनयातून उत्कृष्ट भूमिका साकारली.

या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी तसेच डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, व्ही. एस. अमृतकर, श्रावण पाटील, व्ही. पी. बडवे यांच्यासह समस्त शिक्षकवृंद व शिक्षक केंद्र कर्मचारीवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

तालुकास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशानंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धेत पी.बी.ए. स्कूलचे विद्यार्थी कशी कामगिरी करतात, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

विद्यापीठात राज्य स्तरीय विशेष कार्यशाळेत अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग

 

 

जळगाव ( प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र आणि आजीवन अध्ययन विस्तार शिक्षण विभाग आयोजित *चार भिंतीच्या पलीकडचे शिक्षण : दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे करियर आणि उच्च शिक्षणाची वाटचाल*

‘Beyond Four Walls: Navigating Career and Higher Education Through Distance Mode’

 यावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा सोमवार 28 सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभाग्रहात ही विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.

कुलगुरू प्रा डॉ व्ही. एल माहेश्वरी , प्रकूलगुरु एस टी इंगळे, यू जी सी सहसचिव डॉ एम एम वावरे , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, संचालक प्रा मनीष जोशी, प्रा समीर नारखेडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

उद्बोधन सत्र पहिल्या सत्रात डॉ विलास जैन, दुसऱ्या सत्रात कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्राचार्य डॉ अनिल राव यांनी मार्गदर्शन केले.

समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्रा डॉ विजयकुमार वाघमारे, प्रा डॉ भरत खंडागळे यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठे यांनी प्रदर्शन भरविले होते.