महात्मा बळीराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले! सवाद्य भव्य मिरवणूक; बळीराजा स्मारकावर आजी-माजी आमदारांसह मान्यवरांच्या हस्ते पूजन व अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी : बलीप्रतिपदेच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे यंदाही अमळनेर शहरात महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची सवाद्य भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात काढण्यात आली. मिरवणुकीनंतर फुलांनी सजविण्यात आलेल्या बळीराजा स्मारकावर आजी-माजी आमदारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विधिवत पूजन करून महात्मा बळीराजांना अभिवादन केले. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
मिरवणुकीचा प्रारंभ पटवारी कॉलनी येथून करण्यात आला. मांडळ येथील ज्येष्ठ शेतकरी पंढरीनाथ पाटील आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर निकम यांच्या हस्ते बैलगाडी व नांगरपूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी नगरसेवक श्याम पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, कैलास पाटील, अरुण देशमुख, अशोक बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी महात्मा बळीराजा यांच्या कार्याची आणि विचारांची महती विशद केली. अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका सौ. वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. त्यानंतर शेतकरी गीतांच्या सुरावटी आणि बँडच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. मराठा कॉलनी, शिरूड नाका, स्वामी समर्थ मंदिर, विजय मारुती, धुळे रोडमार्गे महाराणा प्रताप चौकातून ही मिरवणूक फुलांनी सजविण्यात आलेल्या महात्मा बळीराजा स्मारकापर्यंत पोहोचली.
मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते बळीराजा स्मारकावर विधिवत पूजन करण्यात आले. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी उपस्थितांना बलीप्रतिपदेच्या शुभेच्छा देताना, “इडा, पीडा टळून बळीचे राज्य यावे, यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे,” असे आवाहन केले.
मिरवणुकीतील सजविलेल्या वाहनावर महात्मा बळीराजा यांची भव्य प्रतिमा विराजमान होती. तसेच भव्य नांगरासोबत बाल शिवराय आणि राजमाता जिजाऊ उभे असलेली बैलगाडी नागरिकांचे विशेष आकर्षण ठरली. मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी बळीराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेत पुष्पवृष्टी केली. शेतकरी, नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
महात्मा बळीराजा यांचे शेतकरीहिताचे विचार, समतेचा संदेश आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करीत उपस्थितांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या बळीराजा पूजन सोहळ्यामुळे शहरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले, तर आभार उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी मानले.
यावेळी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, शेतकी संघाचे संचालक संजय पाटील, विक्रांत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, डी. एम. पाटील, महेश पाटील, वाल्मीक पाटील, एल. टी. पाटील, सयाजीराव पाटील, विवेक पाटील, मराठा समाज मंडळाचे शेखर पाटील, दत्तू शामराव पाटील, नगरसेवक सचिन पाटील, संजय पाटील, पवार आप्पा, योगेश शिंदे, भरत बोरसे, बाळू संतोष पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
