महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा माणुसकीचा दिवाळी फराळ! पत्रकार संघातर्फे पाचपावली चौक व वर्णेश्वर परिसरातील गरजू कुटुंबांना फराळ व मिठाईचे वाटप
अमळनेर प्रतिनिधी : दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि गोरगरीब कुटुंबांच्याही सणात गोडवा निर्माण व्हावा, या सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेरच्या वतीने दिवाळीनिमित्त गरजू कुटुंबांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. पाचपावली चौक परिसरासह चोपडा नाक्याजवळील वर्णेश्वर परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना फराळ आणि मिठाई देऊन पत्रकार संघाने माणुसकीचा दिवा प्रज्वलित केला. या उपक्रमामुळे लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या सामाजिक उपक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष डॉ. विजय गाडे, जिल्हा संघटक प्रवीण बैसाणे आणि जिल्हा उपाध्यक्ष विजय संदानशीव यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमासाठी विजय पाटील व प्रेम सासनाने यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, तालुका सचिव नूरखान पठाण, तालुका उपाध्यक्ष हृदयनाथ मोरे, जितेंद्र बडगुजर, आत्माराम आहिरे, संदीप सैंदाणे, प्रकाश बोरसे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
दिवाळी हा केवळ रोषणाई, फराळ आणि उत्सवाचा सण नसून परस्परांमध्ये आनंद, आपुलकी आणि माणुसकीची भावना जपण्याचा सण आहे. आपल्या आनंदात समाजातील वंचित आणि गरजू घटकांनाही सहभागी करून घेणे, हाच खऱ्या अर्थाने दिवाळीचा संदेश आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून, पत्रकारितेसोबतच सामाजिक दायित्व जपण्याचा आदर्श संघाने निर्माण केला आहे.

