ब्रेकिंग
दिवाळी पाडव्याला माणुसकीचा जागर; पाटील दाम्पत्याकडून गरजूंना फराळ, विद्यार्थिनींना सायकलींची भेट

 

अमळनेर : दिवाळीचा आनंद समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माजी नगरसेवक विक्रांत पाटील व नगरसेविका सौ. स्वप्ना पाटील यांनी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविला. आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात सफाई कामगार व गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले, तर गरीब व होतकरू विद्यार्थिनींना सायकली भेट देऊन त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला हातभार लावण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकली प्रदान करण्यात आल्या. सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी होणारी पायपीट कमी होऊन शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याने विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले.

 

यानंतर परिसरातील सफाई कामगार आणि गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांसह गरजू कुटुंबांनाही सणाच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा या उपक्रमामागील उद्देश होता.

 

यावेळी नाभिक समाजाचे नेते मधुकरराव सैदाणे यांनी मनोगत व्यक्त करताना, दिवाळीचा खरा आनंद समाजातील प्रत्येक घटकासोबत वाटण्यात आहे. गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याबरोबरच विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सायकली उपलब्ध करून देणे हा समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा आदर्श उपक्रम असल्याचे सांगितले.

 

या स्नेहमिलन कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष डॉ. रामभाऊ शेलकर, माजी नगरसेवक राजाराम बडगुजर, हिंम्मतराव देसले, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक राधेबाबा चौधरी, कोळी समाजाचे तालुकाध्यक्ष मधुकरराव सोनवणे, ज्येष्ठ नागरिक सोमा ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, नितीन पाटकरी, कैलास महाजन, मुकादम तन्वीर शेख यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेविका सौ. स्वप्ना पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

 

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रविण ठाकूर, अशोक पाटील, राहुल महाजन, हितेश बारी, जयेश बडगुजर, रामकृष्ण कोळी, नीरज पाटकरी, स्वामी सैदाणे, अनिल पवार आदींनी विशेष सहकार्य केले.

 

गरजूंच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवितानाच विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा पाटील दाम्पत्याचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा आदर्श ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *