ब्रेकिंग
पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देत प्रतापमध्ये आकाशकंदील निर्मितीचा उपक्रम! हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शिक्षकांनीही साकारले आकर्षक आकाशकंदील

 

प्रतिनिधी | अमळनेर : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि सर्जनशीलतेचा उत्सव. या सणाचे औचित्य साधून प्रताप हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. केवळ आकाशकंदील तयार करण्यापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकता, स्वावलंबन, पर्यावरणाविषयी जागरूकता आणि सामाजिक एकात्मतेची भावना रुजविणारा हा उपक्रम ठरला.

शाळेचे चेअरमन सीए नीरज अग्रवाल व मुख्याध्यापक ए. डी. भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यशाळेच्या प्रारंभी शाळेच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना आकाशकंदील निर्मितीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. शाळेचे कला शिक्षक डी. एन. पालवे यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून विविध आकर्षक आकाशकंदील तयार केले.

या कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हिंदू-मुस्लिम अशा सर्व धर्मांतील विद्यार्थ्यांनी एकत्रित सहभाग नोंदवत कलानिर्मितीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिक्षक निखिल पाटील, सचिन अहिरे, कृष्णा कोळी, सुहास खांजोडककर,जयश्री पाटील, नम्रता दोरकर तसेच लिपिक सागर पवार, शिपाई प्रसाद गोसावी यांनीही स्वतः आकाशकंदील तयार करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

विद्यार्थ्यांनी तयार केलेले सर्व आकाशकंदील दिवाळीनिमित्त शाळेच्या परिसरात लावण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेल्या या कलाकृतींनी शाळेचा परिसर उजळून निघाला. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथही देण्यात आली. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या बाबी टाळून निसर्गपूरक पद्धतीने सण साजरे करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आनंददायी आणि प्रेरणादायी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *