साने गुरुजी कन्या विद्यालयात तयार केले आकर्षक आकाश कंदील विद्यार्थिनींच्या कल्पकतेला सर्जनशीलतेची जोड
अमळनेर – दिवाळीनिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक टाकाऊ वस्तु पासून आकाश कंदील तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबवला. पारंपारिक सजावटीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत विद्यार्थिनींनी टाकाऊ व उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करून आकर्षक कंदील तयार केले. या उपक्रमाचे संस्थाध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे यांनी कौतुक केले.
विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थिनींनी कार्यशाळेत बनवलेले कंदील बाबत कुतूहलपूर्वक माहिती विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी जाणून घेतली. यावेळी मुख्याध्यापक डी.ए.धनगर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या कलाकृतीचे निरीक्षण करून स्वतःच्या कल्पकतेतून साकारलेले सुंदर कंदील पाहून विस्तार अधिकारी प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यीनींचे कौतुक केले. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यात सर्जनशीलता, कलात्मकता, स्वावलंबन व पर्यावरण जागरूकता निर्माण होते असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. उपक्रम यशस्वीतेसाठी जे.एस.पाटील, दिलीप पाटील, मनीषा वैद्य, आर.एम.देशमुख, शैलेंद्र साळुंखे, मुकेश पाटील, दीपक महाजन, धनश्री वानखेडे, मोनाली वंजारी, धनश्री साळुंखे यांनी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. आकर्षक व पर्यावरणपूरक आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
