ब्रेकिंग
मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविणाऱ्या डॉ. दीपक पाटील यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कार नाशिकच्या गोठ्यातील आगीतील गायींना जीवदान; पशुवैद्यकीय सेवाकार्याची राज्यस्तरावर दखल

 

अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील मांडळ येथील पंचायत समितीचे माजी सभापती तथा पशुधन पर्यवेक्षक डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, धार्मिक, राजकीय व विशेषतः पशुवैद्यकीय सेवाकार्याबद्दल राज्यस्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युवकभारती संस्था व खाटू श्याम बाबा देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. दीपक पाटील यांनी जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा बजावताना अनेक मुक्या प्राण्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविले आहेत. जनावरांवर औषधोपचार करण्यासोबतच लसीकरण, गर्भधारणा व वंध्यत्व तपासणी, कृत्रिम रेतन, पशुगणना आदी तांत्रिक कामांमध्येही ते सातत्याने योगदान देत आहेत.

त्यांच्या सेवाकार्यातील विशेष उल्लेखनीय कामगिरी म्हणजे नाशिक येथील पंचवटी परिसरात घडलेली गोठ्याला लागलेली आग. दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे एका गोठ्याला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत १८ गायी भाजल्या गेल्या, तर दोन गायींचा मृत्यू झाला. या कठीण प्रसंगी नाशिक पशुचिकित्सालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव आहेर आणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. दीपक पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी गायींवर उपचार सुरू केले. स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता केलेल्या धाडसी प्रयत्नांमुळे उर्वरित गायींचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले.

त्यांच्या या धाडसी कार्याची, कर्तव्यनिष्ठेची आणि पशुप्रेमाची दखल घेत युवकभारती संस्था व खाटू श्याम बाबा देवस्थान समितीतर्फे त्यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेंद्र पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुरत महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक संभाजी लोटन पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष, अमळनेर गणेश भामरे, माजी सभापती आशा ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील, सरपंच कोकिळाबाई ठाकरे, उद्योजक प्रवीण पाटील (सुमित मसाले, सुरत) आदी उपस्थित होते. संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ. दत्ता ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले.

डॉ. दीपक पाटील यांच्या या सन्मानामुळे मांडळसह अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *