अमळनेर अग्निशमन दलाची मध्यरात्री धावपळ; दोन ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला! गांधीपुरा येथील भंगार गोदामासह सिंधी कॉलनीतील घराची आग विझवली; वृद्ध व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले, रोकडही वाचवली

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. गांधीपुरा भागातील भंगार गोदाम आणि सिंधी कॉलनीतील घराला लागलेल्या आगीवर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे दोन्ही घटनांमध्ये मोठा अनर्थ टळला.
पहिली घटना दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५७ वाजेच्या सुमारास गांधीपुरा भागात घडली. येथील ‘दानिश स्क्रॅप’ या भंगार गोदामाला आग लागल्याची माहिती नगरसेवक श्रीराम चौधरी व नावेद शेख यांनी अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दुसरी घटना दि. १२ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीत घडली. प्रकाशलाल लखुमल डिंगराई यांच्या घराला आग लागल्याची माहिती नगरसेवक भरत ललवाणी यांनी दूरध्वनीद्वारे अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून घरातील आग विझविण्याचे काम सुरू केले. यावेळी घरात एक वृद्ध व्यक्ती झोपलेली होती. घराचा दरवाजा उघडत नसल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दरवाजा उघडल्यानंतर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
विशेष म्हणजे, आग विझविण्याच्या कामादरम्यान फायरमन दिनेश बिऱ्हाडे यांनी घरातील रोकड रक्कम आगीतून सुरक्षित बाहेर काढून ती घरमालकाकडे सुपूर्द केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे आणि तत्परतेचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले.
या दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, रफिक पठाण, सत्यन संदानशिव, मच्छिंद्र चौधरी, आकाश संदानशिव आणि प्रसेनजीत सोनवणे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
मध्यरात्रीच्या संकटसमयी जीवाची पर्वा न करता तत्परतेने धाव घेणाऱ्या अमळनेर अग्निशमन दलाच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

