ब्रेकिंग
अमळनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी अशोक रघुनाथ पाटील, तर सरचिटणीसपदी विजय आनंदा पाटील यांची सर्वानुमते निवड

 

अमळनेर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव गट) अमळनेर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी श्री. अशोक रघुनाथ पाटील, तर सरचिटणीसपदी श्री. विजय आनंदा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष जयवंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजू देवचंद पाटील, ग.स.चे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विलासराव नेरकर, जिल्हा संघाचे नेते व उपाध्यक्ष वाल्मिक मराठे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष विलास नेरकर यांनी नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष : अशोक रघुनाथ पाटील

सरचिटणीस : विजय आनंदा पाटील

कार्याध्यक्ष : राहुल भगवान सोनवणे

कोषाध्यक्ष : समाधान खैरनार

उपाध्यक्ष : योगेश्वर भाऊराव पाटील, दत्तात्रय बारकू सोनवणे, हिंमत चौधरी, ज्ञानेश्वर कुवर.

सहसचिव : हिरालाल धर्मा सैंदाणे, योगेश भदाणे, प्रीतम रत्नपारखी.

ज्येष्ठ मार्गदर्शक : जगदीश भटू पाटील, किशोर देसले, रियाज शेख, रवींद्र प्रभाकर पाटील.

तंत्रस्नेही मार्गदर्शक : सुधाकर पाटील, शंकर बोरसे, नामदेव अहिरे, संदीप सूर्यवंशी, भरत जाधव, निलेश मोतीलाल पाटील.

संघटक : विजय बिर्हाडे, सुनील देवरे, जिजाबराव पाटील, हेमंत शिंदे, विलास मोरे, प्रशांत पाटील, कमलेश मोरे, कुणाल पोतदार, सुधीर पाटील, संदीप गुलाबराव पाटील, राजेंद्र संभाजीराव पाटील, अरुण पवार.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार!

बैठकीत तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षक संघाची भूमिका आग्रही राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांना सोबत घेऊन समन्वयाने व एकजुटीने भविष्यातील कामकाज करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी अमळनेरचे गटविकास अधिकारी मा. एन. आर. पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

बैठकीस माजी सरचिटणीस मोहन ताडे, भटू आप्पा शिरसाठ, अमळनेर तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर चौधरी, प्राथमिक शिक्षक संघाचे (शिवाजीराव गट) अध्यक्ष संदीप वाघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच ज्येष्ठ केंद्रप्रमुख किरण शिसोदे, शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंखे, वाल्मिक भदाणे, महेश पाटील, सचिन पाटील व ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पाटील यांचीही उपस्थिती होती.

बैठकीच्या शेवटी उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

३४ वर्षांच्या शैक्षणिक सेवेनंतर अनिता बोरसे यांचा सेवापूर्ती गौरव! विद्यार्थिनींच्या अश्रूंनी भावपूर्ण निरोप; ‘गुड बाय’ऐवजी ‘सी यू मॅडम’ म्हणत घेतला निरोप

 

अमळनेर : अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता दीपक बोरसे यांच्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेबद्दल सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या बोरसे मॅडम यांचा संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते.

प्रास्ताविकात उपशिक्षक दीपक महाजन यांनी बोरसे मॅडम यांच्या शिस्तप्रिय कार्यपद्धती, प्रशासकीय कौशल्य, आषाढी वारीसह विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा गौरव केला. विद्यार्थिनींना प्रेमाने ‘पिल्लू’ म्हणून हाक मारणाऱ्या मॅडम यांच्या आठवणींनी उपस्थितांना भावूक केले. यावेळी माजी मुख्याध्यापक सतीश देशमुख, सुनील पाटील, संजीव पाटील, विलास चौधरी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना अनिता बोरसे म्हणाल्या की, ३४ वर्षांच्या सेवाकाळात कर्तव्याला नेहमीच प्राधान्य दिले. शिक्षकांच्या सहकार्याने शाळेला ‘सुंदर शाळा’ उपक्रमात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून देता आला. शाळा तालुक्यात नेहमीच अव्वल राहावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

अध्यक्षीय भाषणात सचिव संदीप घोरपडे यांनी बोरसे मॅडम यांच्या शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष कार्यशैलीचे कौतुक करत संस्थेच्या वतीने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सोहळ्यातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या मॅडमना निरोप देताना व्यक्त केलेल्या भावना. अश्रूंनी डोळे भरलेल्या विद्यार्थिनींनी ‘गुड बाय’ऐवजी ‘सी यू मॅडम’ म्हणत पुन्हा भेटण्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगाने उपस्थितांचेही डोळे पाणावले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. एस. पाटील यांनी केले, तर आभार दिलीप पाटील यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीपूर्वीच शिंदे गटात राजकीय फटाका! अमळनेर शिवसेनेला अंतर्गत नाराजीचे हादरे शहरप्रमुख भरत पवार आणि युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कंजर यांचे पदांचे राजीनामे; माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडून राजीनामा मागितल्याचा पत्रात उल्लेख; नगरपालिकेतील सत्ताधारी गटातही अस्वस्थतेची चर्चा

 

अमळनेर प्रतिनिधी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना अमळनेरच्या राजकीय वर्तुळात मात्र शिवसेनेच्या शिंदे गटातील अंतर्गत नाराजीचा फटाका फुटला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख भरत पवार आणि युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कंजर यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा पत्रांमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी संबंधित नाराजीचा उल्लेख असल्याने या राजीनाम्यांमागील कारणांची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

 

धुळे रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे अधिकृत नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी शिवप्रेमींनी अमळनेर नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनात भरत पवार आणि राहुल कंजर यांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यांच्या या सहभागावरून माजी आमदार शिरीष चौधरी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या पार्श्वभूमीवर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

राजीनामा पत्रात माजी आमदारांकडून राजीनामा मागितल्याचा उल्लेख

 

शहरप्रमुख भरत पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्याकडे पदाचा राजीनामा मागितल्याचा उल्लेख केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या आंदोलनात सहभागी होणे हेच राजीनाम्याच्या घडामोडीमागील प्रमुख कारण आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

दुसरीकडे, युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कंजर यांनीही आपल्या राजीनामा पत्रातून संघटनेतील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नसल्याची तसेच महत्त्वाच्या बाबींमध्ये विश्वासात घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे हा केवळ एका आंदोलनातील सहभागाचा विषय नसून संघटनेतील अंतर्गत संवाद, निर्णयप्रक्रिया आणि पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचाही प्रश्न असल्याचे चित्र दिसत आहे.

 

शिवप्रेमींच्या आंदोलनाने उघड झाली अंतर्गत नाराजी?

 

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या नामकरणाचा विषय हा शहरातील शिवप्रेमींच्या भावनांशी संबंधित आहे. या मागणीसाठी शिवप्रेमींनी नगरपालिकेत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या आंदोलनात स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्याने त्याचे पडसाद आता पक्षांतर्गत पातळीवर उमटत असल्याची चर्चा आहे.

 

लोकभावना, संघटनेची भूमिका आणि राजकीय नेतृत्वाची अपेक्षा यामध्ये समन्वय साधण्याचा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. सार्वजनिक प्रश्नांवर भूमिका घेताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना कितपत स्वातंत्र्य असावे, पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात घेण्याची प्रक्रिया नेमकी कशी असावी, असे प्रश्नही या घडामोडींमुळे चर्चेत आले आहेत.

 

नगरपालिकेत सत्ता असूनही नगरसेवक अस्वस्थ; कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची चर्चा

 

या राजीनाम्यांच्या घडामोडीला आणखी एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. अमळनेर नगरपालिकेत सत्ता असूनही सत्ताधारी गटातील काही नगरसेवक अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्येही अपेक्षित संवाद आणि स्थान मिळत नसल्याची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

 

सत्ता असली तरी संघटनेतील प्रत्येक घटक समाधानी आहेच असे नाही, हे या घडामोडींमधून अधोरेखित होत आहे. नगरसेवक, शहरातील पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्ते यांच्यात समन्वय राखणे, त्यांच्या सूचनांना महत्त्व देणे आणि निर्णयप्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे, हे नेतृत्वासमोरील आव्हान ठरत असल्याची चर्चा आहे.

 

विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता असताना संघटनात्मक ताकद टिकवून ठेवणे आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कायम राखणे महत्त्वाचे असते. मात्र, दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी एकाच कालावधीत राजीनामे दिल्याने शिंदे गटातील अंतर्गत परिस्थितीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

 

राजीनामे स्वीकारले जाणार की नाराजी दूर होणार?

 

भरत पवार आणि राहुल कंजर यांच्या राजीनाम्यांनंतर आता पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून त्यांना पुन्हा संघटनेत सक्रिय केले जाणार की त्यांच्या राजीनाम्यांचा स्वीकार केला जाणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

 

माजी आमदार शिरीष चौधरी यांची या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत भूमिका काय आहे, तसेच नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील नाराजी दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न होतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

 

एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या नामकरणाचा सार्वजनिक प्रश्न, तर दुसरीकडे त्याच आंदोलनाच्या निमित्ताने समोर आलेली पक्षांतर्गत नाराजी, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि नगरसेवकांसह कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेची चर्चा, यामुळे अमळनेरच्या राजकारणात दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटू लागले आहेत.

 

आता प्रश्न एवढाच की, हे राजीनामे केवळ दोन पदाधिकाऱ्यांपुरते मर्यादित राहणार की शिंदे गटातील अंतर्गत नाराजीचे आणखी काही पडसाद उमटणार? याचे उत्तर आगामी राजकीय घडामोडींतूनच मिळणार आहे.

यशवंत आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड ४ × ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण, तर ४ × १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदकाची कमाई

 

अमळनेर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखत पिंपळे बु. येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या खेळाडूंनी विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. खेळाडूंनी ४ × ४०० मीटर रिले प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक, तर ४ × १०० मीटर रिले प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकाची कमाई केली. या यशाच्या जोरावर संघातील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात १७ वर्षांखालील मुलांच्या विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यशवंत आश्रमशाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट वेग, समन्वय, संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उल्लेखनीय कामगिरी केली.

या यशस्वी रिले संघात प्यारसिंग टिंका पावरा, राजकिरण अमाश्या पावरा, सवित सिताराम पावरा, रोहन खुशाल पावरा आणि पवन सायसिंग पावरा या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंची आगामी ३ नोव्हेंबर रोजी बोईसर, ता. जि. पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

खेळाडूंना उच्च माध्यमिक विभागाचे विज्ञान शिक्षक तथा क्रीडा प्रशिक्षक स्वप्निल एच. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून सतीश कागणे यांनी जबाबदारी सांभाळली.

या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई पाटील, संस्थेचे सचिव व शैक्षणिक मार्गदर्शक युवराज पाटील, संचालक ॲड. अभिजीत पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, अमळनेर तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक उदय पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

विभागीय स्तरावर यशाची मोहोर उमटविल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करण्यासाठी हे खेळाडू सज्ज झाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

स्वप्नील पाटील यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड

 

अमळनेर : येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राकेश पाटील, प्रसन्ना बोरोले, आशिष पवार, अविनाश घुगे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

स्वप्नील पाटील यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल साने गुरुजी विद्या मंदिर येथे तसेच अमळनेर शहरातील भगवा चौकात त्यांचे उत्साहात अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमळनेरात पुन्हा नाट्यसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न,,पण अमळनेरकरांचा प्रतिसाद आवश्यक अनेक वर्षांनंतर नाट्यगृहात ‘वेगळं असं काहीतरी’चे १ नोव्हेंबरला होणार सादरीकरण

 

अमळनेर :-एकेकाळी अमळनेर शहर म्हणजे नाट्य रसिकांची भूमी म्हणून ओळख असताना काळाच्या ओघात नियमित होणारी नाट्यश्रुखला खंडित झाल्याने शौकीन रसिकांना धुळे व जळगावची वाट धरावी लागत होती मात्र जळगावातील श्री एन्टरटेन्मेंट व धुळे येथील रंगदेवता थिएटर्स यांनी अमळनेरकर रसिकांची ही तहान भागविण्यासाठी मोठे धाडस दाखवीत एक दर्जेदार नाटक आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

       यानिमित्ताने साहित्य, कला आणि नाट्यसंस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेल्या अमळनेर शहरात व्यावसायिक नाटकांची चळवळ पुन्हा बळकट होणार आहे.सदर नाट्य संस्थेकडून रविवार, १ नोव्हेंबर रोजी ‘वेगळं असं काहीतरी’ या दोन अंकी कौटुंबिक व मनोरंजक नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रात्री ८ वाजता या प्रयोगाच्या सादरीकरणाला सुरुवात होईल.

     दरम्यान अमळनेर शहरात दिवंगत उद्योगपती स्वर्गीय आर के दादा पाटील यांनी त्याकाळी नवरात्र उत्सव तथा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक दर्जेदार नाटक अमळनेरात आणून मोठी मेजवानी अमळनेराना दिली.त्यानंतर माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील यांनी देखील नाटक तथा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून ही परंपरा टिकवून ठेवली मात्र दरम्यानच्या काळात नाटक येण्याची परंपरा खंडित झाली.काही महिन्यांपूर्वी जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व वरुण राजेश पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीला धर्मवीर छत्रपती संभाजी राजे हे महानाट्य अमळनेरात आणून रसिकांचे मन जिंकले.

         नाटकांची ओढ वाढली असताना अमळनेरमधील नाट्यरसिकांना दर्जेदार मराठी नाटकाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, धुळे व जळगाव यासारख्या शहरात जावे लागते. मात्र, आता व्यावसायिक नाटके, फोक कार्यक्रम आणि नामवंत कलाकारांचे कार्यक्रम थेट अमळनेरमध्ये आणण्याचा प्रयत्न श्री एन्टरटेन्मेंट व रंगदेवता थिएटर्सकडून केला जात आहे. शहरातील समृद्ध नाट्यपरंपरेला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

         नाट्यसंस्कृती टिकविण्यासाठी केवळ प्रयोगांचे आयोजन पुरेसे नसून रसिक प्रेक्षकांची उपस्थिती आणि प्रतिसादही महत्त्वाचा आहे. त्यामुळे अमळनेरकरांनी सहकुटुंब नाट्यगृहात उपस्थित राहावे आणि या सांस्कृतिक चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

नाट्यप्रयोगासाठी भटू चौधरी (मो. : ७०२००५२३३८), विक्रम पाटील (मो. : ९८९२०३०१०४) व चंद्रशेखर पाटील (मो. : ९६६५३२५५५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमळनेरची स्वच्छता विनामूल्य करण्यास ‘आप’ची तयारी; नगरपरिषदेला दोन महिन्यांचे आव्हान कचरा संकलनाचा अतिरिक्त खर्च वाचवून निधी शहर विकासासाठी वापरण्याची मागणी; महेंद्र साळुंके व रामकृष्ण पाटील यांचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी : संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता आणि समाजसेवेच्या विचारांचा वारसा पुढे नेत अमळनेर शहर कचरामुक्त व स्वच्छ करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील कचरा संकलन व स्वच्छतेचे काम विनामूल्य किंवा केवळ प्रत्यक्ष खर्चात करण्याची तयारी ‘आप’चे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंके आणि तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील यांनी दर्शविली आहे.
शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेसाठी नगरपरिषदेकडून लाखो रुपयांची कंत्राटे काढली जातात. मात्र, या कामांसाठी होणारा अतिरिक्त खर्च टाळून उपलब्ध निधी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी वापरता येऊ शकतो, अशी भूमिका ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
टेंडरऐवजी प्रत्यक्ष खर्चात स्वच्छतेची तयारी
कचरा संकलन व स्वच्छतेसाठी कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्याऐवजी हे काम सामाजिक बांधिलकीतून करण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी आवश्यक असणारा प्रत्यक्ष खर्च उपलब्ध करून दिल्यास कोणताही नफा किंवा अतिरिक्त मोबदला न घेता शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाचलेला निधी शहराच्या विकासासाठी वापरा
सत्ता किंवा पद नसले तरी शहराच्या स्वच्छतेची आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी प्रत्येक सामाजिक संघटनेने स्वीकारली पाहिजे. कंत्राट प्रक्रियेतील अनावश्यक खर्च कमी करून तो निधी शहराच्या इतर विकासकामांसाठी वापरावा, अशी मागणीही त्यांनी केली.
नगरपरिषदेला दोन महिन्यांचे प्रायोगिक आव्हान
आपली भूमिका प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्यासाठी नगरपरिषदेने कचरा संकलन व स्वच्छतेची जबाबदारी दोन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर ‘आप’च्या पथकाकडे सोपवावी, असे आवाहन महेंद्र साळुंके व रामकृष्ण चिंतामण पाटील यांनी केले आहे. या कालावधीत स्वच्छतेच्या कामाचा दर्जा आणि परिणाम प्रत्यक्ष पाहता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संत गाडगे महाराज यांच्या विचारांनुसार स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. या भूमिकेतून ‘आप’ने मांडलेल्या प्रस्तावावर नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 डि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी संघाची दुहेरी विजेतेपदाला गवसणी; खेळाडूंचा पी.आय. दत्तात्रय निकम यांच्या हस्ते सन्मान जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र; २९ व ३० ऑक्टोबरला रंगणार पुढील सामने

 

अमळनेर प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत अमळनेर येथील नामवंत खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या कबड्डी संघाने घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक मुलींच्या संघाने दोन्ही गटांत विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.

 

या यशाबद्दल संघातील खेळाडूंचा अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचषक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी खेळाडूंचे कौतुक करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

विजयी संघात कर्णधार अश्मिरा शाकिर शेख, उपकर्णधार पुनवी निकुंबे, कावेरी पाटील, कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, इशा पाटील, मयुरी पवार, लीना गुरव, कामिनी सोनवणे, वैष्णवी पाटील, समीक्षा जाधव, रिशिका गोयल, स्नेहल पाटील आणि मोनिका भोई या खेळाडूंचा समावेश आहे.

 

या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे २९ व ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मॅटवर होणार आहे. या स्पर्धेतही संघाने उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

खेळाडूंच्या या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, कार्यालय प्रमुख श्री. शाम पवार, श्री. एस. एस. माळी, श्रीमती आर. एस. सोनवणे आणि श्री. किरण सनेर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

संघाला क्रीडा विभागप्रमुख श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीचे हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

मनोज पाटील यांची नाशिक पश्चिम विभागाच्या काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिनंदन

 

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक मनोज भाऊराव पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रान्वये नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागाच्या काँग्रेस पक्षाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे अमळनेरच्या राजकीय वर्तुळात आनंद व्यक्त होत असून, तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

मनोज पाटील यांनी अमळनेर नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून काम करताना बांधकाम समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. या कार्यकाळात त्यांनी शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध विकासकामांसाठी प्रयत्न केले. त्यांची काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याची हातोटी, कर्तव्यदक्षता आणि संघटनात्मक कामातील सातत्य यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

 

काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि कार्यकर्त्यांशी असलेला समन्वय लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीमुळे पक्षसंघटनेला बळ मिळेल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

मनोज पाटील हे अमळनेरचे माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय दाजीबा पर्वत पाटील यांचे सुपुत्र आहेत. राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या मनोज पाटील यांच्याकडे आता नाशिक जिल्ह्यातील पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आहे.

 

या नियुक्तीबद्दल अमळनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी भागवत सूर्यवंशी, गजेंद्र साळुंखे, सुलोचना वाघ, राजेंद्र चौधरी सर, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, शरद पाटील, कैलास पाटील, प्रवीण जैन, सईद तेली, डॉ. रवींद्र पाटील, सुधाकर भैसे, पी. वाय. पाटील, शिंदे, दिलीप पाटील, राकेश पवार, तौसीब तेली यांच्यासह काँग्रेसप्रेमींनी मनोज पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..! परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मिळणार सुरळीत वीजपुरवठा; अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद

 

अमळनेर:-विधानसभा मतदारसंघातील रत्नाप्रिंप्री, ता. पारोळा येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

         या नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे रत्नाप्रिंप्रीसह होळप्रिंप्री व दबाप्रिंप्री परिसरातील शेती आणि घरगुती वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून होत असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व आनंद व्यक्त केला.

 

 शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या-

 

     शेतीसाठी वीजपुरवठा हा शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे घरगुती वापरासाठीही अखंडित व सुरळीत वीजपुरवठा आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रत्नाप्रिंप्री येथील उपकेंद्रात नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्याने परिसरातील वीजपुरवठ्याची व्यवस्था अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

       या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय, उपकार्यकारी अभियंता अस्मार, उपकार्यकारी अभियंता विजय सहारे, सहाय्यक अभियंता गौतम मोरे, सहाय्यक अभियंता सचिन बागुल आणि सहाय्यक अभियंता अमित बोकाडे यांच्यासह वीज वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी रत्नाप्रिंप्री, होळप्रिंप्री व दबाप्रिंप्री येथील ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

        या कार्यक्रमाचे आयोजन संदीप मुरलीधर पाटील, रामकृष्ण मराठे, इंजि. भिकनराव हिलाल पाटील, अधिकार निंबा पाटील आणि प्रा. आर. व्ही. पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले. या उपक्रमाच्या निमित्ताने परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला.

       “सुरळीत वीजपुरवठा, सक्षम शेती आणि गावांच्या विकासाला नवी दिशा!” या अपेक्षेसह रत्नाप्रिंप्री येथील या लोकार्पण सोहळ्याची परिसरात चर्चा होत असून, नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.