ब्रेकिंग
३४ वर्षांच्या शैक्षणिक सेवेनंतर अनिता बोरसे यांचा सेवापूर्ती गौरव! विद्यार्थिनींच्या अश्रूंनी भावपूर्ण निरोप; ‘गुड बाय’ऐवजी ‘सी यू मॅडम’ म्हणत घेतला निरोप

 

अमळनेर : अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता दीपक बोरसे यांच्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेबद्दल सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या बोरसे मॅडम यांचा संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते.

प्रास्ताविकात उपशिक्षक दीपक महाजन यांनी बोरसे मॅडम यांच्या शिस्तप्रिय कार्यपद्धती, प्रशासकीय कौशल्य, आषाढी वारीसह विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा गौरव केला. विद्यार्थिनींना प्रेमाने ‘पिल्लू’ म्हणून हाक मारणाऱ्या मॅडम यांच्या आठवणींनी उपस्थितांना भावूक केले. यावेळी माजी मुख्याध्यापक सतीश देशमुख, सुनील पाटील, संजीव पाटील, विलास चौधरी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना अनिता बोरसे म्हणाल्या की, ३४ वर्षांच्या सेवाकाळात कर्तव्याला नेहमीच प्राधान्य दिले. शिक्षकांच्या सहकार्याने शाळेला ‘सुंदर शाळा’ उपक्रमात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून देता आला. शाळा तालुक्यात नेहमीच अव्वल राहावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

अध्यक्षीय भाषणात सचिव संदीप घोरपडे यांनी बोरसे मॅडम यांच्या शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष कार्यशैलीचे कौतुक करत संस्थेच्या वतीने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सोहळ्यातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या मॅडमना निरोप देताना व्यक्त केलेल्या भावना. अश्रूंनी डोळे भरलेल्या विद्यार्थिनींनी ‘गुड बाय’ऐवजी ‘सी यू मॅडम’ म्हणत पुन्हा भेटण्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगाने उपस्थितांचेही डोळे पाणावले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. एस. पाटील यांनी केले, तर आभार दिलीप पाटील यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *