द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष; ढोल-ताशे, पुष्पवृष्टी आणि औक्षणाने विद्यार्थिनींचे भव्य स्वागत
अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळा, अमळनेर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि औक्षणाचा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थिनीचे औक्षण करून, गुलाबपुष्प देत आणि फुलांचा वर्षाव करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विद्यार्थिनींसह पालकांचेदेखील बुके देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे शाळेचा पहिलाच दिवस अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री विनोदजी अग्रवाल, शालेय समितीचे चेअरमन श्री जितेंद्र भाऊ जैन, खा. शि. मं. चे ज्येष्ठ संचालक श्री हरि भिका वाणी, माधुरी शशिकांत राणे प्राथमिक शाळेचे चेअरमन श्री प्रदीप भाऊ अग्रवाल, दामिनी पथक प्रमुख श्रीमती नम्रता जरे मॅडम, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री आठवले, पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ लिपिक व प्रतिनिधी श्री शामभाऊ पवार, ज्येष्ठ शिक्षक श्री एस. एस. माळी, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आर. एस. सोनवणे तसेच क्रीडा शिक्षक श्री के. आर. बाविस्कर उपस्थित होते.
स्वागत समारंभानंतर शाळेची प्रार्थना, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर सरस्वती पूजन, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना शालेय पाठ्यपुस्तके आणि गुलाबपुष्प भेट देण्यात आले. तसेच गोडधोड वाटप करून नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. पुष्पवृष्टी आणि उत्साहपूर्ण स्वागतामुळे शाळेचा परिसर आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भरून गेला होता.
यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद पाटील आणि मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत अभ्यास, संस्कार आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. एस. सोनवणे व सौ. पी. पी. जोशी यांनी केले. प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शाळा प्रशासनाची आकर्षक नियोजनबद्धता यामुळे द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेचा प्रवेशोत्सव यंदा विशेष लक्षवेधी ठरला.


