अमळनेर नगरपालिकेत ‘शौर्य आणि विचारांचा जागर’; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व अग्निशमन दिन उत्साहात साजरा!
अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली. यासोबतच मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक नाविद शेख, मोहन सातपुते, गुलाब पाटील, भरतसिंग परदेशी, योगराज सदाशिव, दीपक चौगुले, तुळशीराम हटकर, सोमचंद संदनशिव, सुधीर चौधरी, अनिल बेंडवाल, राहुल कंजर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी व दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
महामानवाला अभिवादन आणि जवानांचा सन्मान
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचे आणि राष्ट्रनिर्मितीमधील त्यांच्या महान योगदानाचे स्मरण करण्यात आले.
१४ एप्रिल हा दिवस देशभर ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त अमळनेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या शौर्याचा, तत्परतेचा आणि निःस्वार्थ सेवाभावाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर म्हणाले की,
”अग्निशमन दल हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असते. कोणतीही आपत्ती असो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे जवान जनसेवेसाठी धावून जातात. त्यांच्या या अजोड कार्याचा समाजाने नेहमीच सन्मान राखला पाहिजे.”

अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने समाजप्रबोधन आणि कर्तव्यभावनेचा एक नवा आदर्श घालून दिला.
