ब्रेकिंग
अमळनेर शहरात लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार शविआच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही,नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक 

 

अमळनेर:-यंदाच्या उन्हाळ्यात शहरात काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठाचे नियोजन कोलमडून नागरिकांना विलंबाने पाणी मिळाले परंतु आता तापीतही पाणी आले असल्याने लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आम्ही करू याशिवाय स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा निश्चितपणे करू अशी ग्वाही गटनेत्या सौ जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शविआच्या बैठकीत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली. 

       दरम्यान नगरसेवक डॉ. डीगंबर महाले यांनी आजची बैठक राजकीय चिखल फेकीची नसून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.नगरपालिका सभागृहात झालेल्या या बैठकीत शहरातील नागरी समस्यांबाबत गटनेत्या सौ जयश्री पाटील व नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते.नगरसेवकांच्या काही प्रश्नांवर अधिकार निरुत्तर होत होते.एकंदरीत पालिकेतील सत्ताधारी व अधिकारी यांच्यात योग्य तो समन्वय नसल्यामुळेच पालिकेचा कारभार सुरळीत नसल्याचा उपस्थितांनी आरोप केला.

      यंदाच्या उन्हाळ्यात संपुर्ण दोन महिने नागरिकांना 8 ते 12 दिवसाआड पाणी मिळाल्याने शहर विकास आघाडीने पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मुख्याधिकारी शिंदे यांनी मोर्चा न काढण्याबाबत दिलेल्या विनंती पत्रास मान देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला होता. यासंदर्भात मुख्याधिकारी यांनी प्रशासकिय बैठक बोलवावी अशी मागणी गटनेत्या सौ जयश्रीताई पाटील यांनी केल्याने दिनांक 30 जुन रोजी सकाळी 11 वाजता ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत विस्कळीत पाणीपुरवठा,टाकी सफाई नतंरही होत असलेला अशुद्ध पाणीपुरवठा,गटारी तुंबल्याने पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचणारे पाणी,भुयार गटार,पाणीपुरवठा टीडीएस व प्रामुख्याने कचरा घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक , सफाई कामगारांचे मनमानी समायोजन,काही ठेकेदारांची अक्षम्य कर्तव्य कसूरी आदी समस्या नगरसेवकांनी अत्यंत आक्रमकतेने मांडल्या .विशेषत :विस्कळीत ,अशुद्ध व अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणारा पाणीपुरवठा आणि कचरा गाडीतून झालेली मृतदेहाची वाहतूक या प्रश्नांवर साऱ्यांनी अधिकारी वर्गास चांगलेच धारेवर धरले.घनकचरा ठेकेदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून गुन्हे दाखल करावेत तसेच वर्षानुवर्षे पाण्याच्या टाक्या साफ न करता नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी केली.

प्रामुख्याने सौ.जयश्रीताई पाटील यांचेसह नगरसेवक डॉ .डिगंबर महाले,विक्रांत पाटील,जितेंद्र ठाकूर,भरत ललवाणी,योगिता कापडणेकर,हाजी नसीरोद्दीन, जुबेदा आपा , नरेंद्र संदानशीव ,मुक्तार खाटीक, सचीन पाटील, शोभाबाई गढरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तर इतर नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्यां मांडल्या.

     

शहरात मिळते चक्क 400 टीडीएस चे पाणी 

 

      अमळनेर शहरात सध्या नागरिकांना मिळत असलेल्या पाण्याचे टीडीएस किती हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष पाणी टाकीवरील पाणी बाटलीत आणून सभागृहातच ते चेक करण्यात आले असता त्याचे टीडीएस चक्क 400 पर्यंत आले.हे पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाणीपुरवठा अभियंत्यांना विचारले असता ते निरुत्तर झाले.खरे पाहता जास्तीजास्त 200 ते 250 टीडीएस पाणी असायला हरकत नाही परंतू 400 पर्यंत टीडीएस जात असेल तर लोकांच्या जीवाशी खेळ करू नका याकडे लक्ष घालून नागरिकांना स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी द्या अशी मागणी सर्वानी केली.

      शेवटी मुख्याधिकारी शिंदे सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देताना लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली.व इतर प्रश्नांवर देखील गांभीर्याने कार्यवाही करण्याची हमी देत नागरी समस्यांबाबत प्रशासन कोणतीही कसुराई करणार नाही असे आश्वसित केले.

       सदर बैठकीत 

मुख्यधिकारी गणेश शिंदे,पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील,,प्रविणकुमार बैसाणे,आरोग्य निरीक्षक संतोष माणिक,किरण कंडारे,बांधकाम अभियंता सचिन गवांदे,दिवाबत्ती अभियंता कुणाल महाले,वसुली विभागाचे लौकिक समशेर,वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन,सभा लिपिक प्रमोद लटपटे उपस्थित होते.

       तर बैठकीस श.वि.आ.च्या वतीने गटनेत्या जयश्रीताई पाटील, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका योगिता कापडणेकर, जुबेदाबी नासिरोद्दीन हाजी, अफसाना खाटीक,नंदा संदानशिव, शोभाबाई गढरे,विजय पाटील, सचिन पाटील, देवेंद्र कांबळे, भरतकुमार ललवानी,माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, राष्ट्रवादी शहरध्यक्ष चेतन राजपूत, समाजसेवक जितेंद्र ठाकूर, विक्रांत पाटील, नरेंद्र संदानशिव, मुक्तार खाटीक, नसरोद्दीन हाजी,विजय राजपूत, सयाजीराव कापडणेकर, भूषण भदाणे, सुनील शिंपी, संजय पुनाजी पाटील, गौरव महाजन आणि शुभम पाटील उपस्थित होते.

 सदर सभागृहातील घड्याळ बंद असल्याचे शेतकी संघाचे संचालक संजय पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रा. डॉ. अंजली जोशी यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्रा. डॉ. अंजली जोशी मॅडम सेवानिवृत्त; महाविद्यालयात भावुक वातावरण

 

अमळनेर : येथील नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात तब्बल ३३ वर्षे आपल्या ज्ञानदानाने शेकडो उत्तम शिक्षक घडविणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. अंजली जोशी मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत भावुक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. गोड स्वभाव, सुश्राव्य वाणी आणि अथांग ज्ञानसाधनेच्या बळावर त्यांनी विद्यार्थी व सहकारी प्राध्यापकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालयातून एक आदर्श मार्गदर्शक निवृत्त होत असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

 

  याप्रसंगी प्रा डॉ अंजली जोशी यांना महाविद्याल्याच्या वतीने प्रा डॉ नयना वाणी व प्रा डॉ सुनंदा तायडे यांनी पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार केला. तर पती गोविंद कुलकर्णी व भाऊ प्रसाद जोशी यांचे स्वागत महाविद्यालयाच्या तर्फे प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी यांनी केले.

निरोप देतांना भावुक वातावरण 

    सेवा पूर्ती च्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयांतील प्राध्यापक डॉ नयना वाणी, डॉ जितेश चव्हाण, डॉ सुनंदा तायडे, डॉ विजय गाढे यांनी जोशी मॅडममांच्या सहवासातील आठवणींना सश्रूनयनाने वाट मोकळी केली व पुढील आयुष्य सुखी समाधानी जाओ म्हणून मनोभावे ईश्वराला याचना केली. भाऊ प्रसाद जोशी यांनी बहिणीच्या सहवासातील बालपणा पासून आज पर्यंतचा आठवणी उपस्थितांच्या समोर मांडला. ईश्वरानेचे माझ्या आयुष्यात सर्वगुण संपन्न अश्या बहिणीला पाठविल्याचे सांगत अनेक चांगल्या स्वभाव गुणांचा पाढाच वाचला.बालपणा पासूनच परिवाराचा आधारवड म्हणून त्यांना उपमा दिली.

उच्च शिक्षणासोबतच आदर्श कुटुंबव्यवस्था आणि देशसेवा

प्रा. डॉ. अंजली जोशी मॅडम यांचे शिक्षण एम.कॉम, एम.एड, पी.एच.डी. असे उच्च दर्जाचे असून, त्यांनी सन १९९३ मध्ये या महाविद्यालयात अध्यापनाच्या कार्यास सुरुवात केली होती. जळगाव ते अमळनेर असा तब्बल ३३ वर्षांचा रेल्वेचा खडतर प्रवास करत त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यात कसुरी केली नाही. एका बाजूला उत्तम शिक्षक घडवून देशसेवेचे महत कार्य करत असतानाच, दुसऱ्या बाजूला अनेक कष्ट सोसून त्यांनी आपल्या पाल्यांनाही उच्च शिक्षित व स्वावलंबी बनवले. एक सुशिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबासाठी कशी प्रेरणादायी ठरू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. अंजली जोशी मॅडम आहेत, अशा शब्दांत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.

सहकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे नाते

आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी त्यांनी नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपुलकीचे व घट्ट नाते जपले. त्यांच्या गोड स्वभावामुळे त्या सर्वांच्याच लाडक्या प्राध्यापिका राहिल्या. अध्यापनासोबतच त्यांना संगीताचीही उत्तम आवड आहे. आपल्या गोड गळ्याने त्यांनी अनेकदा सहज एखादे गाणे गाऊन अवतीभवतीच्या सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे, अशा आठवणींना यावेळी सहकाऱ्यांनी उजाळा दिला.

निरोगी व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना

सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या प्रा. डॉ. जोशी मॅडम आज सेवानिवृत्त होत असल्याने महाविद्यालयातील प्रत्येकाचेच उर भरून आले होते. निरोप देताना सहकाऱ्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या पुढील वाटचालीस, निरामय, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी महाविद्यालयातील सर्वच स्तरांतून आणि उपस्थितांकडून ईश्वराजवळ प्रार्थना करण्यात आली. या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी , प्राध्यापक वृंद डॉ नयना वाणी,डॉ सुंनंदा तायडे, डॉ जितेश चव्हाण, डॉ विजय गाढे, प्रा कैलास देवरे, शिक्षकेतर कर्मचारी सौ.वनिता पाटील,किरण रावल, कैलास भोंगळ, अनिकेत पाटील, राजू पाटील, विनोद पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांची धडक क्षेत्रभेट BLO च्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी; मतदारांच्या घरी जाऊन स्वतः भरून घेतले गणना प्रपत्र

 

अमळनेर | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेस मंगळवार, दि. ३० जूनपासून प्रारंभ झाला असून ही मोहीम २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अमळनेरचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देत BLO यांच्या कामकाजाची सखोल पाहणी केली.

प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी विविध भागांना भेट देऊन BLO प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन काम करत आहेत का, मतदारांकडून गणना प्रपत्र अचूक व नियमानुसार भरून घेतले जात आहे का, तसेच मोहिमेदरम्यान कोणत्या अडचणी येत आहेत याची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी उद्भवणाऱ्या समस्यांवर आवश्यक सूचना व मार्गदर्शन करत मोहिमेची प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

भेटीदरम्यान भाग क्रमांक १६९ चे BLO तथा शिक्षक अजय भामरे हे प्रत्यक्ष क्षेत्रात मतदारांच्या घरी जाऊन काम करत असताना प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची अचानक पाहणी केली. त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी मतदार प्रा. अशोक पवार यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देत स्वतः गणना प्रपत्र भरून घेतले आणि त्याची एक प्रत त्यांना सुपूर्द केली. तसेच मतदारांना आवश्यक माहिती देत निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

या पाहणीदरम्यान BLO यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत अचूक, पारदर्शक आणि वेळेत सेवा पोहोचविण्यावर भर देण्यात आला. SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या या प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमुळे BLO यांचे मनोबल उंचावले असून मोहिमेला वेग आणि प्रभावी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ३० वटवृक्षांची लागवड; चिमणपुरी पिंपळे खुर्दच्या महिला शेतकरी गटांचा प्रेरणादायी उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधत चिमणपुरी पिंपळे खुर्द येथील महिला शेतकरी गटांनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत तब्बल ३० वटवृक्षांची लागवड केली. विशेष म्हणजे, केवळ वृक्षलागवड न करता या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही महिलांनी स्वीकारली आहे.

लागवडीपूर्वी महिलांनी वटवृक्षाची विधिवत पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “वृक्षलागवड हीच भविष्यातील समृद्धीची गुरुकिल्ली आहे. पाऊस, पर्यावरण आणि जीवनमान यांचा थेट संबंध वृक्षांशी आहे. वृक्षांशिवाय पाऊस नाही आणि पावसाशिवाय समृद्ध जीवन नाही,” अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.

या उपक्रमात धरती माता महिला शेतकरी गट, संघर्ष महिला शेतकरी गट आणि भूमाता महिला शेतकरी गट यांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली.

या प्रेरणादायी उपक्रमाची प्रेरणा तालुक्याचे भूमिपुत्र तथा आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्याकडून मिळाल्याचे महिलांनी सांगितले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. सरपंच दिनेश पाटील, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, सुभाष पाटील, अरविंद पाटील, भैया पाटील, अनिल पाटील, भाऊसाहेब पाटील आणि संजय पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

वटसावित्रीसारख्या पारंपरिक सणाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत महिला शेतकरी गटांनी दिलेला हा संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, “एक सण… एक वृक्ष… एक संकल्प” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारल्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; जळगाव जिल्ह्यात एनएसयूआय संघटन बळकटीचा निर्धार

 

 

अमळनेर | प्रतिनिधी :

जळगाव जिल्हा एनएसयूआय च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पदग्रहणाचा भव्य सोहळा अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात  उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक, पदाधिकारी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहिल्याने सभागृह उत्साहाने फुलून गेले.

जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर एनएसयूआयचा भव्य विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटनेवरील विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार , प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे , काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पश्चिम) अविनाश भालेराव, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना हनुमंत पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षा घोटाळ्यांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या घटनांचा निषेध व्यक्त केला आणि अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली.

भाऊसाहेब आजबे यांनी एनएसयूआयचा इतिहास, संघटनेची कार्यपद्धती आणि विद्यार्थी चळवळीचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संघटनात्मक ताकद वाढवून सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

पदग्रहणानंतर मनोगत व्यक्त करताना अॅड. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात एनएसयूआयची शाखा स्थापन करून संघटना अधिक सक्षम व व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी राजकारणाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अमळनेरमध्ये २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला; ओळख पटवण्यासाठी अमळनेर पोलिसांचे आवाहन

 

अमळनेर | प्रतिनिधी :

शहरातील दाजीबा नगर परिसरात एका २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.०० वाजता दाजीबा नगर येथील कच्च्या रस्त्यालगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

 मृताचे वर्णन

वय: अंदाजे २५ ते ३० वर्षे

रंग:  सावळा

उंची: अंदाजे ५ फूट ३ इंच

चेहरा: लांबट

नाक:  सरळ

केस: काळे

अंगावरील कपडे: निळसर रंगाचा टी-शर्ट व राखाडी (ग्रे) रंगाची पॅन्ट

ओळखण्याची खूण: उजव्या हातात स्टीलचे कडे व लाल रंगाचा दोरा बांधलेला आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू रजि. क्र. ५६/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

 पोलिसांचे नागरिकांना आवाहन

वरील वर्णनातील तरुणाची ओळख किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणालाही कोणतीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई यांच्याशी ७३०४१६६१४८ या मोबाईल क्रमांकावर किंवा अमळनेर पोलीस स्टेशन च्या ०२५८७-२२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रतापच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दिमाखदार निवड; एकूण ११ विद्यार्थ्यांनी फडकवला यशाचा झेंडा!

 

 

अमळनेर | प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील करिअर काउन्सेलिंग सेंटरने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. केंद्राच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून, यापूर्वी निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांसह आता एकूण ११ विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस दलात स्थान मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे प्रताप महाविद्यालयासह संपूर्ण अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, करिअर काउन्सेलिंग सेंटरच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला यामुळे मोठी दाद मिळाली आहे.

मुंबई पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी

मयुर भगवान पाटील

अविनाश विकास पाटील

मंगलेश सुनील पाटील

विकास इंदल बेहरे

या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, चिटणीस प्रा. पराग पाटील, सहचिटणीस डॉ. व्ही. बी. मांटे, प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील, करिअर काउन्सेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधीक्षक देवेंद्र कांबळे, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. निलेश पवार, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. कैलास निळे, डॉ. माधव भुसनर, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. विजय साळुंखे, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, डॉ. विवेक बडगुजर, तसेच करिअर काउन्सेलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ, पराग रविंद्र पाटील आणि अतुल धनगर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवाभावी आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रताप महाविद्यालयाच्या करिअर काउन्सेलिंग सेंटरने अल्पावधीतच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून दिले असून, या यशामुळे भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.

५८ वर्षांची सेवापरंपरा कायम ठेवण्याचा निर्धार; लायन्स क्लबच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

 

अमळनेर : समाजसेवा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांद्वारे गेली ५८ वर्षे शहरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लायन्स क्लब, अमळनेरच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीचा ५८ वा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी बन्सीलाल पॅलेस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ज्येष्ठ लायन नेते तथा पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन (पुणे) एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देण्यात आली.

यावेळी जितेंद्र पारख यांनी अध्यक्ष, प्रा. जयेश गुजराथी यांनी सचिव, तर कुमारपाल कोठारी यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. नव्या कार्यकारिणीने सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू, वंचित व दुर्बल घटकांसाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

शपथविधीनंतर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन म्हणाले, “लायन्स क्लब ही केवळ संस्था नसून समाजसेवेची अखंड चळवळ आहे. अमळनेर लायन्स क्लबने गेल्या ५८ वर्षांत सेवाभावी कार्याची समृद्ध परंपरा निर्माण केली असून नव्या नेतृत्वाखाली ही परंपरा अधिक व्यापक स्वरूपात पुढे जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मावळते अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांनी वर्षभरातील सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांचा आढावा सादर केला. तसेच नितीन विंचूरकर यांनी विविध सेवा प्रकल्पांचा सविस्तर अहवाल मांडला.

झोन चेअरपर्सन लायन जितेंद्र जैन यांनीही मार्गदर्शन करताना लायन्स क्लबच्या सातत्यपूर्ण सेवाभावी कार्याचे कौतुक केले. नव्या कार्यकारिणीने समाजहिताला प्राधान्य देत अधिकाधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचवावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

कार्यक्रमात प्रदीप जैन व डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मावळत्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना बॅज परिधान करून पदभार सुपूर्द केला. आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, “आम्ही कायम आपल्या पाठीशी आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात जितेंद्र पारख म्हणाले, “सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लबचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यास प्राधान्य दिले जाईल.”

या सोहळ्यास लायन्स क्लबचे सदस्य, लायन परिवार, रोटरी क्लबचे सदस्य तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नयना नवसारीकर, रुपाली सिंघवी आणि जया जैन यांनी केले, तर प्रा. जयेश गुजराथी यांनी आभार मानले.

नव्या नेतृत्वाखाली लायन्स क्लबच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानवतावादी सेवा उपक्रमांना अधिक गती मिळेल आणि संस्थेची गौरवशाली सेवापरंपरा अधिक जोमाने पुढे नेली जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

अमळनेर शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ८७.०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण

 

 

अमळनेर, दि. २८ जून २०२६ : अमळनेर शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरभर उभारण्यात आलेल्या पोलिओ बुथ, रेल्वे स्थानक व बस स्थानकावरील विशेष पथके तसेच मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभर मोठ्या प्रमाणात बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले.

शहरातील पोलिओ लाभार्थींची एकूण संख्या १२ हजार ९६२ असून दिवसभरात १० हजार ८८९ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. त्यामुळे पहिल्याच दिवशी ८७.०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला यश आले.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांनीही विशेष सहकार्य केले.

मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्य सभापती श्री. रामकृष्ण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरिष गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत ३० पथके शहरातील प्रत्येक घरात जाऊन पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचा डोस पाजणार आहेत. या घरभेट मोहिमेद्वारे आज डोस घेण्यापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोहोचून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आरोग्य विभागाचा संकल्प आहे.

आरोग्य विभागाने सर्व पालकांना आवाहन केले आहे की, घरभेटीदरम्यान येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत.

माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ संकल्पनेला बळ; मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राची पल्स पोलिओ व हिवताप प्रतिरोध जनजागृती मोहीम

 

 

मारवड (प्रतिनिधी):

“माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या वतीने पल्स पोलिओ अभियान व हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी तसेच तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे** यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

यावेळी दि. २८ जून २०२६ (रविवार) रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन करण्यात आले. आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी सार्वजनिक भिंतीवर “लस पाजा बाळा, पोलिओ टाळा” हा संदेश लिहून नागरिकांमध्ये जनजागृती केली.

पल्स पोलिओ हा भारत सरकारचा राष्ट्रीय प्रतिरक्षण कार्यक्रम असून, या अभियानांतर्गत ० ते ५ वर्षांतील सर्व बालकांना ओरल पोलिओ व्हॅक्सीन (OPV) चे दोन थेंब दिले जातात. यामुळे पोलिओसारख्या गंभीर व कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणाऱ्या आजारापासून बालकांचे संरक्षण होते. पोलिओ हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग असून तो प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, घसा दुखणे, डोकेदुखी, उलट्या, हात-पाय दुखणे, स्नायू कमकुवत होणे आणि पक्षाघात ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.

भारतामध्ये १९९५ पासून पल्स पोलिओ अभियान सुरू करण्यात आले असून २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला पोलिओमुक्त देश म्हणून प्रमाणित केले आहे. पोलिओ प्रतिबंधासाठी OPV (Oral Polio Vaccine) तसेच नियमित लसीकरणात IPV (Inactivated Polio Vaccine) चा वापर केला जातो.

यावेळी “पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब द्या” आणि “पोलिओमुक्त भारत, आपली सर्वांची जबाबदारी” हा संदेश देत पोलिओमुक्त मारवड घडविण्याचा संकल्प करण्यात आला. आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे व संजय जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, जून महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत असून हिवताप निर्मूलन धोरण २०३० च्या अनुषंगाने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. किटकशास्त्रीय सर्वेक्षण, डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याबाबत मार्गदर्शन, गप्पी माशांचे महत्त्व, परिसर स्वच्छता, मच्छरदाणीचा वापर, तसेच जलजन्य व किटकजन्य आजारांपासून बचावासाठी नागरिकांना माहिती देण्यात आली.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी साहील चौधरी, विदया देवरे, आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे, संजय जाधव, प्रयोगशाळा वैज्ञानिक के. आर. साबळे, आरोग्य सहाय्यिका सुनिता गावित, आरोग्य सेवक योगेश कापडणे तसेच आशा सेविका राजेश्री पाटील, संगीता चौधरी, मंदाताई शिंदे, मनिषा पाटील, कल्याणी पाटील यांनी परिश्रम घेतले.

आरोग्यदायी, रोगमुक्त आणि सुरक्षित गाव घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या वतीने करण्यात आले.