अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; जळगाव जिल्ह्यात एनएसयूआय संघटन बळकटीचा निर्धार
अमळनेर | प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा एनएसयूआय च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पदग्रहणाचा भव्य सोहळा अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक, पदाधिकारी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहिल्याने सभागृह उत्साहाने फुलून गेले.
जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर एनएसयूआयचा भव्य विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटनेवरील विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार , प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे , काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पश्चिम) अविनाश भालेराव, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना हनुमंत पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षा घोटाळ्यांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या घटनांचा निषेध व्यक्त केला आणि अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली.
भाऊसाहेब आजबे यांनी एनएसयूआयचा इतिहास, संघटनेची कार्यपद्धती आणि विद्यार्थी चळवळीचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संघटनात्मक ताकद वाढवून सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
पदग्रहणानंतर मनोगत व्यक्त करताना अॅड. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात एनएसयूआयची शाखा स्थापन करून संघटना अधिक सक्षम व व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी राजकारणाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

