नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रा. डॉ. अंजली जोशी यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्रा. डॉ. अंजली जोशी मॅडम सेवानिवृत्त; महाविद्यालयात भावुक वातावरण
अमळनेर : येथील नवल भाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात तब्बल ३३ वर्षे आपल्या ज्ञानदानाने शेकडो उत्तम शिक्षक घडविणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. अंजली जोशी मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत भावुक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. गोड स्वभाव, सुश्राव्य वाणी आणि अथांग ज्ञानसाधनेच्या बळावर त्यांनी विद्यार्थी व सहकारी प्राध्यापकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालयातून एक आदर्श मार्गदर्शक निवृत्त होत असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
याप्रसंगी प्रा डॉ अंजली जोशी यांना महाविद्याल्याच्या वतीने प्रा डॉ नयना वाणी व प्रा डॉ सुनंदा तायडे यांनी पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार केला. तर पती गोविंद कुलकर्णी व भाऊ प्रसाद जोशी यांचे स्वागत महाविद्यालयाच्या तर्फे प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी यांनी केले.
निरोप देतांना भावुक वातावरण
सेवा पूर्ती च्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयांतील प्राध्यापक डॉ नयना वाणी, डॉ जितेश चव्हाण, डॉ सुनंदा तायडे, डॉ विजय गाढे यांनी जोशी मॅडममांच्या सहवासातील आठवणींना सश्रूनयनाने वाट मोकळी केली व पुढील आयुष्य सुखी समाधानी जाओ म्हणून मनोभावे ईश्वराला याचना केली. भाऊ प्रसाद जोशी यांनी बहिणीच्या सहवासातील बालपणा पासून आज पर्यंतचा आठवणी उपस्थितांच्या समोर मांडला. ईश्वरानेचे माझ्या आयुष्यात सर्वगुण संपन्न अश्या बहिणीला पाठविल्याचे सांगत अनेक चांगल्या स्वभाव गुणांचा पाढाच वाचला.बालपणा पासूनच परिवाराचा आधारवड म्हणून त्यांना उपमा दिली.
उच्च शिक्षणासोबतच आदर्श कुटुंबव्यवस्था आणि देशसेवा
प्रा. डॉ. अंजली जोशी मॅडम यांचे शिक्षण एम.कॉम, एम.एड, पी.एच.डी. असे उच्च दर्जाचे असून, त्यांनी सन १९९३ मध्ये या महाविद्यालयात अध्यापनाच्या कार्यास सुरुवात केली होती. जळगाव ते अमळनेर असा तब्बल ३३ वर्षांचा रेल्वेचा खडतर प्रवास करत त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यात कसुरी केली नाही. एका बाजूला उत्तम शिक्षक घडवून देशसेवेचे महत कार्य करत असतानाच, दुसऱ्या बाजूला अनेक कष्ट सोसून त्यांनी आपल्या पाल्यांनाही उच्च शिक्षित व स्वावलंबी बनवले. एक सुशिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबासाठी कशी प्रेरणादायी ठरू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. अंजली जोशी मॅडम आहेत, अशा शब्दांत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
सहकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे नाते
आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी त्यांनी नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपुलकीचे व घट्ट नाते जपले. त्यांच्या गोड स्वभावामुळे त्या सर्वांच्याच लाडक्या प्राध्यापिका राहिल्या. अध्यापनासोबतच त्यांना संगीताचीही उत्तम आवड आहे. आपल्या गोड गळ्याने त्यांनी अनेकदा सहज एखादे गाणे गाऊन अवतीभवतीच्या सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे, अशा आठवणींना यावेळी सहकाऱ्यांनी उजाळा दिला.
निरोगी व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना
सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या प्रा. डॉ. जोशी मॅडम आज सेवानिवृत्त होत असल्याने महाविद्यालयातील प्रत्येकाचेच उर भरून आले होते. निरोप देताना सहकाऱ्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या पुढील वाटचालीस, निरामय, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी महाविद्यालयातील सर्वच स्तरांतून आणि उपस्थितांकडून ईश्वराजवळ प्रार्थना करण्यात आली. या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी , प्राध्यापक वृंद डॉ नयना वाणी,डॉ सुंनंदा तायडे, डॉ जितेश चव्हाण, डॉ विजय गाढे, प्रा कैलास देवरे, शिक्षकेतर कर्मचारी सौ.वनिता पाटील,किरण रावल, कैलास भोंगळ, अनिकेत पाटील, राजू पाटील, विनोद पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

